विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
संसदेतील प्रश्न : स्वदेशी प्रतिजैविकांचा विकास
Posted On:
11 FEB 2026 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2026
वॉकहार्ट समूहाने नाफिथ्रोमायसिन विकसित केले आहे. हे विशेषतः समाजिक स्तरावरील संपर्कातून पसरणाऱ्या संसर्गामुळे होणाऱ्या जीवाणूजन्य न्यूमोनियाच्या (CABP) उपचारांसाठी तयार केलेले एक नवीन मॅक्रोलाईड आहे. भारतातील नाफिथ्रोमायसिनच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय निदानाशी संबंधित संशोधनाला जैवतंत्रज्ञान विभागाच्या (DBT) जैवतंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्र संशोधन सहाय्यक परिषदेने (BIRAC) अंशतः सहकार्य केले आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) वॉकहार्ट लिमिटेडला प्रौढांमधील (18 वर्षे किंवा त्याहून अधिक) सामाजिक स्तरावरील संपर्कातून पसरणाऱ्या संसर्गामुळे होणाऱ्या जीवाणूजन्य न्यूमोनियाच्या उपचारांसाठी नाफिथ्रोमायसिन 400 मिलीग्राम टॅब्लेटची विक्री आणि वितरणासाठी विपणन अधिकृतता परवानगी दिली आहे.
सरकार नियोजनबद्ध निधी सहाय्य आणि परिसंस्था विषयक पाठबळ पुरवून प्रतिजैविकांचा स्वदेशी शोध आणि विकासाला चालना देण्यासाठी संशोधन, विकास आणि नवोन्मेषाला पाठबळ देत आहे. सरकारच्या या सहकार्याची व्याप्ती अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील संशोधन आणि विकासापासून ते उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि व्यावसायीकरणापर्यंतच्या टप्प्यापर्यंत विस्तारलेली आहे. याअंतर्गत केले गेलेले काही विशिष्ट प्रयत्न खाली नमूद केले आहेत:
- जैवतंत्रज्ञान विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील कार्यालयासोबतच्या सहकार्याने भारतात नवीन प्रतिजैविकांचे संशोधन, शोध आणि विकासासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना, मार्गदर्शक ठराव्यात या हेतूने भारतीय प्राधान्य रोगजंतू (Indian Priority Pathogen) यादी तयार केली आहे.
- जैवतंत्रज्ञान विभाग आपल्या बायो-राइड (Bio- RIDE) योजनेच्या माध्यमातून सूक्ष्मजीवविरोधी उपचार (Anti-microbial therapeutics), प्रतिजैविकांचे संयोजन, कार्यक्षमतेचा अभ्यास तसेच मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, स्टॅफिलोकोकस ऑरियस, ई-कोलाय यांसारख्या रोगजंतूंवरील औषधांच्या पुनर्वापराच्या अभ्यासासाठी संशोधन आणि विकास विषयक प्रकल्पांना पाठबळ देत आहे.
- औषधनिर्माण विभाग आपल्या औषधनिर्माण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन (PRIP) योजनेअंतर्गत नवीन औषधांचा विकास आणि प्रमाणीकरणासाठी पाठबळ पुरवत आहे.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सूक्ष्मजीवविरोधी प्रतिकारशक्तीचा (AMR) सामना करण्यासाठी नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या लहान रासायनिक रेणू विकसित करण्याचा उपक्रमही हाती घेतला आहे.
- लखनऊ इथल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेने (CSIR-CDRI), प्रतिजैविके विकसित करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.
स्वदेशी प्रतिजैविकांच्या विकासामुळे औषध प्रतिरोधक संसर्गावर उपचार करण्याची क्षमता सुधारेल, प्रभावी आणि स्वस्त उपचार उपलब्ध होऊ शकतील, आत्मनिर्भरता वाढेल आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या परिणामकारतेतही सुधारण घडून येईल. परिणामी सूक्ष्मजीवविरोधी प्रतिकारशक्तीचा सामना करण्याची राष्ट्रीय क्षमताही बळकट होईल. यामुळे देशांतर्गत संशोधन आणि उत्पादनालाही बळकटी मिळेल.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2226741)
अभ्यागत कक्ष : 11