युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
“संपर्क से संवाद, संवाद से समाधान आणि समाधान से संकल्प” या विचारासह माय भारत चिंतन शिबिराची सांगता
Posted On:
07 MAR 2026 6:30PM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागातर्फे आयोजित दोन दिवसांच्या माय भारत – एनएसएस चिंतन शिबिराची आज बेंगळुरू येथील इन्स्टीट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसीन (इनस्टेम) संस्थेत सांगता झाली. माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी या शिबिरात विचारमंथन केले. विकसित भारत 2047 च्या दृष्टीने युवा संघटनांचे बळकटीकरण आणि कार्यक्रम अंमलबजावणीत सुधारणा याविषयी शिबिरात चर्चा करण्यात आली.

केंद्रिय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभागी होऊन आपले अनुभव सांगितले तसेच देशभरात युवा अभियानांच्या सशक्तीकरणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट उपायांची माहिती दिली.
शिबिरात पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेची मध्यवर्ती संकल्पना “संवाद से समाधान” अशी होती. याच आधारावर चर्चा पुढे नेत दुसऱ्या दिवशी समाधान से संकल्प या विचारावर भर देत कल्पना व विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठीच्या धोरणांबाबत विचारविनिमय करण्यात आला.

या चर्चासत्रांमधील सहभागींचे विशिष्ट संकल्पनेवर आधारित समुह तयार करण्यात आले होते. या समुहांनी युवा शक्ती मजबूत करणे आणि युवा विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांमधील समन्वय वाढविणे या उद्देशाने केलेल्या कामाविषयीचे सादरीकरण केले आणि काही शिफारसी सुचवल्या. या सादरीकरणानंतर प्रस्तावित धोरणांमध्ये अचूकता आणणे व त्याला अनुसरुन अंमलबजावणीबाबतचा दृष्टीकोन याविषयी एकत्रित विचारमंथन झाले.

उपस्थित अधिकारी आणि सहभागींना संबोधित करताना युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माय भारत व एनएसएसच्या जिल्हा व क्षेत्रिय कार्यालयांनी निधीपेक्षा कार्यक्षमतेवर भर द्यावा असे आवाहन केले. परिणामकारक अंमलबजावणी आणि तळागाळातील लोकांचा सहभाग ही अर्थपूर्ण युवा विकासाची गुरुकिल्ली आहे या मुद्द्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. ग्रामसभा पातळीपर्यंत पोहोचून युवा विकासाच्या योजना गावापर्यंत पोहोचतील याची काळजी घ्यावी आणि गावागावातील युवा पिढीला सक्षम करावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले.




योजनांच्या व्यापक अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींची दखल घेत त्या म्हणाल्या की, आव्हाने आणि अडचणी येतील परंतु त्यावर मात करायची असते. अधिकाऱ्यांनी निश्चयपूर्वक काम करत युवा सक्षमीकरणाच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी वचनबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
***
सुषमा काणे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2236453)
अभ्यागत कक्ष : 14