विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने(डीएसटी) हरित हायड्रोजन संशोधन आणि क्षमता निर्मितीमध्ये भारत-नेदरलँड्स सहकार्य केले अधिक बळकट
Posted On:
06 FEB 2026 3:23PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) आज भारत-नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रमाच्या प्रारंभाद्वारे तसेच नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन विद्यापीठ आणि 19 भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्यात हरित ऊर्जा आणि हायड्रोजन संशोधनामध्ये एक सक्षम शैक्षणिक सहकार्य आराखडा तयार करण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करून स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारत-नेदरलँड्स वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ केले.
भारत-नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रमासाठी योजनेची मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रस्ताव (सीएफपी) मागवण्याची सूचना आज प्रसिद्ध करण्यात आली. हा एक राष्ट्रीय क्षमता-निर्मिती उपक्रम असून तो विविध संस्थांमधील पात्र भारतीय डॉक्टरेट, पोस्ट-डॉक्टरेट आणि प्राध्यापक अर्जदारांसाठी खुला आहे.
या फेलोशिप कार्यक्रमाचा प्रारंभ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते झाला. यावेळी नेदरलँड्सचे भारतातील उप-राजदूत हुइब मिजनारेंड्स यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
विशेषतः भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांशी संरेखित असलेल्या, उत्सर्जन कमी करण्यास कठीण असलेल्या क्षेत्रांमध्ये, हायड्रोजन तंत्रज्ञान संशोधन ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पुढे नेण्यासाठी केंद्रित आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि लक्ष्यित क्षमता-निर्मिती उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत, असे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डीएसटीचे सचिव प्रा. करंदीकर म्हणाले.
नेदरलँड्सचे भारतातील उप-राजदूत हुइब मिजनारेंड्स यांनी हायड्रोजन आणि ऊर्जा संक्रमणामध्ये भारत-डच सहकार्याच्या सुसंगततेवर भर दिला. ग्रोनिंगेन विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जौके डी फ्रीस यांनी जागतिक ऊर्जा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शाश्वत शैक्षणिक भागीदारीच्या भूमिकेवर भर दिला.
भारत-नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रमाचे उद्दिष्ट नेदरलँड्समधील प्रगत हायड्रोजन परिसंस्थेच्या पद्धतशीर अनुभवातून हायड्रोजन तंत्रज्ञानामध्ये भारताची अंमलबजावणीची तयारी मजबूत करणे हे असून यात प्रणाली एकात्मीकरण, सुरक्षा, तांत्रिक-आर्थिक विश्लेषण, जीवन-चक्र मूल्यांकन आणि स्वदेशीकरणाच्या मार्गांवर भर दिला जाईल. संशोधनाचे निष्कर्ष थेट राष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा प्राधान्यांमध्ये योगदान देतील, याची या फिलोशीप मध्ये तरतूद करण्यात आली आहे..
डीएसटीने ग्रोनिंगेन विद्यापीठ आणि 19 आयआयटी यांच्यात संस्था-स्तरीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची व्यवस्था देखील केली. या कराराद्वारे हायड्रोजन आणि हरित ऊर्जा संशोधनामध्ये दीर्घकालीन शैक्षणिक सहकार्यासाठी एक सक्षम आराखडा स्थापित केला जाणार आहे. हा सामंजस्य करार प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि ज्ञान सामायिकरण सुलभ करेल तसेच या करारात कोणत्याही स्वयंचलित आर्थिक वचनबद्धता समाविष्ट नाहीत. या उच्च-स्तरीय सहभागातून हरित हायड्रोजनमधील संशोधन, क्षमता विकास आणि उपयोजन-केंद्रित नवोन्मेषाला चालना देण्यासाठी भारत आणि नेदरलँड्सची सामायिक वचनबद्धता दिसून आली, जी भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, ऊर्जा स्वातंत्र्य 2047 आणि नेट-झिरो 2070 च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
आयआयटी गोवाचे संचालक प्रा. धीरेंद्र एस. कट्टी; आयआयटी धारवाडचे संचालक प्रा. वेंकप्पय्या आर. देसाई; डीएसटीच्या सीईएसटी विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता गुप्ता; एचव्हीआयसी आणि एचएफसी कार्यक्रम अधिकारी आणि सीईएसटी, डीएसटीचे वरिष्ठ संचालक डॉ. रणजित कृष्णा पै तसेच इतर आयआयटींचे वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे उपक्रम भारत-नेदरलँड्स सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि उदयोन्मुख जागतिक हायड्रोजन अर्थव्यवस्थेसाठी मानवी भांडवल मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224510)
अभ्यागत कक्ष : 11