PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

एम्स ते आयजीएच : तरुण फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शनला बदलत आहेत शक्यतांमध्ये


तरुणांच्या नेतृत्वाखालील जनऔषधी केंद्रांमुळे मिळते आरोग्यसेवेला सहानुभूतीपूर्ण बळकटी

Posted On: 06 MAR 2026 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2026

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्सच्या गजबजलेल्या परिसरात, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजने अंतर्गत चालणाऱ्या जनऔषधी केंद्रात शांत पण ठाम असा बदलाचा प्रवाह जाणवतो. रुग्णालयातील लांबलचक रांगा आणि चिंतेने भरलेल्या वातावरणाच्या दरम्यान तरुण फार्मासिस्ट आश्वासक आधारस्तंभाप्रमाणे उभे आहेत. ते डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्यदायी दिलासा देतानाच त्यांना आर्थिकदृष्ट्याही मोठा फायदा मिळवून देत आहेत.

 

एक तरुण वरिष्ठ फार्मासिस्ट म्हणून संगीता ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सुरू झाल्यापासून जनऔषधी मिशनशी जोडल्या आहेत. लोकांची सेवा करण्याच्या इच्छेने त्यांनी जनऔषधी केंद्रात काम सुरू केले. दररोज सकाळी त्या नव्या उत्साहाने केंद्रात येतात आणि आपले काम मनापासून करतात. आपल्या कामातील एक प्रसंग सांगताना त्या म्हणतात, जेव्हा रुग्ण डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी घेऊन केंद्रात येतात, तेव्हा ते अनेकदा थकलेले आणि चिंतेत दिसतात. चिठ्ठी देताना त्यांच्या मनात औषधांचा खर्च जास्त होईल की काय, अशी भीती असते. पण जेव्हा त्यांना कळते की, येथे औषधे स्वस्त दरात मिळतात, तेव्हा त्यांचा बराचसा ताण कमी होतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि ते हसतच निघून जातात. हे हसूच आम्हाला काम करण्याची नवी प्रेरणा देते.

 

हे केंद्र दररोज सुमारे 150 ते 200 ग्राहकांना सेवा देते. सकाळच्या वेळेत विशेषतः जास्त गर्दी असते आणि लवकरच लांब रांगा लागतात. संगीता यांच्यासोबत काम करणारे इतर कर्मचारीही प्रामुख्याने तरुण आहेत. ते सर्वजण सेवा सुरळीत चालावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. डॉक्टरांच्या औषधांच्या चिठ्ठ्या तपासणे, औषधांचे व्यवस्थापन करणे, औषधांचे बिल तयार करणे आणि रुग्णांना संयमाने मार्गदर्शन करणे अशी अनेक कामे ते करतात. दिवसभर कामाची धावपळ असली तरी त्यांचा उद्देश एकच आहे, सर्वांना परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे.

 

अशीच सेवा करण्याची भावना तरुण फार्मासिस्ट वरुण अग्रवाल यांच्यामध्येही दिसून येते. त्यांनी नुकतेच फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असताना त्यांना जनऔषधी उपक्रमाबद्दल माहिती मिळाली आणि या मिशनमध्ये योगदान देण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. आज ते अभिमानाने या केंद्रात सेवा देत आहेत. वरुण सांगतात, पूर्वीच्या तुलनेत आता लोक औषधांबद्दल आणि जनरिक पर्यायांबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे आशेने पाहतात. आम्ही त्यांना मदत करण्याचा आणि सर्व गोष्टी स्पष्टपणे समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास आम्हाला रोज नवी प्रेरणा देतो.

 

इंदिरा गांधी हॉस्पिटल येथील जनऔषधी केंद्राचे फार्मासिस्ट आणि व्यवस्थापक पियूष यांना या मिशनचा भाग होणे आपले भाग्य वाटते. हे केंद्र दररोज सुमारे 150 ते 200 ग्राहकांना सेवा देते. यावरून परवडणाऱ्या आरोग्यसेवेबद्दल लोकांचा वाढता विश्वास दिसून येतो. ते म्हणतात, “जनऔषधीचा भाग असणे म्हणजे फक्त औषधे देणे नाही. येथे येणारा प्रत्येक जण काही ना काही चिंतेत असतो; पण बाहेर जाताना त्याला दिलासा मिळालेला असतो. लोकांच्या मनात घडणारा हा बदलच आमचे काम खऱ्या अर्थाने सार्थक बनवतो.

 

इंदिरा गांधी हॉस्पिटल येथील जनऔषधी केंद्रात आणखी एक तरुण फार्मासिस्ट हिमांशु कुमार यांचीही अशीच समर्पणाची कहाणी आहे. दररोज ते पूर्ण उत्साहाने केंद्रात येतात आणि लोकांना मदत करून सेवा देतात. त्यांच्या सोबत आणखी चार तरुण कर्मचारी काम पाहतात. त्यापैकी दोघे बिलिंगची जबाबदारी सांभाळतात, तर दोघे औषध वितरणाची देखरेख करतात. दिल्ली मध्ये असलेल्या सुमारे 600 जनऔषधी केंद्रांपैकी जवळपास 70 टक्के कर्मचारी तरुण आहेत. यावरून या सेवांमध्ये तरुणांची महत्त्वाची भूमिका दिसून येते. ही अशी ठिकाणे आहेत जिथे चिंता कमी होऊन आश्वासन मिळते, परवडणाऱ्या किमतीमुळे लोकांचा आत्मसन्मान टिकून राहतो आणि तरुण व्यावसायिक आपले करिअर समाजसेवेशी जोडत आहेत. रुग्णांच्या डोळ्यांतील समाधानाची चमक आणि तरुण फार्मासिस्टांचा आत्मविश्वास यामध्ये जनऔषधी केंद्रांची खरी भावना दिसून येते. चांगले आरोग्य आणि आशेची भावना यांचा संगम या केंद्रांमध्ये स्पष्टपणे जाणवतो.

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

नितीन फुल्लुके /राज दळेकर/प्रिती मालंडकर
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2235914) अभ्यागत कक्ष : 16