संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सिक्कीममधील चुंगथांग-लाचेन मार्ग आणि तारम चू पुलाचे उद्घाटन
Posted On:
26 FEB 2026 4:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते आज उत्तर सिक्कीममधील चुंगथांग - लाचेन मार्ग आणि 400 फूट लांबीच्या तारम चू बेली सस्पेंशन पुलाचे उद्घाटन झाले. सीमा रस्ते संघटनेने या मार्गाची पुनर्बांधणी केली आहे. ऑक्टोबर 2023 मधील हिमनदीय तलाव फुटल्यामुळे आलेला पूर (GLOF), तसेच जून 2024 मधील रेमल चक्रीवादळ आणि मे - जून 2025 मध्ये झालेल्या ढगफुटीनंतर हा मार्ग निकामी झाला होता. या पार्श्वभूमीवर च्या विनाशकारी घटनांनंतर सीमा रस्ते संघटनेने आपत्तीपश्चात केलेल्या पुनर्बांधणीच्या कामांमधील हा एक महत्त्वाचा यशदायी टप्पा आहे.
संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेने प्रोजेक्ट स्वस्तिक अंतर्गत 96 दरडी हटवल्या, 4 मुख्य पूल बांधले आणि इतर दोन पुलांची दुरुस्ती केली. सीमा रस्ते संघटनेच्या अभियांत्रिकी पथकाने 8 किलोमीटरचे नवीन फॉर्मेशन कटिंग पूर्ण केले आणि अस्थिर उतार तसेच खचणाऱ्या भागातून मार्ग काढण्यासाठी विविध पर्यायी वळण मार्गिकाही तयार केल्या. या कामाअंतर्गत ऑक्टोबर 2025 मध्ये नागा - टूंग मार्गाचा 7.5 किमी लांबीचा पट्टा वापरासाठी खुला करण्यात आला होता, त्यामुळे या प्रदेशातील संपर्क जोडणीला अधिक बळकटी मिळाली. आता 28 किमी लांबीचा चुंगथांग-लाचेन मार्ग आणि तारम चू पुलाचे काम पूर्ण झाले असून, या सुविधा इथले स्थानिक रहिवासी, सुरक्षा यंत्रणांसाठी उपयुक्त ठरणार आहेत, तसेच यामुळे प्रादेशिक आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे.
हे प्रकल्प उत्तर सिक्कीममधील पायाभूत सुविधांचा विकास तसेच स्थानिकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संरक्षण राज्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. सीमा रस्ते संघटनेने या दुर्गम भागात सातत्यपूर्णतेने काम केल्याबद्दल त्यांनी संघटनेची प्रशंसाही केली आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या रस्ते जोडणीचे उद्घाटन सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर सिक्कीम -विकसित भारत या संकल्पाला पूरक ठरले आहे.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233116)
अभ्यागत कक्ष : 16