युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 च्या गुलमर्ग इथल्या टप्प्यासाठीच्या तारखा केल्या जाहीर
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी हीच योग्य वेळ असल्याचे क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे प्रतिपादन
Posted On:
12 FEB 2026 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 च्या गुलमर्ग इथल्या टप्प्यासाठीच्या तारखा जाहीर केल्या. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांची ही सहावी आवृत्ती असेल. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 चा पहिला टप्पा 20 ते 26 जानेवारी दरम्यान लडाखमध्ये यशस्वीरित्या पार पडला. या टप्प्यात आईस स्पोर्ट्स चा समावेश होता. आता या टप्प्यात गुलमर्गकडे बर्फातील क्रीडा स्पर्धांचे -स्नो स्पोर्ट्सचे यजमानपद असणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील या टप्प्यात भारतीय सैन्य दलदेखील आपले जेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
गुलमर्गमधील टप्पा हा हिवाळी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर होत असून, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. लेह (लडाख) मधील पहिला टप्पा अतिशय यशस्वीरित्या पार पडला. आता जम्मू आणि काश्मीरमध्येही तसाच उत्साह पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या टप्प्यासाठी आलेले खेळाडू पुन्हा एकदा निसर्ग आणि आव्हानात्मक परिस्थिती अशा दोन्हींशी हात करतील, असे त्यांनी नमूद केले.
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांमुळे बर्फावरील खेळ आणि हिम क्रिडा प्रकारांना राष्ट्रीय स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून दिले आहे. यामुळे भारतातील हिवाळी क्रीडा परिसंस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे. यामुळे खेळाडूंचा सहभाग, कामगिरीचा दर्जा आणि अशा क्रिडा प्रकारांबाबतची सार्वजनिक जागरूकताही लक्षणीयरीत्या वाढली आहे. कधीकाळी हा क्रीडा प्रकार उपेक्षित होता, मात्र आता सुनियोजबद्धतेने असे खेळ खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंची एक फळी निर्माण होऊ लागली आहे.
हे सकारात्मक बदल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून येत आहेत. भारतातील हिवाळी क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी परदेशात पदक तालिकेत स्थान मिळवायला आणि स्पर्धात्मक कामगिरी करण्याला सुरुवात केली आहे. या सगळ्या घडामोडी या क्रीडा प्रकारात नव्या प्रतिभावान पिढीचा उदय होत असल्याचेच द्योतक आहेत. विशेषतः, तारा प्रसाद या भारतीय फिगर स्केटरने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी केली, तर भारतीय महिला आईस हॉकी संघाने 2025 च्या आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघाच्या (IIHF) महिला आशिया चषक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदकही पटकावले. आंतरराष्ट्रीय आईस हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतले भारताचे हे पहिलेच पदक होते. या स्पर्धेदरम्यान संघाने अनेक महत्त्वाचे विजयही नोंदवले. यातून जागतिक स्तरावर बर्फावरील खेळांमध्ये भारत साध्य करत असलेली वेगवान प्रगती यातून अधोरेखित होते.
गुलमर्गमधील यंदाच्या स्पर्धेत स्की माउंटेनिअरिंग, अल्पाइन स्कीइंग, नॉर्डिक स्कीइंग (क्रॉस-कंट्री) आणि स्नोबोर्डिंग या चार पदक श्रेणीतील क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. या स्पर्धेत सुमारे 400 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा असून अल्पाइन स्कीइंगमध्ये सर्वाधिक सहभाग असेल अशी अपेक्षा आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2227238)
अभ्यागत कक्ष : 27