आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते समर्पित आयुष दुकानाचे झेप्टो प्लॅटफॉर्मवर उद्घाटन

Posted On: 12 MAR 2026 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2026

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासमवेत झेप्टो या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर समर्पित आयुष स्टोअरचे उद्घाटन केले. हा उपक्रम आयुष एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (आयुषेक्ससिल) आणि झेप्टो यांच्यातील पारंपरिक भारतीय वेलनेस उत्पादनांची डिजिटल उपस्थिती आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेल्या सहकार्याचा एक भाग आहे.

समर्पित स्टोअरफ्रंटमध्ये अस्सल आयुष उत्पादनांची एक निवडक श्रेणी एकत्र आणली आहे - ज्यामुळे ग्राहकांना झेप्टोच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिलिव्हरी नेटवर्कद्वारे ते सहज मिळू शकतात.

या प्रसंगी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, “हे संयुक्त प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' ला प्रोत्साहन देण्याच्या तसेच भारताला वेलनेस आणि पारंपरिक औषधांसाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे.

आयुष उत्पादनांची डिजिटल पोहोच वाढवल्याने उत्पादक आणि व्यावसायिकांना आधुनिक ग्राहकांशी जोडण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर भारताच्या स्वदेशी वेलनेस क्षेत्राला बळकटी देण्याच्या व्यापक दृष्टिकोनाला पाठिंबा मिळेल. त्याचबरोबर आयुष क्षेत्राच्या प्रचारासाठी ही कल्पना मांडल्याबद्दल, या उच्च प्राधान्याच्या राष्ट्रीय उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल झेप्टो या युवा भारतीय स्टार्टअपचे केंद्रीय मंत्र्यांनी आभार मानले.”

आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, हा उपक्रम म्हणजे पारंपरिक आरोग्य कल्याण प्रणालींना समकालीन डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मसह एकत्रित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे समग्र आरोग्य उपाय शोधणाऱ्या ग्राहकांना अधिक दृश्यमानता आणि सुविधा मिळेल.

या भागीदारीबद्दल भाष्य करताना झेप्टोचे मुख्य धोरण अधिकारी रचित रंजन म्हणाले, "एक युवा  भारतीय स्टार्टअप म्हणून, संपूर्ण आयुष श्रेणीची पोहोच  सुलभ करण्यासाठी आमच्या तंत्रज्ञानाचा आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कचा वापर करणे ही आमची मुख्य वचनबद्धता आहे. आयुष स्टोअरफ्रंट ही समग्र आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण झेप आहे, ही उत्पादने काही मिनिटांतच ग्राहकांकडे पोहोचवली जातात.”

शिवाय, या उपक्रमामुळे आयुष उत्पादकांना आपली डिजिटल उपस्थिती वाढविण्यास मदत होईल आणि ग्राहकांना पारंपरिक वेलनेस उत्पादने सोयीस्करपणे उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2239316) अभ्यागत कक्ष : 7