सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध भव्य युवा रॅलीत पहायला मिळाली एकजूट; डॉ. प्रमोद सावंत, डॉ. वीरेंद्र कुमार आणि सुभाष फल देसाई यांच्या उपस्थितीत 3,000 हून अधिक तरुणांनी नशा मुक्त भारत अभियानाला पाठिंबा देण्याची घेतली प्रतिज्ञा

Posted On: 27 FEB 2026 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

एकजुटता  आणि दृढनिश्चयाचे एक जबरदस्त प्रदर्शन करत, 3,000 हून अधिक नागरिक, प्रामुख्याने युवक  आज बांबोलीम येथील गोवा विद्यापीठातीच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये नशा मुक्त भारत अभियान (NMBA) अंतर्गत एका ऐतिहासिक कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने गोवा सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेली ही रॅली मोहिमेच्या सहाव्या वर्षात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आणि गोव्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अमलीपदार्थ  विरोधी आंदोलनांपैकी एक बनली.

  

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने गोवा सरकारच्या सामाजिक कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने गोव्यात बाम्बोलिम इथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर, आज 27 फेब्रुवारी रोजी नशा मुक्त भारत अभियानांतर्गत एक कार्यक्रम आयोजित केला होता.

‘नशा मुक्त भारत, खुशहाल भारत’ या संकल्पनेअंतर्गत नशा मुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात धोरणकर्ते, युवक, नागरी  संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि अन्य संबंधितांनी अंमली पदार्थमुक्त भारताचा निर्धार सामूहिकरित्या व्यक्त केला.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की, नशा मुक्त भारत अभियान ही केवळ एक मोहीम नाही, युवकांचे संरक्षण, कुटुंबांचे व समाजाचे  सशक्तीकरण या हेतूने सुरू केलेली ती देशव्यापी लोक चळवळ आहे. केंद्र आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, कायदे अंमलबजावणी यंत्रणा आणि सामाजिक संस्था या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करुन केंद्रिय मंत्र्यांनी युवकांना बदलाचे दूत बनण्याचे आवाहन केले. “सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाने देशभरात सुरू केलेल्या या मोहीमेचा कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे. युवा पिढी, स्वयंसेवक, अशासकीय संस्था, सरकारी विभाग आणि धार्मिक संघटनांचा या मोहीमेतील सहभाग अद्भुत राहिला आहे. विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणून हा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी गोवा सरकार व सामाजिक  कल्याण विभागाचे अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले.

   

या कार्यक्रमात डॉ. वीरेंद्र कुमार यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ सेवनविरोधी शपथ दिली. अंमली पदार्थांच्या गैरवापर रोखण्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  नशा मुक्त भारत अभियानाच्या उद्दीष्टांना पाठींबा देण्याच्या गोवा राज्य सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. नियमित जागरुकता अभियान, सामाजिक सहभाग आणि मजबूत  पुनर्वसन यंत्रणा यांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, आपल्या पुढच्या पिढ्यांचे या अंमली पदार्थांच्या शापापासून संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. “‘एकदा वापरून बघतो’ हा विचार नेहमीच व्यसनाधीनतेकडे घेऊन जातो. गोव्याच्या तरुणांनी या विचारापासून दूर राहावे अशी माझी इच्छा आहे. व्यसनाधीन मुलांच्या पालकांनी व्यसनमुक्ती केंद्रांचा आधार घेण्यात संकोच बाळगू नये. राज्यातील जागरुकता अभियानांमध्ये सरकार सक्रिय सहभाग घेत आहे. गोवा पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी विभाग राज्यातल्या अंमली पदार्थांच्या व्यापारावर सातत्याने देखरेख ठेवत आहे. आम्ही गेल्या सात आठ वर्षांमधे कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करुन ते नष्ट केले आहेत,” असे ते म्हणाले.

देश विकसित भारत 2047 या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना, ‘नशामुक्त भारत 2047’ हा  त्या ध्येयाचा  एक महत्त्वपूर्ण भाग  आहे, कारण ते थेट देशातील युवाशक्तीशी संबंधित आहे. गोवा राज्य 2037 पर्यंत ‘नशामुक्त गोवा’ बनून या मोहिमेत  सक्रिय सहभाग नोंदवेल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री सुभाष फल देसाई यांनीही कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव सुधांश पंत; गोवा सरकारचे  सामाजिक कल्याण सचिव सरप्रीत सिंह गिल; तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या उपमहासंचालक  प्रतिमा गुप्ता हेही कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात ‘एनएमबीए’ या विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देखणी नृत्य आणि पथनाट्याचा समावेश होता. या सादरीकरणांद्वारे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली आणि सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या अभियानात योगदान दिल्याबद्दल मान्यवर व्यक्ती, व्यसनमुक्त झालेले व्यक्ती, प्रमुख  स्वयंसेवक आणि विविध स्पर्धांचे विजेते यांचा सत्कार करण्यात आला.

   

कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला जनजागृती आणि लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी युवक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीद्वारे ‘नशामुक्त भारत अभियान’ (एनएमबीए) अंतर्गत अमली पदार्थांविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा संदेश अधिक दृढ करण्यात आला.

 

* * *

सुषमा काणे/सुरेखा जोशी/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2233648) अभ्यागत कक्ष : 28