पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयटीबी बर्लिन 2026 मध्ये पर्यटन तसेच शाश्वत प्रवास यांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने जर्मनी आणि इंडोनेशिया या देशांबरोबर भारताच्या द्विपक्षीय बैठका

Posted On: 10 MAR 2026 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

जर्मनीत मेस्से बर्लिन येथे 3 ते 5 मार्च दरम्यान आयोजित आयटीबी बर्लिन 2026मध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने भाग घेतला. जगातील आघाडीचा पर्यटन व्यापार विषयक मेळावा असलेला आयटीबी बर्लिन (इंटरनॅशनल टुरीस्मस-बोर्से बर्लिन) हा कार्यक्रम जगभरातील पर्यटन उद्योगांसाठी एकत्र येण्याचा महत्त्वाचा मेळावा असून याद्वारे भारतातील प्रवासी क्षेत्रातील भागधारकांना संबंध वाढवण्यासाठी आणि परस्पर देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

देशभरातील पर्यटनस्थळ व्यवस्थापक कंपन्या (डीएससीज), हॉटेल व्यावसायिक, राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासने तसेच सहल आयोजकांचा समावेश असलेल्या प्रतिनिधीमंडळासह भारताने या कार्यक्रमात भाग घेतला. भारतीय राजदूत अजित गुप्ते यांच्या उपस्थितीत, केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

त्यानंतर, लोकांमधील परस्परसंबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी इंडोनेशियाच्या पर्यटनमंत्री विदियंती पुत्री वर्धना तसेच जर्मनीचे पर्यटनविषयक सरकारी आयुक्त डॉ.ख्रिस्तोफ प्लॉब यांच्यासह फलदायी द्विपक्षीय बैठका घेतल्या. यामधील चर्चेत  पर्यटनाचा ओघ वाढवणे, शाश्वत प्रवासाला चालना देणे, हवाई संपर्क विस्तार आणि देशांदरम्यान जनतेमधील परस्पर संबंध दृढ करणे इत्यादी मुद्द्यांवर अधिक भर देण्यात आला.केंद्रीय मंत्र्यांनी युएनडब्ल्यूटीओच्या महासचिव शेखा अल नोवैस यांची देखील भेट घेतली आणि शाश्वत पर्यटन विकास तसेच पुनरुत्पादक पर्यटन वाढवण्यासाठीच्या विविध मार्गांबाबत विचारविनिमय केला.

  

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय पर्यटनमंत्री म्हणाले की, जर्मनी हा  भारताच्या सर्वात महत्त्वाच्या पर्यटन भागीदारांपैकी एक देश आहे. जर्मनी हा भारतासाठी आठव्या क्रमांकाचा सर्वात मोठा पर्यटक  बाजारपेठ असलेला देश असून वर्ष 2025 मध्ये जर्मनीतून भारतात तब्बल 260,000 परदेशी पर्यटकांनी भेट दिली.

आयटीबी बर्लिन येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी नेटफ्लिक्सतर्फे पर्यटन मंत्रालयासाठी तयार करण्यात आलेल्या दोन लघुपटांचे अनावरण केले. यापैकी एका लघुपटात भारताची विविधरंगी संस्कृती, जिवंत परंपरा, उत्सव आणि कालातीत वारशाचे दर्शन घडते तर दुसऱ्या लघुपटातून भारतीय पाककलेचे समृद्ध रस आणि वैविध्य यांची माहिती मिळते. जगातील प्रेक्षकांना भारतीय पर्यटनस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नेटफ्लिक्सशी भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत अतुल्य भारत आणि नेटफ्लिक्स वर्षभरात दहा छोटे जाहिरातपर व्हिडीओज तयार करणार आहे.

सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2237542) अभ्यागत कक्ष : 12