संरक्षण मंत्रालय
जागतिक समुदायाने सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र यावे -विशाखापट्टणम येथे मिलन युद्ध सरावाच्या उद्घाटन प्रसंगी संरक्षणमंत्र्यांनी केले आवाहन
Posted On:
19 FEB 2026 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्रात उद्भवणाऱ्या जटिल आणि परस्परसंबंधित आव्हानांना परस्पर सन्मान आणि सहकार्याच्या भावनेतून प्रभावीपणे सामोरे जाण्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या मिलन युद्ध सरावाच्या उद्घाटन समारंभात ते 74 देशांच्या नौदल प्रमुखांना आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांना संबोधित करत होते.

"आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यात नौदलाची भूमिका काळानुरूप महत्त्वाची ठरली आहे. गेल्या काही दशकांत झालेल्या प्रचंड आर्थिक विकासामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. सामुद्रधुनी आणि जलमार्गांच्या मालकी हक्कासाठीचे वाद वाढले असून त्यामुळे तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. पाण्याखालील संसाधनांकडे, विशेषतः दुर्मिळ खनिजांकडे वाढणारे आंतरराष्ट्रीय लक्ष हे नव्या तणावाचे कारण ठरत आहे. याव्यतिरिक्त, विविध देश आणि प्रदेशांमध्ये पसरणाऱ्या दहशतवादी कारवायांपासून आपल्या समुद्री सीमांचे संरक्षण करण्याची गरज आहे," असे संरक्षण मंत्री म्हणाले.
पारंपरिक धोक्यांबरोबरच चाचेगिरी, सागरी दहशतवाद, बेकायदेशीर मासेमारी, तस्करी, सायबर धोके आणि महत्त्वाच्या पुरवठा साखळ्यांमध्ये व्यत्यय यासारखी नव्या प्रकारची आव्हाने ही समोर येत आहेत, असे त्यांनी नमूद केले. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढत असून मानवतावादी आणि आपत्ती निवारण कार्ये अधिक वारंवार आणि आव्हानात्मक बनत आहेत, असेही ते म्हणाले. कोणतेही एक नौदल कितीही सक्षम असले तरी, या आव्हानांना एकट्याने तोंड देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. अधिक सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी नौदलांमध्ये सहकार्य वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

आंतरराष्ट्रीय समुद्राशी संबंधित बाबी हाताळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्यावरील (UNCLOS) संयुक्त राष्ट्र परिषदेची भक्कम कायदेशीर चौकट अधिक सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक जागतिक नौदल संरचना विकसित केली जाऊ शकते, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. UNCLOS ही राष्ट्रांमधील वादांचे निवारण आणि शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी एक सर्वसमावेशक यंत्रणा आहे. प्रस्तावित जागतिक नौदल संरचना, माहितीची देवाणघेवाण सुलभ करेल, संवादाच्या दुव्यांचे संरक्षण करेल आणि जागतिक स्तरावर राष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याच्या नेहमीच्या भूमिकेसह खोल समुद्रातील दहशतवादासह गुन्हेगारी कारवायांना आळा घालेल.

स्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सध्या उलथापालथ होत आहे हे निदर्शनास आणून देत, राजनाथ सिंह म्हणाले की मिलन सारखे मंच व्यावसायिक कौशल्य एकत्र आणतात, परस्पर विश्वास निर्माण करतात, आंतरकार्यक्षमता वाढवतात आणि सामान्य आव्हानांना समन्वित प्रतिसाद देण्यास मदत करतात. “जेव्हा आपली जहाजे एकत्र प्रवास करतात, जेव्हा आपले खलाशी एकत्र प्रशिक्षण घेतात आणि जेव्हा आपले कमांडर एकत्र चर्चा करतात, तेव्हा आपण भूगोल आणि राजकारणाच्या पलीकडील सामायिक समज निर्माण करतो जी सहकार्याच्या या कल्पनेवर चर्चा करण्यासाठी एक योग्य वेळ देते,” असे ते म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी 74 राष्ट्रांच्या सहभागासह मिलन 2026 चे वर्णन जागतिक सागरी समुदायाचा भारतावरील विश्वास आणि भारताच्या जबाबदार सागरी भागीदार म्हणून असलेल्या भूमिकेचा पुरावा असल्याचे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 हा जगातील नौदलांमधील सद्भावना, व्यावसायिकता आणि परस्पर आदराचे स्पष्ट प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2230544)
अभ्यागत कक्ष : 6