युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशव्यापी ‘अस्मिता लीग’ची केली घोषणा; खेलो इंडिया व माय भारत यांचा संयुक्त उपक्रम

Posted On: 02 MAR 2026 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा  खडसे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी देशभरात 250 ठिकाणी ‘अस्मिता’ (Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action) कार्यक्रमांतर्गत भव्य देशव्यापी ॲथलेटिक्स लीग आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, 13 वर्षांखालील, 13 ते 18 वर्षे आणि 18 वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये 100 मी., 200 मी. आणि 400 मी. धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील, असे रक्षा खडसे यांनी सांगितले. 

नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.“देशभरातील तरुणींना एकत्र आणण्याची ही उत्तम संधी आहे. संपूर्ण देशात लोकप्रिय होत असलेल्या ‘अस्मिता’ मंचाचा यासाठी प्रभावी वापर केला जाणार आहे,”असे त्या म्हणाल्या. 

‘अस्मिता’ हा उपक्रम महिलांमध्ये क्रीडा प्रोत्साहनासाठी ‘खेलो इंडिया’च्या लिंग-तटस्थ ध्येयाचा भाग आहे.

या स्पर्धांमध्ये प्रत्येक ठिकाणी 5 तांत्रिक अधिकारी, 10 स्वयंसेवक, एक स्पर्धा व्यवस्थापक, एक माजी विजेती खेळाडू (पीसीए) आणि जिल्हा युवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल. एका दिवसात सुमारे 2,50,000 महिला सहभागी होण्याची अपेक्षा असून, हा विक्रमी सहभाग ठरणार आहे.

हा उपक्रम माय भारत, खेलो इंडिया केंद्रे (केआयसी), एसएआय परिसंस्था व राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (एनसीओई), राज्य व जिल्हा क्रीडा संघटना तसेच जिल्हा युवा अधिकारी (डीवायओ) यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

30 पेक्षा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही लीग आयोजित केली जाणार असून यात ईशान्येकडील राज्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.“गावे आणि लहान शहरांतील अधिकाधिक मुलींनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल,” असे रक्षा खडसे यांनी नमूद केले.   


सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


   


(Release ID: 2234763) अभ्यागत कक्ष : 7