राष्ट्रपती कार्यालय
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, संरक्षण हवाई गुणवत्ता हमी सेवा आणि भारतीय व्यापार सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
16 FEB 2026 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, संरक्षण हवाई गुणवत्ता हमी सेवा आणि भारतीय व्यापार सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या प्रतिष्ठित सेवांमध्ये झालेली त्यांची निवड त्यांना देशाची सेवा करण्याची संधी देते. त्यांनी अधिकाऱ्यांना आठवण करून दिली की, अनेक तरुण हे अधिकारी जिथे पोहोचले आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहतात, परंतु मोजक्याच लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते. त्या म्हणाल्या की, हे अधिकारी अनेकांसाठी प्रेरणास्थान आणि आदर्श ठरू शकतात आणि आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्या संपूर्ण वाटचालीत त्यांच्यासोबत राहील.

राष्ट्रपती म्हणाल्या की, जेव्हा त्यांच्यासारखे अधिकारी भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी वचनबद्धतेने कार्य करतात, तेव्हा आपला देश जागतिक स्तरावर अधिक सामर्थ्यवान, अधिक सक्षम आणि अधिक सन्मानित होत राहील.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ते सार्वजनिक विश्वासाचे राखणदार आणि वित्तीय विवेकाचे रक्षक आहेत. जेव्हा कार्यकारी मंडळ आणि लेखापरीक्षण संस्था यांच्यात समन्वय असतो, तेव्हा प्रशासन व्यवस्थेवरील उत्तरदायित्वाच्या चौकटीचा प्रभाव आणि मूल्यवृद्धी अधिक वाढते, असे त्यांनी नमूद केले. लेखापरीक्षण आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील प्रभावी भागीदारी सार्वजनिक खर्चाची कार्यक्षमता वाढवण्यास आणि इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते.
भारतीय व्यापार सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गुंतवणूक आकर्षित करण्यात, रोजगार निर्मितीमध्ये आणि भारतीय व्यवसायांना नवनवीन शोध घेण्यास, विस्तार करण्यास आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम असे वातावरण निर्माण करण्यात ते मोलाचे योगदान देतील. त्या म्हणाल्या की, भारताचे राष्ट्रीय हित हेच त्यांचे मार्गदर्शक तत्व असायला हवे. त्यांनी अधिकाऱ्यांना आठवण करून दिली की, त्यांनी राबवलेले प्रत्येक धोरण, दूर केलेला प्रत्येक व्यापारी अडथळा आणि त्यांनी समर्थन दिलेला प्रत्येक करार भारताला एक अधिक शक्तिशाली आणि जागतिक स्तरावर अधिक सन्मानित व्यापारी भागीदार म्हणून उदयास येण्यासाठी हातभार लावेल.

संरक्षण हवाई गुणवत्ता हमी सेवा अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या संरक्षण दलांसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि जागतिक दर्जाची शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांची सर्वोच्च गुणवत्ता मानके सुनिश्चित करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले, जेणेकरून आपल्या सशस्त्र दलांचे रूपांतर तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि 'बहुआयामी एकात्मिक ऑपरेशन्स'साठी सक्षम अशा युद्धसज्ज दलात होण्यास मदत होईल.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228716)
अभ्यागत कक्ष : 19