उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत लोकभवन इथे झालेल्या ऐतिहासिक जैन दीक्षा समारंभात, उपराष्ट्रपतींच्या हस्ते आयोजक आणि दात्यांचा सत्कार


त्याग आणि सेवेची भावना समाजासाठी प्रेरणादायक – उपराष्ट्रपती

Posted On: 21 MAR 2026 8:10PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत लोकभवन इथे, काही दिवसांपूर्वी आयोजित ऐतिहासिक जैन दीक्षा समारंभाचे आयोजक, दाते आणि या समारंभाशी संबधित कुटुंबांचा सत्कार केला. दीक्षा समारंभातून व्यक्त झालेली त्याग आणि सेवेची भावना, सर्व समाजासाठी प्रेरणादायक असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

जैन संप्रदायाने कायमच समाजाची सेवा केली आहे, अशा शब्दांत उपराष्ट्रपतीनी या धर्मांतल्या तत्वांचे कौतुक केले. या संप्रदायातील अहिंसा, अपरिग्रह आणि सहनशीलता, आजही अत्यंत प्रासंगिक असल्याचे, उपराष्ट्रपती म्हणाले. आज अनेक लोक, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत जगत असताना, दीक्षा घेऊन त्यागाचा मार्ग स्वीकारणारे लोक, सर्वांसाठी, समाजासाठी प्रेरणादायक ठरतात. त्यांचे आयुष्य समाजाला सरळ साधे जीवन जगण्याची, आत्मविवेक जागृत ठेवण्याची प्रेरणा देते, असे राधाकृष्णन म्हणाले.

भारत, जैन संप्रदायासह अनेक धर्मांची जन्मभूमी आहे असे त्यांनी अधोरेखित केले. तामिळनाडू आणि जैन धर्मातील, प्रगाढ नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. संगम आणि संगमोत्तर काळातील तमिळ साहित्य आणि संस्कृतीत जैन अभ्यासक तसेच, जैन मुनींच्या योगदानाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सीलापट्टीकरम आणि इतर साहित्यातून जैन संप्रदायाचे तत्वज्ञान आणि नैतिकता प्रतिबिंबित होते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. 

जैन तत्त्वज्ञानाच्या सार्वत्रिक महत्त्वावर भर देत, अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवाद ही सगळी तत्त्वे आजच्या जागतिक समस्यांवर उपाय सांगणारी आहेत. आज सुरू असलेला संघर्ष, पर्यावरणीय हानी आणि सामाजिक भेदावर मार्ग काढण्याचे उपाय हे तत्वज्ञान सांगते. साधी राहणी, विवेकपूर्ण उपभोग आणि करुणेचा अवलंब हे केवळ आध्यात्मिक ज्ञान नसून शाश्वत आणि सुसंवादी भविष्याचा मार्गदर्शक आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

समाजात, प्रत्येकजण संन्यास घेऊ शकत नसला तरी दैनंदिन जीवनात दयाभावना, नैतिक आचरण आणि सर्व सजीवांबद्दल आदर या मूल्यांचा अवलंब मात्र प्रत्येकजण करू शकतो, असे मत त्यांनी मांडले. कुटुंबातील सदस्यांना अशा श्रेष्ठ आध्यात्मिक मार्गावर प्रवृत्त करणे हे मोठ्या श्रद्धेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे, आणि अशा कृती समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीत हातभार लावतात, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.

उपराष्ट्रपतींनी भव्य दीक्षा समारंभाशी संबंधित आयोजक, दाते आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले.  समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे प्रयत्न भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपराष्ट्रपतींनी गॅलरीलाही भेट देऊन जैन पूजेसाठी वापरल्या जाणारे अष्ट द्रव्य, भगवान महावीरांच्या शिकवणीवर आधारित जैन धर्मग्रंथांचा संग्रह, आगम किंवा आगम सूत्रे  तसेच भगवान महावीरांची पवित्र आभूषणे यांच्या प्रदर्शनालाही भेट दिली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच विश्वस्त, दाते, जैन समाजातील सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2243461) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English , हिन्दी