विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारत सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2026 साठीची नामांकने केली खुली; विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान
Posted On:
28 MAR 2026 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2026
केंद्र सरकारने, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2026 या, प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकने मागवली आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात, उत्कृष्ट, उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा ह्या पुरस्कारांनी गौरव केला जातो. भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील, सीएसआयआर म्हणजेच, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सचिवालयातर्फे, हे पुरस्कार दिले जातात.
भारताच्या विकासात योगदान देणाऱ्या तसेच, देशाचा वैज्ञानिक परीघ विस्तारणाऱ्या शास्त्रज्ञांना, तंत्रज्ञांना आणि नवोन्मेषकांना हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान केले जातात. यासाठी दिल्या जाणाऱ्या नामांकनामध्ये, स्वतः केलेल्या नामांकनासह, सर्व नामांकने- कृषी विज्ञान, अणुऊर्जा, जीवशास्त्रे, रसायनशास्त्रे, संरक्षण तंत्रज्ञान, भू-विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, गणित आणि कॉम्प्युटर विज्ञान, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणि इतर क्षेत्रांसाठी भरली जाऊ शकतात.

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2026 चार विशिष्ट श्रेणीत दिले जाणार आहेत:
- विज्ञान रत्न: विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्षेत्रात केलेल्या आजीवन सेवेची दखल.
- विज्ञान श्री: विशिष्ट क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल.
- विज्ञान युवा शांतस्वरुप भटनागर पुरस्कार – आपल्या कार्यात अद्वितीय ठसा उमटवणाऱ्या युवा वैज्ञानिकांना ( 45 वर्षांखालील) सन्मानित करणे.
- विज्ञान चमू: एकत्रित केलेल्या संशोधन अथवा प्रयोगासाठी तीन किंवा त्याहून अधिक संशोधकांचा गौरव.
स्वयं- नामांकनासह, सर्व नामांकने, ऑनलाईन स्वरूपात खुली करण्यात आली असून, ती गृह विभाग पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर 28 मार्च 2026 ते 11 May 2026 या काळात भरता येतील.
सर्व शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्र आणि व्यक्तिगत स्वरूपात सर्वांनी या नामांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे, जेणेकरुन, भारतातील वैज्ञानिक प्रतिभेला एक वेगळी ओळख आणि सन्मान मिळू शकेल.
ही नामांकने खुली करण्याच्या कार्यक्रमात बोलतांना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी देशातील वैज्ञानिक वातावरणाला प्रोत्साहन देण्यात हे पुरस्कार महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.
“राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार केवळ एक सन्मान नाही, तर, देशात उत्कृष्टता आणि नवोन्मेष संस्कृतीला पाठबळ देण्याची देशाची कटिबद्धता यातून व्यक्त होते” असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
अधिक माहिती आणि सविस्तर मार्गदर्शक पुस्तिकेसाठी, संबंधित उमेदवारांनी, अधिकृत पोर्टलला भेट द्यावी किंवा, आरव्हीपी पुरस्कार सचिवालयाशी संपर्क साधावा.
* * *
शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2246573)
अभ्यागत कक्ष : 8