जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जल जीवन मिशनचा आढावा

Posted On: 05 FEB 2026 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

ऑगस्ट 2019 पासून भारत सरकार राज्यांच्या भागीदारीत जल जीवन मोहीम (जेजेएम) - हर घर जल या मोहिमेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अंमलबजावणी करत आहे.

जेजेएम सुरू झाल्यापासून ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जेजेएम सुरू होताना देशात केवळ 3.23 कोटी (16.72 टक्के) ग्रामीण कुटुंबांकडे नळाद्वारे पाणीपुरवठा होता. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जेजेएम अंतर्गत सुमारे 12.59 कोटी अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे 28.01.2026 रोजी देशातील 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 15.79 कोटींपेक्षा जास्त (81.57 टक्के) कुटुंबांना त्यांच्या घरात नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध असल्याचे नोंदवले गेले आहे.

या मिशनसाठी एकूण अंदाजित खर्च 3.60 लाख कोटी रुपये असून त्यापैकी केंद्राचा वाटा 2.08 लाख कोटी रुपये आहे. 2024-25 पर्यंत मंजूर केलेला केंद्राचा जवळपास संपूर्ण निधी वापरण्यात आला आहे. आतापर्यंत झालेली प्रगती आणि सुरू असलेली कामे लक्षात घेऊन, अर्थमंत्र्यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये जल जीवन मिशनचा कालावधी डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली असून एकूण खर्चातही वाढ करण्यात आली आहे. तसेच 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात जेजेएमसाठी 67,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हर घर जल (एचजीजे) गावांअंतर्गत 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 761 जिल्ह्यांमधील 2,37,608 कुटुंबांचा समावेश असलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, सर्वेक्षण केलेल्या गावांतील 98.1 टक्के कुटुंबांमध्ये नळजोडणी उपलब्ध आहे.

ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमनन्ना यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.


नेहा कुलकर्णी /गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2224176) अभ्यागत कक्ष : 16