ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारने गुजरातमध्ये सीबीडीसी-आधारित डिजिटल खाद्यान्न कूपन पथदर्शी प्रकल्पाची केली सुरूवात
Posted On:
15 FEB 2026 8:27PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने गुजरातमध्ये मध्यवर्ती बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) आधारित डिजिटल खाद्यान्न चलन पथदर्शी प्रकल्पाची सुरूवात केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल; ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभानिया यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचे उद्घाटन केले.

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) मध्ये सेंट्रल बँक डिजिटल चलनाची (सीबीडीसी) सुरुवात भारताच्या अन्न सुरक्षा संरचनेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लाभार्थी सक्षमीकरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरणार आहे. गुजरातमध्ये सीबीडीसी-आधारित डिजिटल खाद्यान्न कूपन पथदर्शी प्रकल्पाची सुरूवात करताना, भारताची पीडीएस - 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना सेवा देणारी जगातील सर्वात मोठी अन्न वितरण प्रणाली - तंत्रज्ञान-आधारित सुधारणांद्वारे विकसित होत आहे यावर त्यांनी भर दिला. "हर दाना, हर रुपया, हर अधिकार" हे घोषवाक्य पुकारत मंत्री म्हणाले की, या उपक्रमामुळे हक्कांबद्दल जागरूकता वाढेल, उपलब्धता सुलभ होईल आणि अनुदानित अन्नधान्याच्या वितरणाबाबत उत्तरदायित्व मजबूत होईल.

सीबीडीसी संरचने अंतर्गत, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे तयार केलेले डिजिटल कूपन आज्ञावलीकृत डिजिटल चलन (e₹) म्हणून थेट लाभार्थ्यांना जमा केले जातील अशी माहिती जोशी यांनी दिली. सीबीडीसी कूपन किंवा व्हाउचर कोड वापरून लाभार्थी रास्त भाव दुकानांतून (एफ पी एस) त्यांच्या हक्काचे अन्नधान्य घेऊ शकतात. ही प्रणाली बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि ई-पीओएस क्रियान्वयन समस्यांशी संबंधित आव्हानांना तोंड देईल आणि सुरक्षित, मागोवा घेण्याजोगे आणि वस्तुनिष्ठ व्यवहार सुनिश्चित करेल. लवकरच चंदीगड, पुडुचेरी आणि दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पथदर्शी प्रकल्पाचा विस्तार केला जाईल असे त्यांनी पुढे नमूद केले.
***
सुषमा काणे/संदेश नाईक/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228495)
अभ्यागत कक्ष : 9