शिक्षण मंत्रालय
आयआयटी मुंबई इथे भारत इनोव्हेट्स डीप टेक प्री-समिटचे उद्घाटन
प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांच्या हस्ते, दोन दिवसीय राष्ट्रीय डीप टेक प्रदर्शनीचे उद्घाटन; 3000 अर्जामधून निवडल्या गेलेल्या 137 स्टार्स अप्सचा प्रदर्शनात सहभाग
भारताच्या सर्वोत्तम डीप-टेकची, देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीची सज्जता
Posted On:
21 MAR 2026 5:40PM by PIB Mumbai
भारत इनोव्हेट्स डीप टेक प्री-समिट, म्हणजे परिषदेपूर्वीच्या प्रदर्शनीचे आज आयआयटी मुंबई परीसरात, आयआयटी बॉम्बे रिसर्च पार्क फाऊंडेशन – अॅस्पायर येथे उद्घाटन करण्यात आले. या राष्ट्रीय प्री समिटमध्ये, भारतातील सर्वोत्तम डीप-टेक प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या दोन दिवसीय प्रदर्शनीचे उद्घाटन, केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार, आणि पीएम एसटीआयएसीचे अध्यक्ष प्रा. अजय कुमार सूद यांच्या हस्ते आणि सरकारच्या मान्यवर प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभगाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. के राधाकृष्णन आणि आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केंद्रे असे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ही पूर्व-परिषद, भारत इनोव्हेट्स 2026 च्या प्रवासातील एक टप्पा असून जून 2026 ला फ्रान्सच्या निस इथे होणाऱ्या जागतिक नवोन्मेष परिषदेत भारताच्या पदार्पणाची तयारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे 2026 हे वर्ष भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष असून त्याचाच भाग म्हणून ही परिषद होणार आहे.
आपले उद्घाटनपर भाषण देताना, प्रमुख पाहुणे प्रा. अजय कुमार सूद यांनी भारताचे तंत्रज्ञानविषयक नेतृत्व आणि जागतिक स्पर्धात्मकता यांसाठी 'डीप-टेक' नवोन्मेषाच्या महत्त्वावर भर दिला, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये शैक्षणिक संस्था, संशोधन परिसंस्था आणि स्टार्टअप्स यांची भूमिका अधोरेखित केली.

उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी यांनी, भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, शिक्षण मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, जैव तंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग आणि संरक्षण मंत्रालय, असे विविध विभाग या एका मंचावर एकत्रित आले असून, त्यातून जगासमोर भारताचे अद्ययावत डीप-टेक तंत्रज्ञान मांडले जात असल्याचे सांगितले. हा उपक्रम भारताच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याइतकाच, त्याचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्याबाबतही आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मुळे भारताच्या शिक्षणपद्धतीत आधीच लक्षणीय बदल झाला असून, आधी जे केवळ परीक्षार्थी शिक्षण होते, त्याला आता शिक्षणाच्या खऱ्या उद्दिष्टाशी जोडून, समाजात त्याचे योगदान देण्याकडे लक्ष दिले जात आहे, त्यातही, विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या संकल्पावर भर दिला जात असल्याचे जोशी यांनी सांगितले. गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट्स क्षेत्राने, लहान भागातील चांगल्या स्टार्टअप कंपन्यांनाही मदत करावी, असे आवाहन करत, नवोन्मेषाला भौगोलिक सीमांची बंधने नसल्याचे सांगितले.

आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. के राधाकृष्णन यांनी उपस्थित नवोन्मेषक आणि संस्थापकांना दृढनिश्चयाने राष्ट्रीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा सल्ला देत, भारतासाठी नवा इतिहास घडविण्याचे आवाहन केले. नवोन्मेषक भारताचे सदिच्छादूत असल्याचे सांगत त्यांनी, देशाचे नाव उंचावण्यासाठी काम करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी भारताच्या नवोन्मेष प्रवासाबद्दल व्यापक दृष्टीकोन मांडला, यासाठी सरकारने आखलेल्या निर्णायक धोरणात्मक प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.
भारतात आता सुमारे 2 लाख स्टार्टअप्स आणि जवळपास 125 युनिकॉर्न्स कार्यरत असून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप व्यवस्था बनला आहे. 2017-18 मध्ये 24 युनिकॉर्न्सपासून झालेली ही विशेष उल्लेखनीय वाढ आहे, असे त्यांनी नमूद केले.
आज भारतात 1000 पेक्षा अधिक गुंतवणूकदार स्टार्ट अप क्षेत्रात सक्रिय असून, गेल्या काही वर्षांत भारतीय स्टार्टअप्समध्ये सुमारे 70 ते 80 अब्ज व्हेंचर कॅपिटलची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र यातील केवळ, 4 ते 5 अब्ज डॉलर्स गुंतवणूकच डीप-टेक क्षेत्रात झाली असल्याचे सांगत त्यांनी वित्तपुरवठ्यातील तफावत अधोरेखित केली. ही तफावत दूर करण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै 2025 मध्ये 1 लाख कोटी रुपयांचा निधी, संशोधन, विकास आणि नवोन्मेष (RDI) साठी मंजूर केला आहे, असे त्यांनी संगितले. हा निधी खासगी क्षेत्रातील, विशेषतः स्टार्टअप्स मधील संशोधन आणि विकासासाठी, इक्विटी सहभाग आणि लवचिक दीर्घकालीन वित्तपुरवठ्याद्वारे वापरला जाणार आहे.
या निधीचे व्यवस्थापन करण्याचे काम, तंत्रज्ञान विकास मंडळ आणि जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषदेला (DBT) देण्यात आले आहे. तसेच, पर्यायी गुंतवणूक निधी आणि आयआयटी रिसर्च पार्क्स यांचाही त्यात सहभाग घेतला जाणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सध्या देशातील अंदाजे 8,000–10,000 डीप-टेक स्टार्टअप्सपैकी सुमारे 30–40% स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहे. यासाठी, सायबर-फिजिकल सिस्टिम्स, नेशनल क्वांटम मिशन अणि निधि अशा योजनांचा उपयोग केला जात आहे. डीप-टेक परिसंस्था विकसित करण्यामध्ये आयआयटी आणि आयआयएसटी यांची मोठी भूमिका आहे, असे करंदीकर यावेळी म्हणाले.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केंद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात, भारत इनोव्हेट्स हा केवळ एक कार्यक्रम नसून, तीन प्रमुख स्तंभांवर आधारित डीप-टेक परिसंस्था असल्याचे सांगितले. हे तीन स्तंभ म्हणजे, शिक्षण व्यवस्था, धोरणात्मक गुंतवणूकदार, आणि बाजारपेठेची उपलब्धता तसेच डिप टेकचा प्रत्यक्षात उपयोग करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या.
देशभरातून या पूर्व परिषदेसाठी, 3,000 पेक्षा अधिक स्टार्टअप अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 13 क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी आणि कठोर निवड प्रक्रियेद्वारे 137 दर्जेदार डीप-टेक स्टार्टअप्सची निवड करण्यात आली, अशी माहिती केंद्रे यांनी दिली.
उद्घाटन समारंभानंतर मान्यवरांनी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्स आणि आयआयटी पॅव्हेलियनमध्ये सादर करण्यात आलेल्या नवोन्मेष प्रयोगांचा आढावा घेतला तसेच संस्थापकांशी संवाद साधला.
70 पेक्षा अधिक स्टार्टअप्सनी विविध सत्रांमध्ये पॅरेलल पीचेस मध्ये, आपापल्या कल्पना सादर केल्या. त्यानंतर आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी रिव्हर्स पिचेस सादर करत महत्वाची गुंतवणूक क्षेत्रे आणि उद्योग-आधारित तांत्रिक आव्हानांवर प्रकाश टाकला.
भारत इनोव्हेट्स डीप टेक प्री-समिट हा कार्यक्रम, भारतातील नवोन्मेष व्यवस्थेतील विविध भागधारकांना एकत्र आणत, उदयोन्मुख स्टार्टअप्सना गुंतवणूकदार, उद्योग नेते आणि धोरणकर्त्यांशी जोडण्याचे एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देतो. फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक प्रदर्शनापूर्वी ही पूर्व परिषद, स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पना सादर करून, भागीदारी निर्माण करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची संधी देते.
भारत इनोव्हेट्स 2026 या पूर्व परिषदेत, तंत्रज्ञान क्षेत्रांतील 13 नवकल्पना मांडण्यात आल्या आहेत. यात अॅडव्हान्सड कम्प्यूटिंग, आरोग्यसेवा आणि मेडटेक, अवकाश आणि संरक्षण, ऊर्जा आणि शाश्वतता, सेमीकंडक्टर्स, जैवतंत्रज्ञान, स्मार्ट शहरे आणि गतिशीलता, नील अर्थव्यवस्था, नेक्ट जेन संवाद, कृषी आणि अन्न तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, औद्योगिक आणि उत्पादन क्रांती -4.0, आपत्ती व्यवस्थापन, अशा विषयांचा समावेश आहे. ही पूर्व परिषद, भारतातील विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक नवोन्मेषांना एकत्र आणून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यास मदत करते.
भारत इनोव्हेट्स विषयी :
हा उपक्रम भारताच्या संशोधन व विकास आधारित तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष क्षमतेचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ही क्षमता उच्च शिक्षण संस्था आणि केंद्रीय वित्तपुरवठा असलेल्या तांत्रिक संस्थामध्ये विकसित केली जात आहे.
हे प्रदर्शन उदया म्हणजे 22 मार्च 2026 रोजीही सुरू राहणार असून, त्यामध्ये अतिरिक्त स्टार्टअप पिचिंग सत्रे, धोरणात्मक चर्चा, गुंतवणूकदारांसोबत संवाद, ग्रँड फिनाले आणि पुरस्कार समारंभ पुढील उपक्रमांचा समावेश असेल.
अधिक माहितीसाठी, https://bharatinnovates.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
***
माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243426)
अभ्यागत कक्ष : 25