आयुष मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन केले
आयुष प्रणाली सर्वांगीण आरोग्यासाठी सर्वसमावेशक जीवनशैलीची चौकट प्रदान करत असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन
आयुर्वेद ही निसर्गात रुजलेली एक कालातीत वैज्ञानिक परंपरा आहे: राज्यपाल आचार्य देवव्रत
राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा भारतीय पारंपारिक औषध प्रणालींचा 'महाकुंभ' आहे: आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव
आयुष पर्यटनाद्वारे भारत सर्वांगीण आरोग्यात "जगाचा शिरोमणी " बनू शकतो: प्रतापराव जाधव
Posted On:
25 FEB 2026 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन केले. आयुष मंत्रालयाने अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेसच्या सहकार्याने चार दिवसांचा हा राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला असून, यामध्ये धोरणकर्ते, संशोधक, आरोग्य व्यावसायिक, शेतकरी, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी आणि नागरिक, भारताच्या पारंपरिक औषध प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

संत श्री गजानन महाराज यांच्या पुण्यभूमीवर उपस्थित राहताना आपल्याला आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांच्या मूर्तीला अभिवादन करण्याची संधी आपल्याला मिळाली असे त्या म्हणाल्या. संत गजानन महाराज यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले आणि संपूर्ण जीव सृष्टीसाठी करुणा आणि समानतेचा संदेश दिला, असे त्या म्हणाल्या. अशा अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी लोकांचे आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित कार्यक्रमाचे उद्घाटन करणे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की आपल्या परंपरेत असे म्हटले आहे की, "आरोग्यम् परमम् सुखम्", म्हणजेच उत्तम आरोग्य हाच सर्वात मोठा आनंद आहे. निरोगी शरीर हे सर्व कर्तव्ये पार पाडण्याचे प्राथमिक साधन आहे यावर त्यांनी भर दिला. राष्ट्राला बळकटी देण्यात, निरोगी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्या म्हणाल्या. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपथीने प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवेत अमूल्य योगदान दिले असून संतुलित जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करत आहेत यावर त्यांनी भर दिला.

खऱ्या आरोग्यासाठी शरीर आणि मन यांच्यातील सुसंवाद आवश्यक आहे, हे जगाने जाणले आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. आयुष प्रणाली केवळ उपचारच देत नाहीत तर संतुलित आहार, दैनंदिन आणि ऋतूगत दिनक्रम , योग, ध्यान तसेच नैसर्गिक उपचारांवर आधारित एक व्यापक जीवनशैलीचा आराखडा प्रदान करते, असेही त्या म्हणाल्या. रोगाचा भार कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन कल्याणाला चालना देण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि समग्र आरोग्यसेवा आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
भारताकडे औषधी वनस्पती आणि पारंपारिक ज्ञानाचा समृद्ध वारसा आहे, असे त्यांनी सांगितले. औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि वैज्ञानिक लागवडीचे महत्त्व अधोरेखित करून, त्या म्हणाल्या की कच्च्या मालाच्या मजबूत पायाभरणीमुळे शाश्वत आरोग्यसेवेला चालना मिळेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. आयुष पद्धतींच्या प्रगतीसाठी तसेच आरोग्यसंपन्न आणि सशक्त भारत निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आयुर्वेदाला भारतातील प्राचीन ऋषींनी स्थापित केलेली कालातीत वैज्ञानिक परंपरा म्हणून संबोधले आणि त्यांनी या ऋषींना पहिले संशोधन विद्वान म्हटले. पंच महाभूतांनी बनलेले मानवी शरीर निसर्गाशी जुळवून घेऊन सर्वोत्तम प्रकारे बरे होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपचारात्मक दृष्टिकोनांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या पारंपरिक पद्धती अत्यंत वैज्ञानिक असून शतकानुशतकांच्या अनुभव आधारित ज्ञानात रुजलेल्या आहेत, असे राज्यपाल म्हणाले. वैद्यकीय व्यावसायिकांनी विश्वसनीयता राखावी, औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करावी आणि आपल्या परंपरांवर अढळ विश्वास ठेवावा असे आवाहन राज्यपालांनी केले. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालींना बळकटी दिल्याबद्दल त्यांनी आयुष मंत्रालयाचे अभिनंदन केले.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे वर्णन "भारतीय पारंपारिक औषध प्रणालींचा महाकुंभ" असे केले. ही भव्य सभा धोरणकर्ते, संशोधक, शिक्षणतज्ञ, उद्योग प्रतिनिधी, शेतकरी आणि व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणते, असे ते म्हणाले. हा मेळा केवळ एक आरोग्य शिबिर नाही तर भारताच्या समग्र आरोग्यसेवा परंपरांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना थेट लोकांशी जोडणारा एक शक्तिशाली राष्ट्रीय उपक्रम आहे, यावर जाधव यांनी भर दिला.

आयुष मंत्रालय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तथ्यावर आधारित आयुष प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, असे जाधव यांनी सांगितले. आयुर्वेद आणि इतर आयुष शाखांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक विश्वासार्हता मिळावी यासाठी केंद्रित संशोधन, वैज्ञानिक प्रमाणीकरण, गुणवत्ता हमी आणि मानकीकरण मजबूत केले जात आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक ज्ञानाची आधुनिक वैज्ञानिक मापदंडांशी सांगड घातल्याने जगभरात आयुष बद्दल वाटणारा विश्वास आणखी वाढेल, यावर त्यांनी भर दिला.

आयुष पर्यटनाचे प्रचंड सामर्थ्य अधोरेखित करत, जाधव म्हणाले की- "सर्वांगीण सुदृढ आरोग्याबाबत भारत जगाचा शिरोमणी ठरू शकेल. आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचारांच्या माध्यमातून, जागतिक आरोग्य चळवळीचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे." आयुष पर्यटनाचा विस्तार करण्याने आरोग्याबाबत भारत जगाचे अंतिम गन्तव्य स्थान तर बनेलच, शिवाय त्यातून रोजगारनिर्मिती होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थांना बळ मिळेल, आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य मेळावा शेगावमध्ये भरवला जाणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केली. या मेळाव्यात विनामूल्य वैद्यकीय सल्ला, औषधवाटप, तज्ज्ञांची व्याख्याने आणि औषधी वनस्पती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या संधी मिळतील- असेही त्यांनी अधोरेखित केले.
आरोग्य मेळावे हे जनसंपर्काचे महत्त्वाचे साधन असून, जनजागृती करण्याचा आणि अस्सल आयुष पद्धती जगासमोर सादर करण्याचा तो एक प्रभावी मंच आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले. या क्षेत्रात गुणवत्ता, अधिक प्रगत संशोधन आणि जागतिक स्तरावर सहयोग- यासाठी मंत्रालय कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 मध्ये अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठितांनी उपस्थिती लावली. त्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, संजय कुटे, वैद्य देवेंद्र त्रिगुण, आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच, आयुष क्षेत्रातील तज्ज्ञ, शेतकरी, वैद्यकी करणाऱ्या व्यक्ती, आणि समुदाय प्रतिनिधी यांचा समावेश होता. त्यांनी भारताच्या पारंपरिक औषधपद्धती, आरोग्य पर्यटन, आणि सर्वांगीण आरोग्यसेवा उपक्रम यांना चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आयुर्वेदाच्या क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करून उत्तुंग योगदान देणाऱ्या नामांकित वैद्यांना यावेळी, राष्ट्रपतींच्या हस्ते लाइफटाइम आयुर्वेदिक गौरव सन्मान हा आयुर्वेदाच्या क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानित व्यक्तींमध्ये- वैद्य देवेंद्र त्रिगुण, वैद्य राकेश शर्मा, डॉ.आशुतोष गुप्ता,डॉ.मनीषा कोटेकर, पी.एम.वारियर आणि डॉ.रामदास यांचा समावेश होता. या सर्वांचे समर्पित सेवाकार्य आणि अभिनव कार्य यांमुळे पारंपरिक औषधव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य उपक्रम,आणि आयुषच्या प्रणालीच्या मदतीने समुदाय आरोग्य कल्याण यांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.

यावेळी राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यालाही भेट दिली.
या लिंकवर क्लिक करून कार्यक्रम पाहता येईल: https://www.youtube.com/live/JPF2KVgQ4qg
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232743)
अभ्यागत कक्ष : 39