पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
भू-राजकीय चढउताराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा नेतृत्वाला भक्कमपणे दुजोरा देत आणि नवोन्मेष उत्कृष्टतेला सन्मानित करून भारत ऊर्जा सप्ताह 2026 चा समारोप
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारताची सज्जता, लवचिकता आणि वाढता जागतिक ऊर्जा प्रभाव अधोरेखित केला
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
जागतिक ऊर्जा संवादाच्या केंद्रस्थानी राहताना जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील शाश्वत भू-राजकीय अस्थिरतेचा सामना सज्ज असल्याचे भारताने दाखवून दिले आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गोव्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह (IEW) 2026 च्या समारोप समारंभात सांगितले.
समारोप प्रसंगी आयोजित अनौपचारिक चर्चेदरम्यान बोलताना, केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की भारताची ऊर्जा रणनीती विविधता, लवचिकता आणि दूरदर्शी संक्रमणांवर आधारित आहे. "भारताने सातत्याने भू-राजकीय धक्क्यांचा सामना केला आहे. पुरवठा स्रोतांच्या विविधीकरणाद्वारे आणि स्वच्छ इंधनांकडे जलद संक्रमणाद्वारे प्रत्येक आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर केले आहे," असे पुरी म्हणाले.
भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक, चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे. "जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत ऊर्जेची उपलब्धता, किफायतशीरता आणि स्थिरता सुनिश्चित करत राहील," असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी भारताच्या 7 टक्क्यांहून अधिकच्या अनुमानित आर्थिक वाढीला समर्थन देण्यासाठी सरकारची रूपरेषा मांडली. त्यांनी ऊर्जा स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी देशांतर्गत अन्वेषण आणि उत्पादन मजबूत करण्यावर , तसेच भारताला रिफाइंड उत्पादनांचा विश्वासार्ह जागतिक पुरवठादार बनवण्यावर भर दिला . डॉ. मित्तल यांनी ऊर्जा मूल्य साखळीत परिचालन कार्यक्षमता आणि लवचिकता सुधारण्यात डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लॉजिस्टिक्स ऑप्टिमायझेशनची वाढती भूमिकाही अधोरेखित केली.
समारोप समारंभात ‘आयईडब्ल्यू 2026’ ची सांगता झाली. यामध्ये स्टार्टअप्स, शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील नवोन्मेष, तांत्रिक उत्कृष्टता आणि नेतृत्वाला ओळखणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
'अविन्या – द एनर्जी स्टार्टअप चॅलेंज' अंतर्गत, मिनिमाइन्स क्लीनटेक सोल्युशन्स ही कंपनी विजेती ठरली. या कंपनीच्या मालकीच्या ‘एचएचएम’ प्रक्रियेद्वारे जुन्या लिथियम-आयन बॅटरीमधून उच्च-मूल्याच्या सामग्रीची कमी-कार्बन पद्धतीने पुनर्प्राप्ती करण्याच्या तंत्रज्ञानासाठी कंपनीला हा पुरस्कार मिळाला. या तंत्रज्ञानाचा वापर सौर पॅनेल, उत्प्रेरक कन्व्हर्टर आणि कायमस्वरूपी चुंबकांसाठीही होतो.
'वसुधा – ओव्हरसीज अपस्ट्रीम स्टार्टअप चॅलेंज' नेदरलँड्सच्या सेनरजेटिक्स कंपनीने जिंकले. अपस्ट्रीम कार्यांमध्ये सुरक्षा, विश्वसनीयता आणि शाश्वतता वाढवणाऱ्या कंपनीच्या कृत्रिम प्रज्ञा -आधारित गंजण्याच्या प्रक्रिया होवू नये म्हणून देखभाल करणे, या प्रणालीसाठी कंपनीला हा पुरस्कार मिळाला.
‘हॅकॅथॉन चॅलेंज’ आयआयटी मुंबईने जिंकले. त्यांनी विकसित केलेल्या 'ऑरा' या कृत्रिम प्रज्ञेवर चालणाऱ्या एकात्मिक जलाशय विश्लेषण प्लॅटफॉर्मसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला, जो शोध घेणे आणि उत्पादन निर्णयप्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी प्रगत मशीन लर्निंगचा वापर केला जातो.
उद्योग क्षेत्रातील उत्कृष्टतेला एफआयपीआय /आयआयपी वार्षिक पुरस्कारांद्वारे सन्मानित करण्यात आले. ओएनजीसी म्हणजेच नैसर्गिक तेल आणि वायू महामंडळाला 'एक्सप्लोरेशन कंपनी ऑफ द इयर' आणि ऑइल इंडिया लिमिटेडला 'ऑइल अँड गॅस प्रॉडक्शन कंपनी ऑफ द इयर' (एक दशलक्ष टन तेल समतुल्य पेक्षा जास्त) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जामनगर येथील सेझ रिफायनरीला 'रिफायनरी ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आले, तर नवोन्मेष नेतृत्वाचा पुरस्कार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संशोधन आणि विकास विभागाला आणि मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या नवोन्मेष केंद्राला संयुक्तपणे प्रदान करण्यात आला.
इंडिया एनर्जी वीक 2026 ची सांगता भारताला एक स्थिर, विश्वासार्ह आणि व्यावहारिक ऊर्जा नेता म्हणून स्थापित करण्याने झाली. ऊर्जा सुरक्षा, परवडणारी किंमत आणि शाश्वतता यांचा समतोल साधण्याची क्षमता भारतामध्ये आहे, तसेच ऊर्जा परिसंस्थेमध्ये नवोन्मेष आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जात आहे, यावर या समारंभात भर देण्यात आला.
इंडिया एनर्जी वीक’बद्दल
इंडिया एनर्जी वीक म्हणजेच भारत ऊर्जा सप्ताह हे देशाचे प्रमुख जागतिक ऊर्जा व्यासपीठ आहे. यामुध्ये सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्याकडे प्रगतीला गती देण्यासाठी सरकारी मंडळी , उद्योग कार्यकारी आणि नवोन्मेषकांना एकत्र आणते. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय मंच म्हणून, आयईडब्ल्यू गुंतवणूक, धोरणात्मक सुसंवाद आणि तांत्रिक सहकार्याला चालना दिली जाते. यामुळे जागतिक ऊर्जा परिदृश्याला आकार दिला जातो.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2220968)
आगंतुक पटल : 6