कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारतामध्ये दक्षिण-पूर्व आशियाई व्यापार कॉरिडॉर म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 26 FEB 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्रिपुराला भेट दिली. आपल्या त्रिपूरा भेटीत डॉ.जितेंद्र सिंह यांनी सिपाहीजाला जिल्ह्यातील कमलासागर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी या बैठकीला संबोधित केले. ईशान्य भारतामध्ये दक्षिण - पूर्व आशियाई व्यापार कॉरिडॉर म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिपुरात बांबु उत्पादनाशी संबंधित अफाट संधी असून, त्याची चाचपणी व्हायला हवी , अशा संधीचा  व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पद्धतशीर वापर वाढवायला हवा असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले. त्रिपुरा ते बांगलादेश ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर, हा वापराच्या   दृष्टीने एक सुलभ आणि किफायतशीर व्यापारी मार्ग ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्रिपुरामध्ये बांबूची समृद्ध वने आहेत, मात्र या साधनसंपत्तीचा पुरेसा उपयोग करून घेतला गेला नाही असे ते म्हणाले. बांबू हे एक बहुपर्यायी आणि बहुपयोगी उत्पादन आहे, बांधकाम, गृह सजावट, दागिने, हस्तकला आणि फर्निचरसाठी बांबूचा वापर केला जातो असे त्यांनी सांगितले. बांबू उत्पादनांच्या मूल्यवर्धनाचा विस्तार केला आणि बांबूच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली गेली तर त्रिपुराची व्यापारी क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण होऊ शकतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रादेशिक दळणवळीय जोडणीचाही उल्लेख केला. आपण त्रिपुराचे राज्यपाल असताना त्रिपुराला बांगलादेशासोबत जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले होते याचे स्मरण त्यांनी करून दिले. या प्रकल्पाला यापूर्वीच मंजूरी मिळालेली आहे, आणि या प्रकल्पावर काम सूरू आहे असे त्यांनी सांगितले. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमुळे सध्या या प्रकल्पाच्या कामाचा वेग काहीसा मंदावला असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. मात्र ही थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यावर, त्रिपुरा आणि पर्यायाने संपूर्ण ईशान्य भारताचे क्षेत्र हे व्यापार आणि व्यवसायाचे दक्षिण आशियाई कॉरिडॉर म्हणून ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने विकासाचे निर्देशक आणि प्रशासकीय उपक्रमांबाबतचे तपशीलवार सादरीकरणही करण्यात आले. 


सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2233201) अभ्यागत कक्ष : 16