पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

गुजरातमध्ये मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 28 FEB 2026 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2026

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा,अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेनंतर आजआपण येथे आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनत आहोत. एआय परिषदेने जगाला भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेची ओळख करून दिली, आजचादिवस हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा आणखीएक वस्तुपाठ आहे.

मित्रहो,
फार दूरची गोष्ट नाही, 10-11 वर्षांपूर्वीपर्यंत भारतात डेटा आणि चिप्सची चर्चा अत्यंत मर्यादित वर्तुळात असे. तंत्रज्ञानाबाबत बोलायचे झाले तरअनेकदा आपली चर्चा आयटी सेवांशी संबंधित असायची. आणि आज बघा,
सॉफ्टवेअरसाठी ओळखला जाणारा भारत आता हार्डवेअरच्या क्षेत्रातही आपली ओळख मजबूत करत आहे. आज आपण साणंद मध्ये एका नव्या भविष्याच्या उदयाचे साक्षीदार बनत आहोत. मायक्रॉनच्या एटीएमपी सुविधेत व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यामुळे जागतिक तंत्रज्ञान मूल्य साखळीत भारताची भूमिका अधिक मजबूत होणार आहे.

मित्रहो,
आज भारत वेगाने जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीचा भाग बनत आहे. मी मायक्रॉनच्या संपूर्ण टीमचे, भूपेंद्रभाईंच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारचे, सर्व अभियंते, तंत्रज्ञ, कामगार यांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,
मायक्रॉनची ही सुविधा भारताच्या नव्या विचारांचे देखील उत्तम उदाहरण आहे.आजचा भारत धोरणापासून, ते उत्पादनापर्यंत कोणता दृष्टीकोन घेऊन पुढे जात आहे, ते इथे दिसून येते. आपल्याला आठवत असेल, जून 2023 मध्ये या सुविधेसाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये साणंद येथील सुविधेची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये येथील प्रायोगिक तत्ववारील केंद्रात यंत्रे बसवण्यास सुरुवात झाली. आणि आज, फेब्रुवारी 2026 मध्ये, या सुविधेत व्यावसायिक उत्पादनही सुरू झाले.

मित्रहो,
जो कोणी या क्षेत्राकडे पाहील, समजून घेईल त्याला या वेगाचा अर्थ काय आहे, हे कळेल. जगातील विकसित देशांमध्येही
डव्हान्स प्राइसिंग करारांना अंतिम स्वरूप द्यायला तीन ते पाच वर्षे लागतात. ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण भारताने काही महिन्यांतच ती पूर्ण केली. जेव्हा हेतू स्वच्छ असतो, निष्ठा देशाच्या गतिमान विकासाप्रती असते, तेव्हा धोरण देखील स्पष्ट होते आणि निर्णयांना गती देखील मिळते.

मित्रहो,
मायक्रॉनच्या नेतृत्वाचेही मी आभार मानतो. माझे मित्र संजय यांचे जेवढे अभिनंदन करावे, ते कमीच आहे. आज संजयने मला आश्चर्यचकित केले. आम्ही भेटतो तेव्हा संजय क्वचितच बोलत असले, तरी, आज त्यांचे भाषण ऐकून मला एका वेगळ्याच संजयची ओळख झाली. त्यांनी भारतावर कायम विश्वास ठेवला. संजय यांची मी विशेष प्रशंसा करू इच्छितो. मला आठवतं, की गेली अनेक वर्षे ते जेव्हा ते भेटले त्यावेळी ते भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेबद्दल खूप उत्साहाने बोलायचे. आज त्यांचे नेतृत्व, भारतावरील त्यांचा विश्वास येथे नवी उंची गाठताना दिसत आहे. राजदूत गोर हेदेखील भारतात नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गुजरातमध्ये आले आहेत. आणि आज ते सदिच्छादूत म्हणून आल्यावर त्यांच्याशी माझी पहिलीच भेट होत आहे, आणि ती देखील  माझ्या कर्मभूमीमध्ये. मला खात्री आहे की तुम्ही आमच्या आदरातिथ्याचा पुरेपूरआनंद घ्याल.

मित्रहो,
मायक्रॉनची ही सुविधा आणि आजचा हा कार्यक्रम, भारत आणि अमेरिकेदरम्यानचे मजबूत सहकार्य आणि भागीदारीची साक्षही आहे. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चिप्स सारख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी खूप महत्त्वाची आहे. मानवतेच्या उज्ज्वल भविष्याशी संबंधित या दोन तंत्रज्ञानाची पुरवठा साखळी आज संपूर्ण जगाला सुरक्षित करायच्या आहेत, आणि जगातील दोन सर्वात मोठे लोकशाही देश भारत आणि अमेरिका यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेदरम्यान भारत आणि अमेरिकेत झालेला पॅक्स सिलिकावरील करार हा या दिशेने आणखी एक प्रयत्न आहे. आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जागतिक पुरवठा साखळी देखील अधिक सुरक्षित, अधिक विश्वासार्ह बनेल.

मित्रहो,
20 व्या शतकापर्यंत जगाने औद्योगिक क्रांतीचा काळ पाहिला. त्या काळात जे देश कारखाने, यंत्रे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात पुढे होते, त्यांनी वेगाने प्रगती केली. मात्र हे शतक एआय क्रांतीचे शतक आहे. या बदलासाठी सेमीकंडक्टर हा एक मोठा दुवा आहे. औद्योगिक क्रांती आणि एआय क्रांती या दोन्ही गोष्टींना जोडणारे एक माध्यम म्हणजे छोटी चिप. जर गेल्या शतकाचे नियंत्रक तेल होते, तर या शतकाच्या नियंत्रक मायक्रो-चिप्स असतील.

मित्रहो,
याच विचाराने भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात वेगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा जग कोविडच्या लाटेशी झुंजत होते, तेव्हा भारताने सेमीकंडक्टर मिशनची घोषणा केली होती. त्या वेळी इथे
बसलेले अनेक सहकारी, वेगवेगळे गट एकापाठोपाठ एक बैठका घेत होते. साथीच्या आजाराच्या काळात, सर्व काही विखुरल्यासारखे वाटले. परंतु आम्ही आत्मविश्वासाने पेरलेली बीजे आता वाढत आहेत आणि फळ देत आहेत.

मित्रहो,
सेमीकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी मायक्रॉन वगळता आणखी तीन प्रकल्पांचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. आणि आपण जी सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करत आहोत ती केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नाही तर ती पॅन इंडिया आहे. म्हणजेच विकसित भारताची नवीन तंत्रज्ञान केंद्रे देशाच्या प्रत्येक भागात विकसित केली जात आहेत. साणंद व्यतिरिक्त धोलेरामध्येही खूप मोठ्या स्तरावर काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातल्या नोएडा येथेही एका नवीन सुविधेचे काम सुरू करण्यात आले आहे. आसाम, ओदिशा आणि पंजाबमध्येही सेमीकंडक्टर युनिट्स वर काम सुरू आहे.

मित्रहो,
आज संपूर्ण जगातील गुंवतणुकदारांसाठी भारताचा एकच संदेश आहे, तो म्हणजे भारत सज्ज आहे, भारत विश्वासार्ह आहे आणि भारत करून दाखवतो.

मित्रांनो,
तुम्हाला माहिती आहे की, सेमीकंडक्टर  म्हणजे अर्धसंवाहक परिसंस्थेचा अर्थ फक्त एक फॅक्ट्री  नसतो. तर ही परिसंस्था आहे. यामध्ये यंत्र तयार करणारे, डिझाईन करणारे इंजिनीअर, संशोधन संस्था, वाहतूक यंत्रणा, अशा सर्व गोष्टींचा समावेश असतो. या सर्वांमध्ये संतुलन साधून एक चिप तयार होते. भारतही अर्धसंवाहक परिसंस्थेची संपूर्ण श्रृंखला विकसित करण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही  ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन-2.0‘ ची घोषणा केली आहे. यामागचा उद्देश्यही श्रृंखला विकसित करणे हाच आहे. जसजसे उत्पादन वाढेल, तसतसे भारतामध्येच सर्व सामुग्री, सुटे भाग आणि सेवा यांना मागणी वाढत जाईल. ही सर्वात मोठी संधी आहे.

मित्रांनो,
भारतचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, आमच्या उत्पादनाविषयीच्या असलेल्या मोठ्या महत्वाकांक्षा हा आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येपैकी खूप मोठ्या प्रमाणावर अशी जनता आहे की, त्यांनी इलेक्ट्रॉनिक साधनांचा पहिल्यांदा वापर सुरू केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स  असो, ऑटोमोबाइल असो, अथवा इतर कोणतेही तंत्रज्ञान असो, भारतामध्ये अशा सर्व गोष्टींना सातत्याने मागणी वाढत जात आहे. आता भारत खूप वेगाने पुढे जात आहे.  आता आपले इलेक्ट्रॉनिक्स  क्षेत्रच पहा, गेल्या 11 वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये अनेकपट वाढ झाली आहे. आता भारत, यंत्राच्या सुट्या भागांपासून ते अंतिम टप्प्यावरच्या विक्रीसाठी सज्ज असलेल्या उत्पादनामध्ये सर्व काही देशतच बनवले जात आहे. जस-जसे इलेक्ट्रॅानिक्स घटकांच्या उत्पादनांची व्याप्ती वाढत जाईल, तसतशी अर्धसंवाहकांना असलेली देशांतर्गत मागणीही तितक्याच प्रमाणात वाढली आहे. याचा अर्थ भारतामध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी देशांतर्गत आणि वैश्विक संधी अशा दोन्ही गोष्टी उपलब्ध असणार आहे.

मित्रांनो,
साणंदच्या या संपूर्ण परिसराबरोबर मला  एक विशेष आपुलकी  आहे. साणंद ही अशी भूमी आहे की, ती मातीलाही सोने बनवते. ही गोष्‍ट मी स्वानुभवावरून सांगतो. आज जे लोक इथे आहेत, त्‍यापैकी  साणंदमधील काही मोजके लोक साणंदचे असतील.  एक काळ असा होता,  त्यावेळी मी बसने इथे येत असे आणि माझ्या सायकलवरून साणंदच्‍या गल्ली -बोळांतून, सर्व  रस्त्यावर फिरत असे. त्यावेळी हे  एक लहानसे  गाव  होते,  या इथल्‍या मधल्या भागातून मी सायकलने वरच्या बाजूला  जात होतो.  बराच काळ  हे माझे कामाचेही  ठिकाण होते  आणि माझ्या डोळ्यांदेखतच साणंदचे रूपांतर झाले. हे सर्व बदल मी पाहिले आहेत.  एकेकाळी साणंद लहानसे गाव  होते,  आता ते एका मोठ्या शहरात रूपांतरित होत आहे. आणि या सर्व परिवर्तनाचा प्रारंभ नेमका  कुठून सुरू झाला? तर एक रुपयाच्या  ‘एसएमएस’पासून.  फक्त एक रुपया. त्यावेळी मी  रतन टाटा यांना एसएमएस पाठवला, "स्वागतम, स्वागत आहे!" मी लिहिले होते, "स्वागतम." एका रुपयाची गुंतवणूक, पहा हा ‘गुज्जू’  काय करू शकतो.

मित्रांनो,
साणंदचे एका चारचाकी गाडीच्या कारखान्यातून देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल केंद्रामध्ये रूपांतरित होताना मी पाहिले आहे. आणि मला आठवते, ज्यावेळी सर्वप्रथम  एक मोठी ऑटोमोबाईल कंपनी येथे आली,  त्‍याला जोडूनच संपूर्ण परिसंस्था विकसित झाली. एकाच कंपनीच्या आगमनाने अनेक सहाय्यक विभाग  उदयास आले. पुरवठादार नेटवर्क स्थापन झाले, स्थानिक उद्योग बळकट झाले आणि रोजगार आणि गुंतवणूक दोन्ही वाढत गेले. आणि मला, देशाला आणि जगभरातून येथे काम करण्यासाठी येणाऱ्या मित्रांसह, या छोट्या गावाला अचानक जागतिक नकाशावर आपले स्थान मिळाले आहे. या गोष्‍टीचा  खरोखरीच मला अभिमान वाटतो. कदाचित आजही, तुम्हाला आवश्यक वाटत असणारी  विकास कामे आणि व्यवस्था तुमच्या मनात येत  असतील: "अमुक गोष्‍ट  असती तर छान झाले असते, किंवा अजून काहीतरी  असते तर अधिक छान झाले असते." असे वाटतही असेल.

आपल्या सर्वांना मी  खात्रीने- विश्‍वासाने सांगतो, माझ्या मित्रांनो, तुम्हाला हवी असलेली जीवनशैली, तुम्हाला जसे हवे तसे सामाजिक जीवन, तुम्ही ज्‍याप्रमाणे स्वत:चे  जीवन जगता, तसे ते निर्माण करून देण्‍याचे काम गुजराज करेल. आम्ही तुम्हाला कोणतीही कमतरता जाणवू देणार नाही. त्याचप्रमाणे, मायक्रोनची ही अग्रगण्य सुविधा एक नवीन परिसंस्था विस्तारणार आहे. मला विश्वास आहे की भविष्यात, साणंद अर्धवाहक क्षेत्रातही यशाचा एक नवीन लिहील.

मित्रांनो,
मायक्रॉनचे डी-रॅम आणि ‘नंद सोल्यूशन्स’  जगभरातील डेटा सेंटर्स, एआयअॅप्लिकेशन्स, मोबाईल डिव्हाइसेस आणि प्रगत संगणकीय प्रणालींना उर्जा देतात. आता, ते साणंदमध्येच तयार केले जातील. प्रगत तंत्रज्ञान, उच्च-गुणवत्तेच्या ‘मेमरी’ आणि ‘स्टोरेज’  उत्पादनांमध्ये रूपांतरित केले जातील. या प्रकल्पामुळे आत्ता  शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. आणि भविष्यात  अशा रोजगाराच्या संधी आणखी विस्तारतील.

मित्रांनो,
तुम्ही येथे बांधत असलेली ‘क्लीनरूम स्पेस’ जगातील सर्वात मोठ्या एटीएम क्लीनरूमपैकी एक असणार आहे. हा प्रकल्प  प्रगती आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे एक उत्तम उदाहरण आहे. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी तुम्ही केलेल्या व्यवस्था देखील कौतुकास्पद आहेत.

मित्रांनो,
गुजरात सरकारच्या धोरणांचे कौतुक मी करू इच्छितो. गुजरातने  क्षेत्रासाठी तयार केलेल्या धोरणांचे फायदे आता प्रत्यक्षामध्ये जमिनी स्तरावर  दिसत आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनामुळे, गुजरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही वेगाने प्रगती करत आहे. मंजुरी असो, जमीन वाटप असो किंवा उपयुक्तता प्रक्रियांचे सरलीकरण असो, या उपक्रमांमुळे गुंतवणुकदारांचा गुजरातवरील विश्वास दृढ झाला आहे. पश्चिम भारतात धोलेरा आणि साणंद हे सेमीकंडक्टर समूह म्हणून विकसित होत आहेत. शिवाय, सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या ‘इनपुट’शी संबंधित उद्योग देखील गुजरातमध्ये विकसित झाले आहेत. रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योग, कौशल्य केंद्रे आणि प्रशिक्षण उपक्रम यासारख्या क्षेत्रांवर काम गुजरातमध्ये एकाच वेळी प्रगती करत आहे.

मित्रांनो,
या क्षेत्रामुळे  भारतातील तरुणांसाठी संधीची एक नवीन खिडकी उघडली गेली आहे. आज, आम्ही पहिले पाऊल उचलले आहे. भारतातील सेमीकंडक्टर उद्योगातील दहा प्रकल्प उत्पादनात प्रवेश करत आहेत. त्याच गुणोत्तरामध्‍ये इथे एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळी निर्माण होणार आहे. भारत सक्षम आहे, भारत स्पर्धात्मकतेच्या बाबतीत आघाडीवर आहे आणि भारत वचनबध्‍द आहे - आता  हा संदेश जगापर्यंत पोहोचला आहे.  भारताबरोबर  भागीदारी करणा
ऱ्या
 मंडळींना  आणि जागतिक गुंतवणूकदारांना मी खात्री देतो की,  केंद्र- भारत सरकार असो किंवा आमची राज्य सरकारे, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.

मित्रांनो,
ज्यावेळी या दशकाकडे भावी पिढ्या मागे वळून पाहतील, त्यावेळी या दशकात भारताने सर्व क्षेत्रांमध्‍ये घेतलेल्या भरा
ऱ्या याविषयी अभिमानाने मते नोंदवतील. हे दशक म्हणजे भारताच्या तंत्रज्ञानविषयक भविष्यातील प्रमुख वळण बिंदू  ठरेल. पुन्हा एकदा, मी संपूर्ण मायक्रॉन टीम, गुजरात सरकार आणि तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो! धन्यवाद!!


नेहा कुलकर्णी / राजश्री आगाशे / सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2234497) अभ्यागत कक्ष : 3