वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हस्तकला संग्रहालयातील कार्यक्रमामुळे ब्रिक्स राष्ट्रांबरोबर सांस्कृतिक संबंध अधिक  दृढ बनण्‍यास मदत

Posted On: 13 FEB 2026 4:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली इथं 9-10 फेब्रुवारी 2026 असे दोन दिवस भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित ब्रिक्स शेर्पा आणि सहायक शेर्पा  यांची पहिल्या बैठकी यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीच्या  समारोपानंतर, नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तकला संग्रहालयात 10 फेब्रुवारी 2026 रोजी  एका विशेष सांस्कृतिक संध्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परराष्ट्र मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालयाने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक हस्तकला आणि कला, संगीत आणि खाद्यसंस्कृतीसह आपल्या परंपरांचे दर्शन घडवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 

ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती), इराण आणि इंडोनेशिया या देशांचे शेर्पा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्रिक्स देशांचे सदस्य आणि भागीदार देशांचे राजदूत आणि सुमारे 30 परदेशी प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शकांनी संग्रहालयातील विविध दालनांची सफर घडवून आणली. या सफरीदरम्यान त्यांना भारतातील वैविध्यपूर्ण हस्तकला, लोककला आणि पारंपारिक कलाप्रकारांविषयी माहितीही देण्यात आली.

यानिमित्ताने संग्रहालयातील कारागिरांनी संकुलाच्या आवारात काळ्या मातीची भांडी, चंबा रुमाल, कलमकारी, लाखेच्या बांगड्या आणि कागदी लगद्यापासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलांची दालनेही उभारली होती.  या दालनांमध्ये भारताच्या विविध भागांमधील पारंपारिक हस्तकला आणि हातमाग उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाने पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.

पारंपारिक कला आणि हस्तकलेचे जतन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची उपस्थित प्रतिनिधींनी प्रशंसाही केली.

***

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227717) अभ्यागत कक्ष : 13