विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनडीएमए, एसीएसआयआर आणि सीएसआयआर-एनआयएससीपीआर यांच्यात आपत्ती व्यवस्थापन धोरण संशोधनाच्या बळकटीकरणासाठी सामंजस्य करार

Posted On: 21 FEB 2026 12:03PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), शास्त्रीय व नवोन्मेषी संशोधन संस्था (एसीएसआयआर) आणि राष्ट्रीय विज्ञान संवाद व धोरण संशोधन संस्था (सीएसआयआर-एनआयएससीपीआर) यांच्यात आज एक सामंजस्य करार करण्यात आला. हा करार आपत्ती व्यवस्थापन आणि धोका कमी करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक उपक्रम, क्षमता बांधणी, धोरण संशोधन आणि संवाद यासाठी सहयोगात्मक संस्था स्थापन करण्यासंदर्भातील आहे. 

रचनात्मक शैक्षणिक उपक्रम, आंतरशाखीय संशोधन आणि व्यापक लोकसहभागातून भारताची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यात विज्ञान, तंत्रज्ञान व धोरणांचा समावेश करणे हा या कराराचा उद्देश आहे. 

करारातील प्रमुख मुद्दे

एनडीएमएच्या सहकार्याने एसीएसआयआर अंतर्गत सीएसआयआर-एनआयएससीपीआर संस्थेत आपत्ती व्यवस्थापन विषयातील पीएचडी सुरू करणे

डीएमआरआरमध्ये विज्ञान संवाद व क्षमता बांधणीसह संयुक्त संशोधन आणि धोरण अभ्यास

याप्रसंगी बोलताना एनडीएमएचे सदस्य डॉ. दिनेश कुमार असवाल यांनी आपत्ती व्यवस्थापन व जोखीम करण्यासाठी विज्ञानाचा अंतर्भाव व समाजाची तयारी हे मुद्दे मांडले.

“आपत्ती जोखीम कमी करण्याच्या पंतप्रधानांच्या नऊ कलमी धोरणाला अनुसरुन आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित संशोधन व शैक्षणिक उपक्रम यामध्ये सहकारी तत्त्वावर काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे मजबूत जाळे निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पूर्वइशारा देणारी यंत्रणा, जोखीम संवाद आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे यांच्या सक्षमीकरणासाठी संवाद यंत्रणेच्या लवचिकतेच्या क्षमतेचा आपण पुरेपूर उपयोग करुन घेतला पाहिजे. आपत्तीनंतर केलेल्या पद्धतशीर अभ्यास व माहितीच्या नोंदींचा उपयोग करुन प्रत्येक आपत्तीतून धडा घेण्याचा आपला निर्धारही तितकाच महत्त्वाचा आहे. सतत शिकत राहण्याच्या या संस्कृतीचे संस्थात्मकीकरण करुनच आपण आपली सज्जता वाढवू शकतो, प्रतिसाद यंत्रणांमध्ये सुधारणा करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपत्ती प्रतिसादाला अनुकूल देश घडवू शकतो. यासंदर्भात हा सामंजस्य करार म्हणजे आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या व बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते यांच्यातील दुवा सांधणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”  

एसीएसआयआरचे संचालक प्रो. मनोज कुमार धर यांनी या सहकार्यातून निर्माण झालेल्या शैक्षणिक व संशोधनात्मक संधींचा मुद्दा मांडला.

“एसीएसआयआर संस्थेत 7,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नांवनोंदणी केली असून भारतातील सर्वोत्तम संशोधन संस्थांपैकी ही एक संस्था आहे. आमच्या संस्थेत अवकाश विज्ञानाशिवाय जवळपास सर्वच विज्ञान शाखांमधील संशोधन कार्य चालते. संशोधनातील आंतरशाखीय सहकार्याला आम्ही खूप प्रोत्साहन देतो. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी व संशोधकांसाठी आपत्ती व्यवस्थापनातील आव्हानांवर नवोन्मेषी, संशोधनावर आधारित पर्याय शोधण्याच्या नवीन संधी खुल्या झाल्या आहेत. यामुळे विकसित भारत 2047 च्या दृष्टीने भारताचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा मजबूत करण्याप्रती समर्पित असलेली संशोधकांची नवी पिढी घडण्यात मदत होईल.”

डीएमआरआरमध्ये विज्ञान संवाद व धोरण संशोधनाची भूमिका अधोरेखित करताना सीएसआयआर-एनआयएससीपीआर संस्थेच्या संचालक डॉ. गीता वाणी रायसम म्हणाल्या,

“सीएसआयआर-एनआयएससीपीआर ही 15 संशोधनपर नियतकालिके प्रकाशित करणारी एकमेव संस्था आहे. विज्ञान संवादातील राष्ट्रीय उपक्रमांचे नेतृत्व करण्याचे आणि पुरावा आधारित धोरण संशोधनात सहयोग देण्याचे काम ही संस्था करते. एनडीएमए व एसीएसआयआर संस्थांच्या भागीदारीमुळे आपत्ती व्यवस्थापनासाठीच्या धोरणांमध्ये व जनजागृती यंत्रणेत वैज्ञानिक माहितीचा समावेश करणे शक्य होईल. या भागीदारीच्या माध्यमातून एनआयएससीपीआर आपत्ती प्रतिसादासाठी विज्ञान संशोधनात प्रगती करतानाच धोरण संशोधन व क्षमता बांधणीच्या प्रयत्नांसाठी एक आधुनिक मंच निर्माण करेल. धोरण आखण्याशी सुसंगत व्यापक वैज्ञानिक माहितीद्वारे, वैज्ञानिकदृष्ट्या गतीशील व सामाजिकदृष्ट्या जबाबदार पर्याय शोधण्यासाठी मदत करण्याचा आमचा उद्देश आहे. याद्वारे देशाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणे हा आमचा हेतू आहे.”

गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील आपत्ती व्यवस्थापन धोरणांसाठीची सर्वोच्च संस्था एनडीएमए, धोरणात्मक दिशा व कार्यक्षेत्रातील तज्ज्ञांची मदत पुरवेल. एसीएसआयआर हे प्रमुख संशोधन विद्यापीठ शैक्षणिक उपक्रम व संशोधनात सहाय्य करेल. सीएसआयआर-एनआयएससीपीआर शैक्षणिक उपक्रम आयोजित करेल आणि डीएमआरआरवरील धोरण संशोधन व लोकसहभाग मोहीमा राबवेल. ही त्रिपक्षीय भागीदारी म्हणजे भारताच्या आपत्ती व्यवस्थापन परिसंस्थेत वैज्ञानिक संशोधन, वैज्ञानिक संवाद व पुरावा आधारित धोरणनिर्मिती यांच्या सहभागाच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल आहे.

***

हर्षल आकुडे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231394) अभ्यागत कक्ष : 8