राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये ‘एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग’ या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा प्रारंभ
समानतेला प्रोत्साहन देऊन, भेदभाव नष्ट करून आणि सामुदायिक सेवेत सहभागी होऊन प्रत्येक नागरिक राष्ट्र उभारणीत प्रभावी योगदान देऊ शकतो: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
25 FEB 2026 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (25 फेब्रुवारी, 26) नागपूर येथील विश्व शांती सरोवर येथे ब्रह्माकुमारीजच्यावतीने आयोजित केलेल्या ‘एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग’ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, महाराष्ट्राने देशात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासाची उदाहरणे सातत्याने ठेवली आहेत. ही पवित्र भूमी भारतातील लोकांमध्ये नवीन चेतना निर्माण करणाऱ्या महान विचारसरणी आणि राष्ट्र उभारणीच्या आदर्शांचे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके, महर्षी धोंडो कर्वे, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींचे विचार, संघर्ष आणि योगदान यांच्यामुळे आपल्या राष्ट्राला सक्षम केले आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, महाराष्ट्र आपल्या उद्योग, शेती, उद्योजकता, नवोन्मेष, उच्च शिक्षण आणि अमूल्य सांस्कृतिक परंपरांच्या आधारे भारताच्या विकासाच्या प्रवासाला सातत्याने बळकटी देत आहे. प्रत्येक नागरिकाला लाभ होईल, अशा पध्दतीने समग्र विकासाकडे वाटचाल करणे, हे आपले ध्येय आहे. इतिहासापासून प्रेरणा घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाच्या शक्तीचा वापर करून आपण एक मजबूत आणि अधिक समृद्ध महाराष्ट्र आणि भारत घडविण्यासाठी दृढनिश्चयाने काम केले पाहिजे. ब्रह्मकुमारींचा 'एकता आणि विश्वासाद्वारे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ' हा उपक्रम महाराष्ट्रातील लोकांना आंतरिक शक्ती आणि नेतृत्व भावना विकसित करण्यास आणि मूल्य-आधारित विकासासाठी काम करण्यास प्रेरित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यात्म माणसाला मानवी मूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव करून देते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. सुसंवाद, नैतिक आचरण, सकारात्मक विचार आणि सामाजिक जबाबदारी - या सर्व गोष्टी एकत्रितपणे समाजाला अधिक बळकट बनवतात. जेव्हा ही मूल्ये जीवनाचा भाग बनतात तेव्हा समाजात स्वाभाविकपणे विश्वास स्थापित होतो, असे त्यांनी सांगितले. परस्पर विश्वासामुळे समाजात सकारात्मकतेला प्रोत्साहन मिळते, असे त्या म्हणाल्या.
एकता आणि विश्वास या भक्कम पायावर मजबूत राष्ट्र उभे राहते असे त्यांनी सांगितले. जेव्हा समाजात परस्पर विश्वास वाढतो तेव्हा लोक वैयक्तिक फायद्यापलिकडे जाऊन एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करतात, हे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक नागरिक समानतेला प्रोत्साहन देऊन, भेदभाव नष्ट करून आणि सामुदायिक सेवेत सहभागी होऊन राष्ट्र उभारणीत प्रभावीपणे योगदान देऊ शकतो, असे उद्गार त्यांनी काढले.

जेव्हा प्रत्येकाला विकासाच्या समान संधी मिळतील, तंत्रज्ञान विकासाचे साधन बनेल आणि प्रगतीचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचतील तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल, यावर त्यांनी भर दिला. या उपक्रमाबद्दल त्यांनी ब्रह्माकुमारींचे कौतुक केले. ब्रह्माकुमारींच्या प्रयत्नांमुळे समाजातील एकता आणि विश्वास अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232884)
अभ्यागत कक्ष : 41