विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युद्ध अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित होत असून पारंपरिक मानवी योद्ध्यांमधील लढाई हळूहळू कमी होत आहे : ‘अनस्टॉपेबल भारत 2026’ परिषदेत डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


अंतराळ क्षेत्रातील सुधारणांनंतर भारतातील अंतराळ स्टार्टअप परिसंस्था वेगाने विस्तारत आहे : डॉ. जितेंद्र सिंह

सरकार लहानपणापासून वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करत आहे; ‘विज्ञान ज्योती’सारख्या कार्यक्रमांमुळे मुलींना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे : डॉ. जितेंद्र सिंह

भारत तंत्रज्ञानाधिष्ठित राष्ट्रीय विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 15 MAR 2026 4:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत असून ते अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित होत आहे. पारंपरिक मानवी योद्ध्यांमधील लढाई   हळूहळू कमी होत असून प्रगत तंत्रज्ञान रणनीतिक तयारी आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये निर्णायक भूमिका बजावत आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित ‘ अनस्टॉपेबल भारत 2026 ’ या आल्टरनेट मिडीया कॉन्फरन्समधील फायर चॅट सत्रात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अंतराळ, अणुऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत वैज्ञानिक संशोधन यांसारखी क्षेत्रे भारताच्या भविष्यातील सुरक्षा संरचना आणि राष्ट्रीय विकास घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

अंतराळ क्षेत्रातील अलीकडील सुधारणांचा उल्लेख करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या क्षेत्रात खाजगी सहभाग आणि स्टार्टअपसाठी खुलेपणा निर्माण केल्यामुळे देशात नवोपक्रमाची सशक्त परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यांनी सांगितले की, आज भारतात अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप परिसंस्था वेगाने विस्तारत आहे आणि उद्योग, संशोधन संस्था आणि तरुण नवोन्मेषक यांच्यात वाढत्या सहकार्यामुळे येत्या काही वर्षांत देशाची अंतराळ अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे.

भारतात वैज्ञानिक प्रतिभेची कमतरता नाही, हे जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. सरकार नवोन्मेषाला सुरुवातीपासूनच प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकार सक्षम परिसंस्था निर्माण करण्याकरिता काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. शालेय आणि विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. विज्ञान ज्योती आणि इतर मार्गदर्शक उपक्रम तरुण विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना संशोधन आणि नवोन्मेषात संधी शोधण्यास मदत करत आहेत, असे ते म्हणाले.

तरुण विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता लवकर ओळखण्यास आणि संशोधनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यास प्रोत्साहित करून भारताचा वैज्ञानिक पाया मजबूत करण्याची गरज डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये जाण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी अधिक लवचिकता निर्माण झाली आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल परिवर्तनाच्या युगात ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की अणुऊर्जा भविष्यातील तंत्रज्ञानांना आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात अखंड आणि विश्वासार्ह वीजपुरवठा आवश्यक आहे. अणुऊर्जा ही स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा उपलब्ध करून देणारा स्रोत असून भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असेल, असे ते म्हणाले. 

आरोग्यसेवेत अणुविज्ञानाच्या वाढत्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. अणुवैद्यकशास्त्र कर्करोग आणि रक्त विकारांसह गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी नवीन शक्यता खुल्या करत आहे. तसेच, संशोधन वाढल्याने आणि उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढल्याने देशात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

भारत अशा टप्प्यात प्रवेश करत आहे जिथे सरकारी संस्था, खाजगी उद्योग आणि वैज्ञानिक समुदाय यांच्यातील सहकार्यामुळे संरक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला गती मिळेल आणि राष्ट्रीय क्षमता बळकट होतील, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2240404) अभ्यागत कक्ष : 22