मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
‘वन हेल्थ’ अर्थात आरोग्यविषयक सज्जतेला बळकटी: सराव प्रात्यक्षिकांदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
21 MAR 2026 2:41PM by PIB Mumbai
‘वन हेल्थ’ अर्थात आरोग्यविषयक सज्जतेला बळकटी देण्यासंदर्भातील मोहिमेबाबत चौथ्या वैज्ञानिक सुकाणू समितीने केलेल्या शिफारसींनुसार, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने सराव प्रात्यक्षिकांदरम्यान आढळलेल्या त्रुटींचे निराकरण करणे, या संकल्पनेवर एक-दिवसीय जाणिवजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नवी दिल्लीत पुसा इथल्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुलात 20 मार्च 2026 रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आरोग्यविषयक सज्जतेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावरील दोन सराव प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत ऑगस्ट 2024 मध्ये विषाणू युद्ध अभ्यास आणि नोव्हेंबर 2025 मध्ये विषाणूजन्य संक्रमण अभ्यास ही सराव प्रात्यक्षिके पार पडली होती. या सरावांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यसज्जता, विविध क्षेत्रांमधील समन्वय, प्रतिसाद देण्याची प्रयोगशाळांची व्यवस्था, जैवसुरक्षा आणि जैवसंरक्षण पद्धती तसेच आपत्कालीन दळणवळण विषयक मानक नियमावलीचे मूल्यमापन केले गेले होते.
या सराव प्रात्यक्षिकांमधून मिळालेल्या शिकवणीसंदर्भात विविध क्षेत्रांतील भागधारकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या कार्यशाळेचा प्राथमिक उद्देश होता. या सोबतच सराव प्रात्यक्षिकांदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी एक निश्चित आणि कालबद्ध आराखडा तयार करणे हा देखील या कार्यशाळेचा हेतू होता. यामुळे भारताची आरोग्यविषयक सज्जता आणि प्रतिसाद यंत्रणांना अधिक बळकटी देणे शक्य होणार आहे.
या कार्यशाळेत मुख्य मंत्रालये आणि संस्थांच्या 200 पेक्षा जास्त तज्ञ प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यात मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, राष्ट्रीय एक आरोग्य संस्था, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय कृषी संशोधन परिषद, पशुवैद्यकीय विद्यापीठे, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि तिसऱ्या श्रेणीतील देशभर विस्तारलेल्या जैव-सुरक्षा प्रयोगशाळा व्यवस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. याशिवाय एक आरोग्य मोहिमेचे राज्य समन्वय अधिकारी, राज्य पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेले राज्य सर्वेक्षण अधिकारी तसेच विविध महाविद्यालयांचे संशोधक विद्यार्थी देखील या कार्यशाळेला उपस्थित होते.

या कार्यशाळेत आजारांच्या प्रादुर्भावावरील प्रतिसादावर आधारित 'संक्रमण प्रतिरोध अभ्यास' (SPA) या संकल्पनेवरील एका टेबल टॉप प्रात्यक्षिकाचे आयोजन केले गेले होते. यासोबतच, एक्स कीटाणू संक्रमण – वैश्विक सुरक्षा: स्वाध्याय से अभ्यास तक (KS-VS-SAT) या संकल्पनेवरील आभासी प्रात्यक्षिकाचेही आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने या सरावांचे नियोजन केले होते.
या कार्यशाळेच्या समारोपावेळी सर्व सहभागींनी सराव प्रात्यक्षिकांदरम्यान आढळलेल्या त्रुटी कालबद्ध पद्धतीने दूर करणे, विविध विभागांमधील समन्वय विस्तारणे आणि एक आरोग्य आराखड्यांतर्गत भारताची सज्जता अधिक बळकट करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला.
***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243398)
अभ्यागत कक्ष : 24