रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाय योजना
Posted On:
04 FEB 2026 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशात रस्ते सुरक्षेच्या सर्वोत्तम पद्धती अंमलात आणण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास येथे ' रस्ता सुरक्षा उत्कृष्टता केंद्रा'ची स्थापना केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कामे भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी) यांच्या मानके, मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली, कार्यपद्धती संहिता तसेच रस्ते आणि पूल बांधकामांसाठीच्या वैशिष्ट्यांनुसार केली जातात. हे तपशील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावर तयार करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या आणि अपघात कमी करण्याच्या उद्देशाने प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) तैनात करण्याची योजना आहे. एटीएमएस अंतर्गत इलेक्ट्रॉनिक देखरेख, अंमलबजावणी, घटनांची लवकर ओळख आणि प्रत्यक्ष क्षेत्रात तात्काळ प्रतिसाद देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ घटना शोध आणि अंमलबजावणी प्रणाली (व्हीआयडीईएस), स्वयंचलित नंबर प्लेट ओळख (एएनपीआर) कॅमेरे, पॅन टू झूम (पीटीझेड) कॅमेरे आणि पाळत ठेवणारे कॅमेरे यांचा समावेश आहे. वाहने अधिक सुरक्षित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मध्यम आणि अवजड वाहनांसाठी सक्रिय सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत नियम प्रकाशित करण्यात आले असून त्या अंतर्गत अँटी-लॉक ब्रेकिंगसह ब्रेकिंग सिस्टीमची तरतूद करण्यात आली आहे.
शासनाने राष्ट्रीय महामार्गांवर अधिक जीवितहानी होणारे कॉरिडॉर – पट्टे ओळखले असून अपघात कमी करण्यासाठी त्या त्या जागांच्या गरजेनुसार विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि ती अधिक मजबूत करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना पाळला जातो. या कालावधीत रस्ते अपघात आणि जीवितहानी कमी करण्यासाठी सार्वजनिक जागरूकता मोहीम, पत्रके वाटप, हेल्मेट वाटप इत्यादी उपक्रम राबवले जातात.
ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
सुवर्णा बेडेकर /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223494)
अभ्यागत कक्ष : 25