आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष उत्पादनांची डिजिटल उपलब्धता आणि गुणवत्ता हमी वर्धित करण्यासाठी आयुषएक्सिल आणि झेप्टो यांनी केला सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 28 JAN 2026 10:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जानेवारी 2026

 

आयुष मंत्रालयाने आज देशभरात आयुष औषधे आणि आरोग्य उत्पादनांसाठी सुव्यवस्थित ऑनलाइन उपलब्धता सुलभ करण्यासाठी आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद (आयुषएक्सिल) आणि झेप्टो लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचा उद्देश पारंपरिक आरोग्य उत्पादनांमध्ये गुणवत्तेचे पालन आणि ग्राहकांचा विश्वास सुनिश्चित करताना डिजिटल उपलब्धता अधिक मजबूत करणे हा आहे.

व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की नाविन्यपूर्ण भारतीय स्टार्टअप्स विश्वसनीय आरोग्य उत्पादनांची उपलब्धता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांनी यावर भर दिला की, झेप्टोसारख्या विश्वसनीय डिजिटल प्लॅटफॉर्मसोबतची भागीदारी हे दर्शवते की, भारताच्या समृद्ध आयुष वारशाची आधुनिक, पारदर्शक आणि सोयीस्कर वितरण प्रणालीशी सांगड घालून तो देशभर पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा जबाबदारीने आणि मोठ्या प्रमाणावर कसा उपयोग केला जाऊ शकतो.

   

मंत्र्यांनी पुढे नमूद केले की हे सहकार्य भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांशी जोडण्याच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. त्यांनी अधोरेखित केले की अशा उपक्रमांमुळे ग्राहकांना माहितीपूर्ण निवड करण्याचे सामर्थ्य मिळते, त्याचबरोबर गुणवत्ता, सुरक्षितता किंवा नियामक मानकांशी कोणतीही तडजोड न करता, आयुष उत्पादकांसाठी नवीन बाजारपेठेच्या संधी उपलब्ध होतात.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि आयुषएक्सिलचे अध्यक्ष अनुराग शर्मा आणि झेप्टोचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कैवल्य व्होरा यांनी तो कार्यान्वित केला.

ही भागीदारी आयुष उत्पादकांना, विशेषत: एमएसएमईंना डिजिटल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रचनात्मक मार्ग तयार करते, असे आयुषएक्सिलचे अध्यक्ष अनुराग शर्मा म्हणाले. त्यांनी नमूद केले की आयुषएक्सिल, विहित गुणवत्ता आणि नियामक मानकांची पूर्तता करणाऱ्या पात्र उत्पादकांना ओळखून हे सुलभ करेल, त्यामुळे अस्सलतेशी कोणतीही तडजोड न करता व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल.

   

यावेळी बोलताना आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, उत्पादनाची गुणवत्ता, नियामक अनुपालन आणि जनतेचा विश्वास सुनिश्चित करणे ही मंत्रालयाची प्राथमिकता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आयुष गुणवत्ता चिन्हाच्या जाहिरातीसह गुणवत्ता हमी यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि आयुष पद्धतींबद्दल अचूक आणि विज्ञान-समर्थित माहितीचा जबाबदार प्रसार करण्यासाठी हे सहकार्य केले आहे.

झेप्टोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैवल्य व्होरा यांनी सांगितले की, या सहकार्याअंतर्गत, झेप्टो ग्राहकांना अधिक स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने सत्यापित आयुष उत्पादने शोधायला सहाय्य करण्यासाठी समर्पित आयुष स्टोअरफ्रंट उपलब्ध करेल. ते पुढे म्हणाले की, हा प्लॅटफॉर्म पारदर्शक सोर्सिंग, अनुपालन आणि वेगवान डिजिटल अनुभवावर लक्ष केंद्रित करेल.

   

या सामंजस्य कराराअंतर्गत, आयुषएक्सिल, पात्र आयुष उत्पादकांची शिफारस करेल आणि नियामक अनुपालनासाठी शैक्षणिक सामग्रीचा आढावा घेईल, तर झेप्टो आपल्या व्यासपीठावर समर्पित आयुष स्टोअरफ्रंटद्वारे उत्पादन शोधायला सहाय्य करेल. या सहकार्यामध्ये संयुक्त ग्राहक जागरूकता उपक्रमांचा समावेश आहे आणि आयुष गुणवत्ता चिन्हासह मान्यताप्राप्त गुणवत्ता मानकांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • ग्राहकांना प्रमाणित आयुष औषधे आणि आरोग्यविषयक निगेची उत्पादने सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने झेप्टोवर (Zepto) एक समर्पित आयुष स्टोअरफ्रंट ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • प्रमाणित मानके, गुणवत्ता आणि अस्सलतेविषयक नियमनांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आयुष क्वालिटी मार्क अर्थात आयुष गुणवत्ता निकषांच्या  (AQM - AYUSH Quality Mark) अंमलबजावणीला प्रोत्साहन दिले जाईल.
  • उत्पादने डिजिटल स्वरुपात प्रदर्शित करण्यासाठी विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर दिला जाईल, याअंतर्गत पात्र आयुष उत्पादक निश्चित करण्याची आणि त्यांची शिफारस करण्याची जबाबदारी आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद (AYUSHEXCIL - Ayush Export Promotion Council) पार पाडेल.
  • आयुष उत्पादनांची अधिकृत माहिती आणि जबाबदारपूर्वक वापरासंबंधी प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने ग्राहकामध्ये जनजागृती करण्यासाठी संयुक्त उपक्रम राबवले जातील.
  • आयुष व्यवस्थेसंबंधी विश्वसार्ह शैक्षणिक आशय - सामग्री विकसित करणे आणि ती आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेकडून प्रमाणित केल्यानंतर  झेप्टोच्या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केली जाईल. यासाठी दोन्ही संस्था परस्पर सहकार्याने काम करतील, असे या करारात नमूद करण्यात आले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219855) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी