पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित


आज सकाळी महाराष्ट्रात एक दुःखद विमान अपघात झाला, ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे: पंतप्रधान

अजित दादांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि विशेषतः ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. मी अजित पवारजींच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो: पंतप्रधान

या दुःखद अपघातात प्राण गमावलेल्या सहकाऱ्यांची आठवण सदैव ठेवली जाईल आणि दुःखाच्या या क्षणी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभा आहे: पंतप्रधान

एनसीसी ही भारताच्या युवा शक्तीला सक्षम करणारी चळवळ आहे: पंतप्रधान

आज जग भारताच्या युवा वर्गाकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे: पंतप्रधान

युरोपियन संघासोबत झालेला करार जगाचे लक्ष वेधून घेत आहे, अनेकजण याला सर्व करारांची जननी आणि जगासाठी बाजी पालटून टाकणारा म्हणत आहेत: पंतप्रधान

आज युद्धे अनेक आघाड्यांवर लढली जातात, ती कोडच्या माध्यमातून तसेच क्लाउडमध्येही लढली जातात; तंत्रज्ञानात मागे पडलेले देश केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सुरक्षेच्या बाबतीतही कमकुवत असतात: पंतप्रधान

विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपण कसे वागतो हा देखील एक महत्त्वाचा पैलू आहे. नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे: पंतप्रधान

युवा फिट तर देश हिट !: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 28 JAN 2026 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जानेवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊंडवर आयोजित वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित केले. एनसीसी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, एनसीसी, एनएसएसचे छात्र, चित्ररथ कलाकार, राष्ट्रीय रंगशाळेतील सहकारी आणि देशभरातील तरुण सहभागींनी सादर केलेल्या समन्वित सादरीकरणांमध्ये त्यांचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत होते.

मोदी यांनी दु:ख व्यक्त करत नमूद केले की, आज सकाळी महाराष्ट्रात झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळेही मोठा शोककळा पसरली आहे, यात उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अधोरेखित केले की, अजित दादांनी विशेषतः ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी काम करून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांनी अजित पवार जी यांच्या कुटुंबाप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की दुःखाच्या या क्षणी संपूर्ण देश अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत उभा आहे. दुःख आणि शोकसंवेदनांच्या या क्षणांमध्येही पंतप्रधानांनी मित्र राष्ट्रांच्या छात्रांसह उपस्थित असलेल्या सर्व छात्रांना शुभेच्छा दिल्या आणि या वर्षी यामध्ये मुलींचा मोठा सहभाग असल्याची दखल घेतली.

“एनसीसी ही एक अशी चळवळ आहे जी भारतातील तरुणांना आत्मविश्वासपूर्ण, शिस्तबद्ध, संवेदनशील आणि राष्ट्राला समर्पित नागरिक बनवते,” असे मोदी यांनी अधोरेखित केले आणि दरवर्षी हे छात्र आपली भूमिका अधिक मजबूत करत आहेत, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की अलिकडच्या वर्षांत एनसीसी कॅडेट्सची संख्या 14 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढली आहे, ज्यात सीमावर्ती आणि किनारी भागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एनसीसी हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तरुण अभिमानाने आपला वारसा जपतात. देशभरात 'वंदे मातरम्'चा 150 वर्षांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यांनी परमवीर सागर यात्रेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून उल्लेख केला आणि आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने अंदमान आणि निकोबारमधील 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत आणि छात्रांनी आपल्या नौकानयन मोहिमेद्वारे राष्ट्रीय नायकांचा सन्मान करण्याची ही भावना पुढे नेली. मोदी यांनी हे देखील स्पष्ट केले की लक्षद्वीपमध्ये, बेटांवरील महोत्सवाद्वारे, छात्रांनी महासागर, संस्कृती आणि निसर्ग यांचा एकत्रितपणे उत्सव साजरा केला.

मोदी म्हणाले की एनसीसीने स्मारकांपासून ते रस्त्यांपर्यंत इतिहास जिवंत केला आहे आणि आपल्या सायकल रॅलीद्वारे बाजीराव पेशव्यांचे शौर्य, महान योद्धा लचित बोरफुकन यांचे कौशल्य आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाला प्रकाशमान केले आहे, ज्यामुळे समाजात जनजागृती झाली. त्यांनी सर्व छात्रांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आज सन्मान लाभलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणातील शब्दांची आठवण करून देत, हीच योग्य वेळ, सर्वोत्तम वेळ आहे असे सांगून पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, आजचा काळ हा भारतातील तरुणांसाठी सर्वाधिक संधींचा काळ आहे. भारत आणि युरोपियन संघ यांच्यात झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराचा दाखला देत, या काळात तरुणांना सर्वाधिक फायदा होईल याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी भारताने ओमान, न्यूझीलंड, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस या देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत, जे लाखो तरुणांसाठी असंख्य संधी निर्माण करत आहेत.

संपूर्ण जग भारतातील तरुणांकडे मोठ्या विश्वासाने पाहत असल्याचे अधोरेखित करून मोदी म्हणाले की, या विश्वासाचे कारण त्यांचे कौशल्य आणि मूल्ये आहेत. भारतीय तरुणांमध्ये लोकशाहीची मूल्ये, विविधतेचा आदर आणि जग हे एक कुटुंब असल्याचा विश्वास आहे, त्यामुळे  ते जिथे जातील तिथल्या लोकांशी सहजपणे एकरूप होतात आणि त्या देशांच्या विकासात योगदान देतात, यावर त्यांनी भर दिला. ही मूल्ये भारताची संस्कृती आणि स्थायी भाव आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

भारतीय तरुण हे कष्टाळूच नाहीत तर उत्तम व्यावसायिक देखील आहेत आणि म्हणूनच जगभरात त्यांना मोठी मागणी आहे असे मोदी यांनी जागतिक नेत्यांबरोबर केलेल्या चर्चेच्या आधारावर सांगितले. आखाती देशांमध्ये लाखो भारतीय वर्षानुवर्षे काम करत आहेत आणि भारतीय डॉक्टर आणि अभियंते अनेक देशांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रणाली आणि पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पूर्वी परदेशात गेलेल्या भारतातील शिक्षकांनी जगभरातील समाजात नवीन मूल्ये रुजवल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारतीय तरुणांनी जगासाठी दिलेल्या योगदानाबरोबरच, त्यांच्या देशातील कामगिरीची देखील जगभरात मोठी प्रशंसा होत आहे. या तरुणांमुळेच भारत जगभरातील  माहिती तंत्रज्ञानाचा कणा बनला आहे, आणि आता त्यांची ताकद स्टार्टअप्स, अंतराळ, डिजिटल तंत्रज्ञानासह प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

युरोपियन युनियनबरोबर नुकत्याच झालेल्या मुक्त व्यापार कराराची, 'सर्व करारांची जननी' म्हणून प्रशंसा होत आहे, आणि जगभरात ‘गेमचेंजर’ अर्थात बाजी पालटून टाकणारा असे त्याचे वर्णन केले जात आहे, असे मोदी यांनी नमूद केले. हा मुक्त व्यापार करार जगाच्या जीडीपीच्या एक चतुर्थांश आणि जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो, आणि भारतीय तरुणांसाठी तो  खऱ्या अर्थाने "आकांक्षांचे स्वातंत्र्य" आहे, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, 27  देशांबरोबरच्या या करारामुळे भारतीय स्टार्टअप्सना अर्थसहाय्य  आणि नवोन्मेशी परिसंस्थांमध्ये सुलभ प्रवेश मिळेल, तसेच चित्रपट, गेमिंग, फॅशन, डिजिटल सामग्री, संगीत आणि डिझाइन यांसारख्या क्षेत्रांतील भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या करारामुळे भारतीय तरुणांसाठी संशोधन, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक सेवांमध्ये नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

या कराराच्या व्यापक फायद्यांमुळेच त्याला 'सर्व करारांची जननी' म्हटले आहे, असे निदर्शनास आणून, मोदी म्हणाले की, यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती मिळेल, आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पाला बळ मिळेल. ते म्हणाले की, या करारानुसार भारताच्या 99 टक्क्यांहून अधिक निर्यातीवरील शुल्क एकतर शून्य असेल किंवा खूप कमी असेल, ज्याचा फायदा कापड, चामडे, रत्ने आणि दागिने, पादत्राणे, अभियांत्रिकी वस्तू आणि एमएसएमई सारख्या उद्योगांना होईल. विणकर, कारागीर आणि लहान उद्योजकांना 27 युरोपियन देशांच्या विशाल बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळेल यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, या करारामुळे भारतात अधिक गुंतवणूक येईल, त्यामुळे नवीन अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, औषध निर्मिती आणि इतर उत्पादन प्रकल्प निर्माण होतील, तसेच कृषी, अन्न प्रक्रिया आणि मत्स्यपालनासाठी खात्रीशीर बाजारपेठ निर्माण होईल.  शेतकरी, मच्छीमार आणि ग्रामीण तरुणांसाठी ही मोठी संधी असेल. हा मुक्त व्यापार करार भारतातील तरुणांना थेट युरोपच्या रोजगार बाजारपेठेशी जोडतो, विशेषत: अभियांत्रिकी, हरित तंत्रज्ञान, डिझाइन, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रात संधी निर्माण करतो, याचा अर्थ 27 देशांमध्ये भारतीय तरुणांसाठी नवीन मार्ग खुले होत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.

सरकार सर्वसमावेशक सुधारणांच्या माध्यमातून जागतिक संधींचा विस्तार करत आहे आणि आज देश ज्या सुधारणांच्या जोरावर वाटचाल करत आहे त्या तरुणांसमोरील प्रत्येक अडथळा दूर करत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. देशासमोरील वाढत्या संधी, एनसीसी कॅडेट्समध्ये रुजवलेली शिस्त आणि मूल्ये, हा त्यांच्यासाठी एक अतिरिक्त लाभ असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरवरील प्रभावी चित्ररथाची नोंद घेत, मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या त्या महत्वाच्या क्षणी एनसीसी छात्रसैनिकांनी केलेल्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली. सशस्त्र दलांना पाठिंबा देणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि प्रथमोपचार सेवा पुरवणे, यामधील त्यांच्या योगदानाची त्यांनी दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की, एनसीसी प्रशिक्षण केवळ परेड मैदानापुरते मर्यादित नाही, तर ते 'राष्ट्र प्रथम' ही भावना देखील रुजवते, आणि कॅडेट्सना कठीण काळात देशासाठी पूर्ण ताकदीने काम करण्यासाठी प्रेरित करते. एनसीसीमध्ये असताना स्वतःची "राष्ट्र प्रथम" ही भावना दृढ झाली होती, याची आठवण त्यांनी सांगितली, आणि आज कॅडेट्समध्येही तीच मूल्ये रुजवली जात असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची शक्ती आणि सशस्त्र दलांचे शौर्य पुन्हा एकदा सिद्ध झाले असून यामुळे स्वदेशी शस्त्रास्त्रांची प्रगती देखील दिसून आली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. आता लढाया केवळ टँक आणि बंदुकांच्या जोरावर नाही, तर कोड आणि क्लाउडमध्ये देखील लढल्या जात असल्याने आधुनिक युद्धतंत्रात युवा वर्गाच्या कौशल्याची भूमिका लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञानात मागे असलेले देश केवळ अर्थव्यवस्थेतच नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील कमकुवत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. युवा वर्गाच्या नवोन्मेषामुळे देशभक्ती अधिक मजबूत होते आणि राष्ट्रीय सुरक्षेत मोलाचे योगदान मिळते, असे त्यांनी सांगितले. सशस्त्र दलांमध्ये तंत्रज्ञानाची जाण असलेल्या आणि नवोन्मेषी युवांसाठी संधीची नवी दारे खुली होत आहेत, संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्स उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, मेड इन इंडिया ड्रोन्स विकसित केले जात आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषामुळे सैन्य दलांचे आधुनिकीकरण होत आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. युवा वर्गाने या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

देशाने नुकताच 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला असून या निमित्ताने आपण नागरिकांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय मतदार दिन हा राज्यघटनेने बहाल केलेली जबाबदारी आणि अधिकारांचा गौरवपूर्ण उत्सव असून जगात सर्वाधिक युवा मतदार भारतात आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. जेव्हा युवा नागरिक 18 वर्षांचे होतात आणि मतदानासाठी पात्र ठरतात, तेव्हा त्यांना देशाचे भविष्य घडवण्याची शक्ती प्राप्त होते, असे त्यांनी नमूद केले. दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएस आणि माय यंग इंडिया संस्थेने प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचा गौरव करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याची नवी परंपरा देशात सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रयत्नांमुळे युवा वर्गातील जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल आणि लोकशाहीला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकसित भारताची संकल्पना केवळ आर्थिक समृद्धीपुरती मर्यादित नाही, तर ती नागरिकांच्या आचरणावरही अवलंबून आहे, त्यादृष्टीनेच नागरिकांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या निमित्ताने त्यांनी उपस्थितांसमोर स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण मांडले. हे अभियान सरकारने सुरू केले असले, तरी ते नागरिक, युवा वर्ग आणि लहान मुलांनी पुढे नेले आहे ही बाब त्यांनी नमूद केली. स्वच्छता ही एक सवय, जीवनशैली आणि मूल्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरी कर्तव्याची भावना दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे आणि ज्याप्रमाणे लोकांना स्वतःचे अंगण सुंदर राहावे असे वाटते, त्याच भावनेने त्यांनी आपली शहरे देखील सुंदर बनवली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित प्रत्येक युवा प्रतिनिधीने समर्पणवृत्तीने आठवड्यातून किमान 1 तास स्वच्छतेशी संबंधित मोहिमेसाठी द्यावा आणि निवडलेल्या ठिकाणी काही उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेने सुमारे 8 लाख झाडे लावली असल्याबद्दल आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही झाडे व्यवस्थित वाढतील याची सुनिश्चिती करणे हे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

आपण येत्या काळात किती तंदुरुस्त असू ही युवा शक्तीची सर्वात मोठी परीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तंदुरुस्ती केवळ काही मिनिटांच्या व्यायामापुरती मर्यादित नसावी, तर ती आपल्या स्वभावाचा भाग बनली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. यासाठी आहारापासून रोजच्या दिनचर्येपर्यंत शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज असते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स फिट इंडिया मोहीम पुढे न्यायला हातभार लावत आहेत आणि क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत, याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

युवा वर्गातील लठ्ठपणाच्या समस्येबद्दलही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भारतातील 3 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त असू शकते, यामुळे मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजारांचा धोका वाढतो आणि युवा वर्गावरच याचा सर्वाधिक परिणाम होईल असे निरीक्षण अनेक अभ्यासांमध्ये मांडले असल्याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली. याबाबतीत आपण सजग असले पाहिजे, खाण्यात तेलाचा वापर कमी केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अन्नातील तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा केले.

राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये केवळ संचलनच शिकवले जात नाही, तर नागरिक म्हणून जबाबदारीची भावना देखील रुजवली जाते, ज्यामुळे कॅडेट्सची उत्तम नागरिक म्हणून जडणघडण होण्यात मदत होते ही बाब त्यांनी नमूद केली. या कॅडेट्सना प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान मिळालेले अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अधिकची भर टाकतील, असे त्यांनी सांगितले. हे विद्यार्थी जीवनातील प्रत्येक परीक्षेत यशस्वी होतील आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मनसुख मांडविया, संजय सेठ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

राष्ट्र प्रथम - कर्तव्य निष्ठ युवा ही या वर्षाच्या वार्षिक राष्ट्रीय छात्र सेना प्रधानमंत्री रॅलीची संकल्पना आहे. या संकल्पनेतून भारताच्या युवा वर्गामधील कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रीय वचनबद्धतेच्या भावनेची प्रचिती येते.

गेले महिनाभर राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रजासत्ताक दिन शिबिर 2026 सुरू असून राष्ट्रीय छात्र सेना प्रधानमंत्री रॅलीच्या माध्यमातून या शिबिराची सांगता झाली. या उपक्रमात देशभरातून 898 मुलींसह एकूण 2,406 राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये 21 देशांमधील 207 युवा प्रतिनिधी आणि अधिकारी देखील सहभागी झाले.

या निमित्ताने राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स, राष्ट्रीय रंगशाळा आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदस्यांचा उत्साहपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमातून राष्ट्र उभारणी, समाजसेवा आणि व्यक्तिमत्व विकासामधील या सर्वांच्या भूमिकेचे दर्शन घडवले जाईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219828) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil