दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार आणि उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी नवी दिल्लीमध्ये भारत आणि आयर्लंडची द्विपक्षीय बैठक संपन्न
भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे तर आयर्लंडचे नेतृत्व मंत्री जॅक चेंबर्स यांच्याकडे
Posted On:
17 FEB 2026 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज नवी दिल्लीतील संचार भवन येथे आयर्लंडचे सार्वजनिक व्यय, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा सुधारणा आणि डिजिटलायझेशन मंत्री जॅक चेंबर्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

भारतीय शिष्टमंडळात केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या समवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. आयर्लंडच्या शिष्टमंडळात आयर्लंडचे मंत्री जॅक चेंबर्स; भारतातील आयर्लंडचे राजदूत केविन केली आणि आयर्लंडचे इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

या बैठकीत दूरसंचार, डिजिटल पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नियामक सहकार्य या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. यातून दोन्ही देशांमधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना नव्याने उजाळा मिळाला.

भारत-आयर्लंड डिजिटल भागीदारी अधिक मजबूत
दोन्ही बाजूंनी भारताच्या व्यापक प्रमाणातील आणि जलद अंमलबजावणी क्षमतेचा, तसेच आयर्लंडची संशोधन-आधारित नवोन्मेष परिसंस्था आणि युरोपियन युनियन-संलग्न नियामक रचनेच्या परस्पर पूरकतेची प्रशंसा केली.
“गतिमान, नवोन्मेष-आधारित लोकशाही राष्ट्र म्हणून भारत आणि आयर्लंड यांच्यात क्वांटम कम्युनिकेशन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, नियामक नवोन्मेष आणि ग्रामीण ब्रॉडबँड सेवांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता आहे, यावर मंत्री सिंधिया यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघात भारताच्या उमेदवारीसाठी आयर्लंडच्या पाठिंब्याची आम्हाला अपेक्षा आहे. एकत्रित येऊन आपण एक मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल भागीदारी निर्माण करू शकतो, हे सिंधिया यांनी अधोरेखित केले.

भारताने 2014 पासून माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या परिवर्तन प्रवासाची माहिती मंत्र्यांनी आयरिश शिष्टमंडळाला दिली.
त्यांनी परवडणाऱ्या व्हॉइस आणि डेटा दरांची उपलब्धता अधोरेखित केली, जे जागतिक स्तरावर सर्वात कमी आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) उभारण्यात भारताने मिळवलेल्या यशावरही त्यांनी प्रकाश टाकला.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) आगामी निवडणुकीत भारताच्या उमेदवारीसाठी सिंधिया यांनी आयर्लंडचे समर्थन मागितले. यामध्ये रेडिओकम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी एम. रेवती यांची उमेदवारी; 2027-2030 या कालावधीसाठी आयटीयू कौन्सिलमध्ये भारताची पुनर्निवड; आणि 2030 मध्ये आयटीयू प्लेनिपोटेंशरी कॉन्फरन्स (पीपी) आयोजित करण्याचा भारताचा प्रस्ताव यांचा समावेश आहे.
भारतीय शिष्टमंडळाने डिजिलॉकर सारख्या प्रमुख डिजिटल उपक्रमांबाबतच्या अनुभवांचे देखील कथन केले.
आयर्लंडचे मंत्री जॅक चेंबर्स यांनी आयर्लंडच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड योजनेबद्दल माहिती दिली. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सर्वसमावेशक, अर्थपूर्ण आणि परवडणारी संपर्कप्रणाली पुरवण्याच्या दृष्टीने हा आराखडा महत्त्वपूर्ण बोध देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयर्लंडच्या अर्थव्यवस्थेत, नवोन्मेषाच्या क्षेत्रात आणि रोजगार निर्मितीत भारतीय समुदायाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
दोन्ही देशांमधील माहिती तंत्रज्ञान व्यवसाय आणि उद्योग भागीदारीसाठी पुढील संधी शोधण्यात त्यांनी रस दाखवला.
सहकार्याची प्रमुख क्षेत्रे
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संरचित सहभाग, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, क्षमता बांधणी आणि उद्योगामधील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे कार्य करण्याचे मान्य केले.
पुढील दिशा
दोन्ही बाजूंनी जी2जी(सरकार ते सरकार), जी2बी (सरकार ते व्यवसाय) आणि बी2बी (व्यवसाय ते व्यवसाय) संवादांद्वारे संरचित सहभाग, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, क्षमता बांधणी आणि उद्योग संबंध दृढ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निकट सहकार्य करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229310)
अभ्यागत कक्ष : 12