राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी ब्रह्मकुमारींच्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन करून 'सशक्त भारतासाठी कर्मयोग' या देशव्यापी मोहिमेचा केला शुभारंभ
Posted On:
13 FEB 2026 3:27PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (13 फेब्रुवारी 2026) नवी दिल्ली येथे ब्रह्मकुमारींच्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन केले आणि 'सशक्त भारतासाठी कर्मयोग' या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला. त्यांनी गुरुग्राम येथील ओम शांती रिट्रीट सेंटरच्या रौप्यमहोत्सवी समारंभाचे उद्घाटनही केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, संतुलित आणि सर्वांगीण विकासासाठी भौतिक प्रगतीबरोबर नैतिक मूल्ये आणि अध्यात्म यांची सांगड घालणे आवश्यक आहे.
अध्यात्म आपल्याला मूलभूत मूल्ये आणि नैतिक चौकट प्रदान करते, जी आपल्याला कर्मयोग किंवा निःस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा देते. अध्यात्मामध्ये सचोटी, करुणा, अहिंसा आणि इतरांची सेवा या गुणांवर भर दिला जातो, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राजयोग शिकवते. हे केवळ एका जागी बसून आत्म चिंतन करणे नाही, तर कर्मयोग हा त्याचा मूलभूत भाग आहे. कर्मयोग म्हणजे आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना उच्च अध्यात्मिक तत्त्वांचे पालन करणे. ब्रह्मकुमारींशी संबंधित लाखो लोक नियमितपणे कर्मयोगाचा अभ्यास करून अर्थपूर्ण जीवन जगत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

त्या म्हणाल्या की, कर्मयोगाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक नागरिक भारताच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासात योगदान देऊ शकतो. यामुळे भारत केवळ आर्थिकदृष्ट्या प्रगती करणार नाही, तर जगासाठी मूल्याधारित जीवनाचा आदर्श ठरेल असा समाज घडवण्यातही आपल्याला सहाय्य होईल.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
***
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2227605)
अभ्यागत कक्ष : 15