पंतप्रधान कार्यालय
फिनलँडच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
Posted On:
05 MAR 2026 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
महामहीम, राष्ट्रपती स्टुब्ब,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यम क्षेत्रातील सहकाऱ्यांनो,
नमस्कार! तेर-वे
फिनलँडचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती स्टुब्ब यांचे मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रपती स्टुब्ब हे केवळ एक प्रसिद्ध जागतिक नेतेच नाहीत, तर ते एक सन्माननीय विचारवंत आणि लेखक देखील आहेत.
महामहीम, आपल्यासारख्या अनुभवी आणि चतुरस्त्र नेत्याने या वर्षीच्या रायसीना संवादाचे प्रमुख पाहुणे होणे, ही आमच्यासाठी अतिशय सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
मित्रहो,
आज संपूर्ण जग एका अस्थिर आणि अनिश्चिततेच्या कालखंडातून जात आहे. युक्रेनपासून ते पश्चिम आशियापर्यंत जगाच्या अनेक भागांत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा जागतिक परिस्थितीत, भारत आणि युरोप या जगातील दोन मोठ्या राजनैतिक शक्ती, आपल्या संबंधांच्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. आपले वाढते सहकार्य जागतिक स्थैर्य, विकास आणि सामायिक समृद्धीला नवी बळकटी देत आहे.
मित्रहो,
वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच ऐतिहासिक भारत - युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार झाला. या करारामुळे भारत आणि फिनलँडमधील व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला अधिक बळकटी मिळेल. डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रांत भारत आणि फिनलँड हे महत्त्वाचे भागीदार आहेत.
नोकियाच्या मोबाईल फोन आणि टेलिकॉम नेटवर्कने कोट्यवधी भारतीयांना परस्परांशी जोडले आहे. फिनलँडच्या वास्तुविशारदांच्या सहकार्याने आम्ही चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारला आहे. फिनलँडसोबतच्या भागीदारीतून आम्ही नुमालीगड इथे जगातील सर्वात मोठी बॅम्बू टू बायो-इथेनॉल रिफायनरी देखील उभारली आहे.
मित्रहो,
अशा महत्त्वाच्या उदाहरणांची प्रेरणा असलेल्या, राष्ट्रपती स्टुब्ब यांच्या या भेटीदरम्यान, आम्ही भारत-फिनलँड संबंधांना डिजिटलायझेशन आणि शाश्वतता क्षेत्रात एका धोरणात्मक भागीदारीचं रूप देत आहोत. या भागीदारीमुळे, कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते 6G टेलिकॉमपर्यंत आणि हरित ऊर्जेपासून ते क्वांटम कॉम्प्युटिंगपर्यंत अनेक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांतील आमच्या सहकार्याला वेग आणि नवी ऊर्जा मिळेल.
त्याचबरोबर संरक्षण, अंतराळ, सेमीकंडक्टर आणि अत्यावश्यक खनिजे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी देखील अधिक दृढ होईल. भारत आणि फिनलँडसारख्या लोकशाहीवादी आणि जबाबदार देशांसोबतची ही धोरणात्मक भागीदारी, संपूर्ण जगासाठी विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीची सुनिश्चित करण्यात मोलाचे योगदान देईल.
मित्रहो,
भारतीय विद्यार्थी व त्यांच्यातील प्रतिभेसाठी फिनलँड एक प्राधान्याचे ठिकाण बनत आहे. दोन्ही देशांच्या नवोन्मेषाला चालना देणाऱ्या व्यवस्थांना जोडण्यासाठी आज आम्ही फिनलँडसोबत एक व्यापक स्थलांतर व गतिशीलता करार केला आहे.
यासोबतच, आम्ही संयुक्त संशोधन आणि स्टार्ट-अपमधील सहयोगाला बळकटी देण्यासाठी पुढे जात आहोत. शिक्षण क्षेत्रात फिनलँड आदर्श मानला जातो. आज आम्ही शिक्षक प्रशिक्षण, शाळांदरम्यान भागीदारी आणि शिक्षणाच्या भवितव्यासाठी संशोधनात सहकार्य वाढवण्याला सहमती दर्शवली आहे.
म्हणजेच, शाळेपासून उद्योगक्षेत्रापर्यंत मनुष्यबळ विकासाच्या प्रत्येक स्तरावर आम्ही आमचे सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने पुढे जात आहोत.
मित्रहो,
नॉर्डिक प्रदेशात फिनलँड हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. आम्ही फिनलँडसोबत आर्क्टिक आणि ध्रुवीय प्रदेशातील संशोधन क्षेत्रातही सहकार्य वाढवत आहोत.
आरोग्यपूर्ण पृथ्वी राखण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य आहे. यावर्षी फिनलँडबरोबर भारतात जागतिक चक्रीय आर्थिक मंचाचे आयोजन करणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे शाश्वततेप्रती आमच्या प्रयत्नांना नवी गती आणि नवे विचार मिळतील.
मित्रहो,
भारत आणि फिनलँड हे दोन्ही देश कायदा, संवाद आणि राजकीय शिष्टाचारावर विश्वास ठेवतात. केवळ लष्करी संघर्षातून कोणत्याही समस्येचे समाधान होऊ शकत नाही, याबाबत आमच्यात एकमत आहे. युक्रेन असो किंवा पश्चिम आशिया, संघर्षाचा अंत लवकरात लवकर व्हावा यासाठी व शांततेसाठी होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला आमचे समर्थन राहील. तसेच जगातील वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे, ही तातडीची गरज आहे, यावरही आमचे एकमत आहे. कोणत्याही रुपातील दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याप्रति आम्ही दोन्ही देश वचनबद्ध आहोत.
अध्यक्ष महोदय,
आपण आयर्नमॅन ट्राएथलॉन पूर्ण केली आहे. आपल्यासारख्या सशक्त नेत्याबरोबर आम्ही भारत आणि फिनलँडच्या नवोन्मेष, डिजिटल व शाश्वतता अशा तीन क्षेत्रांच्या ट्राएथलॉननमध्ये यश मिळवू.
चला, भारत-फिनलँडच्या या भविष्याभिमुख भागीदारीत एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात करू. खूप-खूप धन्यवाद.
शैलेश पाटील/तुषार पवार/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235679)
अभ्यागत कक्ष : 64
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam