संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण मंत्र्यांच्या सह-अध्यक्षतेखाली सहावा वार्षिक संरक्षण संवाद बंगळुरू येथे संपन्न


संरक्षण सहकार्य कराराचे आणखी 10 वर्षांसाठी करण्यात आले नूतनीकरण

Posted On: 17 FEB 2026 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र दल आणि माजी सैनिक कल्याण  मंत्री  कॅथरीन वॉट्रिन यांनी 17,फेब्रुवारी  2026 रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे सहाव्या भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे सहअध्यक्षपद भूषवले. दोन्ही मंत्र्यांनी सह-विकास आणि उपकरणांच्या सह-उत्पादनासाठी प्राधान्य क्षेत्रांसह विविध द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी निकटच्या  संरक्षण भागीदारीची आणि दोन्ही राष्ट्रांच्या उद्योगांना विशेषतः विशिष्ट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जोडण्याच्या गरजेवर भर दिला.

उभय मंत्र्यांनी धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून लष्कर-ते-लष्कर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला . संरक्षणमंत्र्यांनी अलीकडील भारत-ईयू सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी सामूहिक सहभाग अधिक दृढ करण्याच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले. दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक स्थिरता मजबूत करण्यासाठी, संयुक्त क्षमता वाढविण्यासाठी आणि चिरस्थायी भारत-फ्रेंच धोरणात्मक संरेखनाला बळकटी देण्यासाठी द्विपक्षीय आणि व्यापक युरोपियन  संदर्भात या चौकटीचा वापर करण्यास सहमती दर्शविली.

दोन्ही देशांनी भारतीय लष्कर आणि फ्रेंच लँड फोर्सेसच्या आस्थापनांमध्ये परस्परांच्या अधिकाऱ्यांच्या तैनातीची घोषणा केली. 10 वर्षांच्या संरक्षण सहकार्य कराराच्या नूतनीकरणावर भारताकडून संरक्षण सचिव आणि फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरण विभागाचे उपमहासंचालक यांनी स्वाक्षरी केली.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  आणि सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष यांनी  भारतात हॅमर क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संयुक्त उपक्रमावरील  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

फ्रेंच संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल  कॅथरीन वॉट्रिन यांचे अभिनंदन करताना आणि  पहिल्या भारत भेटीसाठी त्यांचे स्वागत करताना, राजनाथ सिंह म्हणाले की,  वॉट्रिन यांचा कार्यकाळ युरोपियन आणि जागतिक सुरक्षेसाठी एका महत्त्वाच्या क्षणी सुरु झाला  आहे आणि भारत, फ्रान्सच्या धोरणात्मक स्वायत्ततेप्रति  दृढ वचनबद्धतेची  मनापासून प्रशंसा करतो. फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्करासोबत  शक्ती सराव दोन वर्षातून एकदा घेण्याऐवजी दरवर्षी घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

भारत हा हिंद महासागर क्षेत्रातील देशांसाठी 'प्रथम प्रतिसाद देणारा'  आणि त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि कोणत्याही शत्रूला   प्रतिबंध करण्यासाठी संरक्षण, सुरक्षा आणि सागरी क्षेत्रात नेहमीच त्यांना मदत करतो यावर संरक्षणमंत्र्यांनी  भर दिला.

दहशतवादाच्या मुद्द्यावर, राजनाथ सिंह म्हणाले की, भारतात अशांतता आणि हिंसाचार निर्माण करण्यासाठी सीमापार दहशतवादाला पोसण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास आहे. यामुळे या प्रदेशातील शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.

वार्षिक संरक्षण संवाद ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक संरचित मंत्रिस्तरीय द्विपक्षीय बैठक आहे. बैठकीपूर्वी, फ्रेंच संरक्षणमंत्र्यांना एचएएल  विमानतळावर त्यांच्या आगमनानंतर मानवंदना  देण्यात आली.


निलीमा चितळे/‍सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2229404) अभ्यागत कक्ष : 10