वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तंत्रज्ञान क्षेत्राला 2035 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठून देण्यासाठी आपली महत्त्वाकांक्षा नव्याने परिभाषित करावी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित ऊर्जेची कास धरावी : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांचे उद्योग क्षेत्राला आवाहन

Posted On: 12 FEB 2026 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राने आपली महत्त्वाकांक्षा नव्याने परिभाषित करावी आणि त्याअंतर्गत 2035 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी केले आहे. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्ता, माहितीसाठा केंद्र (डेटा सेंटर्स) आणि स्वच्छ उर्जेचे आहे, अशा काळात आघाडीवर राहण्यासाठी उद्योगांनी नव्या कल्पकतेची कास धरणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी दिल्ली इथे आज नीती फ्रंटियर टेक हबच्या रीइमॅजिनेशन अहेड  या पथदर्शी अहवालाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. भारताने 2030 पर्यंत किमान 10 गिगावॅट (GW) क्षमतेचे माहितीसाठा केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले पाहिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ताधारित तंत्रज्ञान विषयक सेवांचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भविष्यातील प्रगती ही उपयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता (Applied AI), मोठ्या प्रमाणावर पुनर्कौशल्यकरण घडवून आणणे (Reskilling), देशांतर्गत मूल्यनिर्मिती करणे आणि देशातील प्रतिभा देशातच टिकवून ठेवण्यावर अवलंबून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतात सुमारे एक अब्ज इंटरनेट वापरकर्ते आहेत, भारत डेटाचा जगातील सर्वाधिक दरडोई खप असलेल्या देशांपैकी एक आहे आणि देशात प्रचंड वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. या परिस्थितीने विस्तारासाठीचा एक मजबूत पाया रचला असल्याची बाब पीयुष गोयल यांनी अधोरेखित केली. स्वस्त डेटा, 5G चा विस्तार आणि येऊ घातलेल्या 6G क्षमतेमुळे भारताची डिजिटल परिसंस्था अधिक मजबूत झाली असून, यामुळे 250 ते 300 अब्ज डॉलरच्या तंत्रज्ञान सेवा उद्योगाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला असल्याचे ते म्हणाले.

अलिकडेच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही विशिष्ट गुंतवणुकींसाठी 2047 पर्यंत प्राप्तिकरात सवलत देण्याच्या घोषणा झाल्या आहेत, या घोषणांमुळे थेट परकीय गुंतवणूक, परकीय चलनाचा ओघ आणि रोजगार निर्मितीला, विशेषतः माहितीसाठा केंद्रांशी संबंधित व्यापक परिसंस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी क्षमतांमध्ये वाढ होईल, मात्र त्याचवेळी सायबर सुरक्षा, मानवी पडताळणी आणि माहिती साठ्याबाबतची वस्तुनिष्ठता हे घटक अत्यंत कळीच्या बाबी म्हणून कायम राहतील असे मतही त्यांनी व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी अवलंब घडून यावा याची सुनिश्चित करण्यासाठी उद्योग-व्यावसाय क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्त्वे, धोरणकर्ते आणि निर्णयकर्त्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक शिक्षणाचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या सर्व प्रक्रियांमध्ये केंद्र सरकारचे पूर्ण पाठबळ राहील याबाबत त्यांनी आश्वस्त केले. तंत्रज्ञान विषयक सेवा आणि आघाडीच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण व्हावी याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकार या उद्योग क्षेत्रासोबत भागिदारीत मिशन मोडमध्ये काम करण्यासाठी तयार असल्याचेही पीयुष गोयल यांनी सांगितले.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227316) अभ्यागत कक्ष : 13