अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शहरी परिवहन, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील 4 प्रकल्पांसाठी भारताला अधिकृत विकास साहाय्य देण्याची जपानने दिली हमी


या करारांतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांतील प्रकल्पांना 275.858 अब्ज जपानी येन (अंदाजे 16,420 कोटी रुपये) इतक्या मदतीचा लाभ मिळणार

भारत सरकार आणि जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी यांच्यात कर्ज करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत

आर्थिक सहकार्यामुळे भारत आणि जपानमधील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट होईल

Posted On: 27 MAR 2026 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

जपान सरकारने पंजाब, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या शहरी परिवहन, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील 4 प्रकल्पांसाठी भारताला 275.858 अब्ज जपानी येन (अंदाजे 16,420 कोटी रुपये) इतके अधिकृत विकास साहाय्य (ODA) कर्ज देण्याचे मान्य केले आहे.

या करारांच्या संदर्भातील अधिकृत पत्रांची 24.03.2026 रोजी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव आलोक तिवारी आणि भारतातील जपानचे राजदूत  केईची ओनो यांच्यात देवाणघेवाण झाली. या प्रकल्पांमध्ये "बेंगळुरू मेट्रो रेल प्रकल्प (टप्पा 3) (I)" (102.480 अब्ज जपानी येन), "मुंबई मेट्रो लाईन 11 प्रकल्प (I)" (92.400 अब्ज जपानी येन), "महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवा वितरण, वैद्यकीय शिक्षण प्रणाली आणि परिचारिका शिक्षण प्रणाली बळकटीकरण प्रकल्प (I)" (62.294 अब्ज जपानी येन) आणि "पंजाबमधील शाश्वत फलोत्पादन प्रोत्साहन प्रकल्प" (18.684 अब्ज जपानी येन) यांचा समावेश आहे. भारत सरकार आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) यांच्यात कर्ज करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली आहे.

बंगळुरू महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक मागणीला तोंड देण्यासाठी 'मास रॅपिड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अर्थात वेगवान सार्वजनिक परिवहन प्रणालीचा विस्तार करणे हा बंगळुरू मेट्रो रेल प्रकल्प (टप्पा 3) (I) चा उद्देश आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे प्रदूषण घटून प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, शहरी पर्यावरणात सुधारणा होईल आणि पर्यायाने हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत होईल.

मुंबईतील वाढत्या वाहतूक मागणीला तोंड देण्यासाठी जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करणे हा मुंबई मेट्रो लाईन 11 प्रकल्प (I) चा मुख्य उद्देश आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे प्रदूषण कमी होईल, परिणामी प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, शहरी पर्यावरणात सुधारणा होईल आणि सरतेशेवटी हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील तृतीयक सेवा सुविधा, महाविद्यालये, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि परिचारिका शाळांच्या बांधकामाद्वारे आरोग्य व्यवस्था बळकट करून महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय सेवेची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे हा महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवा वितरण, वैद्यकीय शिक्षण प्रणाली आणि परिचारिका शिक्षण प्रणाली बळकटीकरण प्रकल्प (I) चा उद्देश आहे. यामुळे भारतातील 'सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती'ला चालना मिळण्यास अधिक मदत होईल.

उच्च-मूल्य असलेल्या फलोत्पादन पिकांमध्ये वैविध्य आणून आणि भक्कम मूल्य साखळी  तसेच क्षमता विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास करून शाश्वत फलोत्पादनाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारणे हा पंजाबमधील शाश्वत फलोत्पादन प्रोत्साहन प्रकल्पाचा उद्देश आहे. यामुळे पंजाबमधील पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक विकासाला गती मिळेल.

भारत आणि जपानमध्ये 1958 पासून द्विपक्षीय विकास सहकार्याचा प्रदीर्घ आणि फलदायी इतिहास आहे. भारत-जपान संबंधांचा एक मुख्य स्तंभ असलेले आर्थिक सहकार्य गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगती करत  आहे. यामुळे भारत आणि जपानमधील 'धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी'  अधिक दृढ आणि बळकट होत आहे.

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246066) अभ्यागत कक्ष : 18