दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये 'टेलिकॉममधील जबाबदार एआय ' या सत्राचे केले आयोजन, डिजिटल लवचिकता, प्रशासन आणि नेटवर्क परिवर्तनावर केले लक्ष केंद्रित

Posted On: 20 FEB 2026 6:17PM by PIB Mumbai

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे "दूरसंचारातील जबाबदार एआय" या विषयावर इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एक सत्र आयोजित केले. या सत्रात दूरसंचार सेवा प्रदाते, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या, उद्योग संघटना आणि सरकारी संस्थांमधील वरिष्ठ प्रतिनिधींनी दूरसंचार नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित अनुप्रयोगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तैनात करण्यासाठीचे धोरण आणि कार्यात्मक दृष्टिकोनांवर चर्चा केली.

हे सत्र व्यापक शिखर कार्यक्रमाचा एक भाग होता आणि त्यात आंतरराष्ट्रीय उद्योग संस्था तसेच जागतिक भागधारकांचा सहभाग होता. नेटवर्क परिचालन, ग्राहक संरक्षण आणि सेवा वितरणात एआयची जबाबदारीपूर्ण वाढ होण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांसह विश्वास, जबाबदारी आणि सुरक्षितता यासह प्रशासनाच्या प्राधान्यांभोवती चर्चा करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाने एक व्यासपीठ म्हणून काम केले. नेटवर्क डिझाइन, ऑपरेशन्स आणि ग्राहक अनुभवाला आकार देणारा पायाभूत स्तर म्हणून एआय आणि टेलिकम्युनिकेशन्सच्या वाढत्या अभिसरणाची ओळख या चर्चेत झाली.

सत्राची सुरुवात ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांच्या उद्घाटन आणि स्वागतपर भाषणाने झाली. आपल्या उद्घाटनपर भाषणात लाहोटी यांनी अधोरेखित केले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता आता दूरसंचारासाठी परिघीय तंत्रज्ञान राहिलेले नाही; ते नेटवर्क्स कशी डिझाइन केली जातात, व्यवस्थापित केली जातात आणि अनुभवली जातात याचा अविभाज्य भाग बनत आहे. लोकसंख्येच्या आधारावरील निर्णयांवर एआय प्रणालींचा प्रभाव वाढत असताना, त्यांच्या अंमलबजावणीसाठी विश्वास हाच मूलभूत मुद्दा ठरतो. कार्यक्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने पारदर्शकता, जबाबदारी, मानवी देखरेख आणि निष्पक्षता तसेच निःपक्षपाती परिणाम सुनिश्चित करणारे स्पष्टपणे परिभाषित कुंपण यांची आवश्यकता आहे. दूरसंचार क्षेत्रातील एआय समावेशक, लवचिक, सुरक्षित आणि सार्वजनिक हिताशी सुसंगत राहावे याची खात्री करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे.”

त्यांनी पुढे नमूद केले की दूरसंचार नेटवर्क्स ही भारताच्या एआय पायाभूत सुविधांचा मध्यवर्ती आधारस्तंभ आहेत आणि भारतातील दूरसंचार ग्राहकांच्या संख्येचे प्रमाण पाहता, एआय-चालित स्वयंचलन अपरिहार्य होत आहे. नेटवर्क कामगिरीचे संतुलन राखण्यासाठी, दोषांचा अंदाज घेण्यासाठी, ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी, ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी तसेच फसवणूक आणि स्पॅम संप्रेषणांना तोंड देण्यासाठी एआय आधीच तैनात केले जात आहे. मजबूत अंमलबजावणी आणि एआय-चालित चाळणी यंत्रणेमुळे स्पॅम-लिंक्ड कनेक्शनविरुद्ध कारवाई करणे शक्य झाले आहे आणि व्यावसायिक संप्रेषणांमध्ये पडताळणीयोग्य ग्राहक संमतीसाठी डिजिटल संमतीची चौकट लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांचे हक्क आणि सार्वजनिक हित जपताना नाविन्यपूर्णतेला सक्षम करण्यासाठी जोखीम-आधारित नियामक दृष्टिकोन आणि नियामक सँडबॉक्स-आधारित चाचणीसाठी ट्रायच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

या कार्यक्रमात दूरसंचार क्षेत्रातील एआय इंटिग्रेशनच्या अत्यावश्यक आयामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दोन पॅनेल चर्चांचा समावेश होता - पहिलीमध्ये एआय क्षमतांना जबाबदारीने समाविष्ट करण्यासाठी नेटवर्क कशी विकसित झाली पाहिजेत याचे परीक्षण केले गेले आणि दुसरीमध्ये एआय-चालित टेलिकॉम ऑपरेशन्समध्ये ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा शोध घेतला गेला. एकत्रितपणे, या पॅनेलनी एआय-सक्षम परिसंस्थेत ग्राहकांचा विश्वास सुनिश्चित करताना नेटवर्क बुद्धिमत्ता मजबूत करण्याच्या दुहेरी प्राधान्यावर भर दिला.

"एआय युगासाठी टेलिकॉम नेटवर्क्सची तयारी" या शीर्षकाच्या पहिल्या पॅनल चर्चेचे अध्यक्षपद ट्रायचे सदस्य रितू रंजन मित्र यांनी भूषवले. पॅनलमध्ये एरिक्सनचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मॅग्नस एवरब्रिंग; क्वालकॉमच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष विनेश सुकुमार; नोकियाच्या धोरणात्मक प्रशासन आणि उद्योग उपक्रम विभागाचे उपाध्यक्ष पासी तोयवनेन; आणि तेजस नेटवर्क्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच प्रमुख एनएमएस शांतीग्राम जगन्नाथ यांचा समावेश होता.

या चर्चेत दूरसंचार नेटवर्क्समध्ये एआयचा अवलंब आणि एआय-आधारित प्रणालींमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टीकरणक्षमता सुधारण्यावर भर देण्यात आला. तसेच ‘डिझाइनद्वारे जबाबदारी’ ही संकल्पना अंगीकारणे, पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच एआय अंमलबजावणीत सुरक्षा आणि सुरक्षितता अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सहभागी सदस्यांनी बुद्धिमान ऑटोमेशन आणि एआय-नेटिव्ह आर्किटेक्चर्स विस्तारत असलेल्या 5G प्रणालीमध्ये नेटवर्क व्यवस्थापन कसे बदलत आहेत यावरही चर्चा केली.

"एआय-आधारित ऑपरेशन्सद्वारे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे" या शीर्षकाच्या दुसऱ्या पॅनल चर्चेचे अध्यक्षपद ट्रायचे सदस्य डॉ. एम. पी. टांगीराला यांनी भूषवले. पॅनलमध्ये जीएसएमए’च्या एपीएसीचे प्रमुख ज्युलियन गोर्मन; सी-डॉट चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष (बोर्ड) डॉ. राजकुमार उपाध्याय; व्होडाफोन इंडिया लिमिटेडचे सीटीएसओ आणि डेटा प्रायव्हसी अधिकारी मथन बाबू कासिलिंगम; आणि दूरसंचार विभागाचे वरिष्ठ डीडीजी आणि प्रमुख सय्यद तौसिफ अब्बास यांचा समावेश होता. या चर्चेत स्वयंचलित नेटवर्क निर्णयांमधील जबाबदारी, एआय-आधारित ग्राहक संवादात पारदर्शकता, स्पॅम प्रतिबंधासाठी जबाबदार एआय यंत्रणा, दूरसंचार सेवा प्रदात्यांसाठी नैतिक प्रशासन चौकट तसेच विशेषत्वाने दूरसंचार आणि महत्त्वाच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये एआय-संबंधित अपयशांचे विश्लेषण करण्यासाठी, सर्व समावेशक ए आय घटना डेटाबेस विकसित करण्यासाठी मालकांची गरज यांचा सखोल आढावा घेण्यात आला. पॅनेलने उदयोन्मुख 5G आणि भविष्यातील 6G वातावरणात, विशेषतः फसवणूक शोधण्यासाठी आणि ग्राहकाभिमुख विश्लेषणासाठी जबाबदारीने एआयचा विस्तार कसा करावा यावरही चर्चा झाली. 

 

सत्रांमध्ये वरिष्ठ उद्योग प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांनी सहभाग घेतला. एआय-सक्षम दूरसंचार प्रणालीमध्ये नवोन्मेषाला चालना देताना ग्राहकांचा विश्वास कसा दृढ करावा याबाबत त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. दूरसंचार क्षेत्रातील एआयची तैनाती संतुलित आणि सुरक्षित राहण्यासाठी सहयोगी दृष्टिकोनांचे महत्त्व या चर्चेतून अधिक दृढ झाले. विश्वसनीय एआय स्वीकारण्यासाठी नियामक संस्था, उद्योग आणि तंत्रज्ञान भागधारकांमध्ये सतत समन्वय आवश्यक असेल, असे सहभागी सदस्यांनी नमूद केले\.

या सत्रातील चर्चासत्र इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या व्यापक उद्दिष्टांना हातभार लावेल, ज्यामुळे भारताच्या दूरसंचार क्षेत्रात जबाबदार, समावेशक आणि विकासाभिमुख एआय स्वीकारण्याच्या दृष्टिकोनाला पाठिंबा मिळेल.

अधिक माहितीसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी, कृपया –

समीर गुप्ता, सल्लागार (नेटवर्क्स, स्पेक्ट्रम आणि लायसन्सिंग (एनएसएल), ट्राय यांच्याशी adv-nsl1@trai.gov.in वर संपर्क साधावा.

अधिकृत अपडेट्ससाठी, ट्रायला खालील माध्यमांवर फॉलो करा:

X (पूर्वीचे ट्विटर) -  @TRAI

फेसबुक - @TRAI

इंस्टाग्राम - @trai.official_

लिंक्डइन -  @trai-official

YouTube - @TelecomRegulatoryAuthorityofIndia

संकेतस्थळ - trai.gov.in

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231027) अभ्यागत कक्ष : 12