दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये सहभागी होत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी केले भारताचे नेतृत्व
मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये किफायतशीर आणि बुद्धिमान कनेक्टिव्हिटीसाठी मांडला भारताचा दृष्टिकोन
भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन आणि आयएमसी 2026 कर्टन रेझरचे केले अनावरण
Posted On:
04 MAR 2026 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2026
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी स्पेनमधील बार्सिलोना येथे मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये भारताचे नेतृत्व केले. यावेळी जीएसएमए मंत्रीस्तरीय कार्यक्रम आणि एमडब्ल्यूसी मुख्य मंचावर उच्चस्तरीय सहभाग नोंदवत परवडणाऱ्या, समावेशक आणि भविष्यासाठी तयार डिजिटल कनेक्टिव्हिटीबद्दल भारताचा दृष्टिकोन मांडला.
जीएसएमए मंत्रिस्तरीय कार्यक्रमात समारोपाचे मुख्य भाषण: “खर्चासंबंधी अडथळे दूर करणे”
“खर्चातील अडथळा दूर करणे” या विषयावरील सत्रादरम्यान सिंधिया यांनी मंत्रिस्तरीय मंचावर समारोपाचे मुख्य भाषण केले. या सत्रात किफायतशीरता संबंधी आव्हानांना सामोरे जाण्यावर भर देण्यात आला ज्यामुळे जागतिक स्तरावर 3.1अब्ज लोक अर्थपूर्ण डिजिटल सहभागापासून वंचित राहिले आहेत.
वापरातील तफावत भरून काढण्याची निकड अधोरेखित करत, मंत्र्यांनी नमूद केले की उपकरणे आणि सेवांची परवडणारी क्षमता डिजिटल समावेशनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
"जर कनेक्टिव्हिटीला खरोखरच परिवर्तनकारी बनवायचे असेल तर ती सर्वांसाठी परवडणारी बनवायला हवी. तंत्रज्ञानाचा अभाव हे आपल्यासमोरील आव्हान नाही, तर खर्चासंबंधी अडथळे आहेत जे अब्जावधी लोकांना डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यापासून रोखत आहेत," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
धोरणात्मक सुधारणा, स्पर्धा आणि व्यापक पोहोच या माध्यमातून डेटा खर्च कमी करण्याचा भारताचा अनुभव अधोरेखित करत ते म्हणाले, "भारताचा डिजिटल प्रवास हे दर्शवितो की व्यापक पोहोच , नवोन्मेष आणि स्थिर धोरण चौकटी खर्च लक्षणीयरित्या कमी करू शकतात. पुढील पिढीतील कनेक्टिव्हिटी - 5G ते उदयोन्मुख 6G परिसंस्थांपर्यंत - परवडणारी, समावेशक आणि व्यापक पोहोचयोग्य राहील याची खात्री करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे . ”
सिंधिया यांनी उपकरणांचा किफायतशीरपणा, नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा मॉडेल आणि शाश्वत डिजिटल परिसंस्था याला चालना देण्यासाठी सरकार, उद्योग, वित्तीय संस्था आणि जागतिक संस्था यांचा समावेश असलेला समन्वित, बहु-भागधारक दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन केले.
एमडब्ल्यूसी बीजभाषण: ‘बिल्ट फॉर व्हॉट्स नेक्स्ट’

त्यानंतर, केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी "बिल्ट फॉर व्हॉट्स नेक्स्ट" या विषयावरील एमडब्ल्यूसी च्या प्रमुख सत्राला संबोधित केले. हे भाषण एआय, क्लाऊड-नेटिव्ह तंत्रज्ञान आणि पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांचे समर्थन असलेल्या बुद्धिमान, लवचिक आणि मानव-केंद्रित व्यासपीठावरील नेटवर्क्सच्या उत्क्रांतीवर केंद्रित होते.
केंद्रीय मंत्र्यांनी कनेक्टिव्हिटी हे केवळ एक साधन न राहता, संधीचे शक्तिशाली इंजिन बनण्यापर्यंतचा विकास अधोरेखित केला, ज्यामुळे नवोन्मेष, आर्थिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळाली.
या भाषणात सुरक्षित, विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन

भारताची विस्तारणारी दूरसंचार उत्पादन क्षमता आणि नवोन्मेष परिसंस्थेचे दर्शन घडवणाऱ्या भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन, हे आणखी एक वैशिष्ट्य होते. यंदा 40 भारतीय कंपन्या आणि नवोन्मेषक या दालनात एमडब्ल्यूसी मध्ये सहभागी होत आहेत.
हे पॅव्हेलियन, डिझाइन-आधारित उत्पादन केंद्र आणि किफायतशीर आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी उपाय यामधील विश्वासू जागतिक भागीदार म्हणून भारताचा उदय प्रतिबिंबित करते.
आयएमसी 2026 चा कर्टन रेझर


केंद्रीय मंत्र्यांनी जीएसएमए इनसाइट्स हब येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 च्या कर्टन रेझरचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथे 7 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयएमसी 2026 चे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यामुळे प्रगत दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे नेटवर्क आणि उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञानातील सहकार्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.
तेजस नेटवर्क्स येथे शुभारंभ
तेजस नेटवर्क्सच्या बूथला दिलेल्या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी टीजे 1600-डी3 हायपर-स्केलेबल डीसीआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला. - जो भारतात विकसित केलेल्या प्रगत ऑप्टिकल नेटवर्किंग उपायांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सुरुवातीने उच्च-क्षमतेच्या डेटा सेंटर इंटरकनेक्ट तंत्रज्ञानातील भारताच्या वाढत्या क्षमता अधोरेखित झाल्या.
धोरणात्मक बैठका आणि तंत्रज्ञान संवाद

केंद्रीय मंत्र्यांना एमडब्ल्यूसी अरेना येथील भेटी दरम्यान, आयटीयूच्या सरचिटणीस डोरेन बोगदान-मार्टिन यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.



* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235379)
अभ्यागत कक्ष : 58