रेल्वे मंत्रालय
होळीनिमित्त भारतीय रेल्वेकडून लाखो प्रवाशांसाठी प्रभावी व्यवस्था
पश्चिम रेल्वेकडून 23 लाखांहून अधिक प्रवाशांची सोय
Posted On:
02 MAR 2026 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे विभागांमध्ये सुयोग्य नियोजन आणि समन्वयातून विशेष व्यवस्था केली.
होळीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीदरम्यान पश्चिम रेल्वेने तीन दिवसांत एकूण 23,03,445 प्रवाशांची वाहतूक केली. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी 13,66,545 प्रवाशांनी प्रवास केला, 28 फेब्रुवारी रोजी 4,51,604 प्रवासी तर 1 मार्च रोजी 4,85,296 प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, 1 मार्च रोजी एकट्या उधना स्थानकावरून सुमारे 20,000 प्रवासी रवाना झाले. यावरून सणासुदीच्या काळातील रेल्वेतील मोठी गर्दी आणि तिचे प्रभावी व्यवस्थापन दिसून येते.
होळीच्या काळातील प्रचंड गर्दी आणि उष्णतेचा विचार करून पश्चिम रेल्वेने उधना स्थानकावर विशेष उपक्रम राबवला. सुमारे 3,000 पॅकबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करून प्रवाशांना तात्काळ दिलासा देण्यात आला. या उपक्रमामुळे प्रवास अधिक सुसह्य झाला असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सेवाभावी दृष्टिकोनाचे कौतुक केले.
होळीच्या गर्दीदरम्यान मध्य रेल्वेने केलेल्या विशेष तयारीचे आणि शिस्तबद्ध गर्दी व्यवस्थापनाचेही प्रवाशांनी स्वागत केले. सुरक्षित चढ-उतार व्यवस्था आणि स्पष्ट मार्गदर्शनामुळे प्रवास सुलभ आणि तणावरहित झाल्याचे प्रवाशांनी नमूद केले.
वाढलेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वतंत्र गर्दी नियंत्रण उपाययोजना आणि नेटकी रांग व्यवस्था राबवण्यात आली. प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास मिळावा, याला मध्य रेल्वेने प्राधान्य दिले.
होळी विशेष गाड्यांमुळे कामगार, विद्यार्थी, नोकरदार, रोजंदारी कामगार आदी सामान्य प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी निश्चित आसनांची सुविधा उपलब्ध झाली आहे. नियमित गाड्यांवरील ताण कमी करून या विशेष गाड्या कुटुंबांसह सण साजरा करण्यासाठी वेळेत आणि तणावरहित प्रवास सुनिश्चित करत आहेत.
प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ लक्षात घेऊन 25.02.2026 ते 18.03.2026 या कालावधीत विविध रेल्वे विभागांमध्ये एकूण 1244 होळी विशेष फेऱ्या चालवण्यात येत आहेत. अतिरिक्त मागणी आढळल्यास या फेऱ्यांची संख्या 1500 पर्यंत वाढवली जाऊ शकते.
सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234800)
अभ्यागत कक्ष : 9