रेल्वे मंत्रालय
एक स्थानक एक उत्पादन : भारतीय रेल्वेमार्फत प्रादेशिक परिचयोत्सव
एक स्थानक एक उत्पादन योजनेची 2000 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर व्याप्ती, 1.32 लाख कुशल कारागीर आणि भारतीय पारंपरिक कलेचे पुनरुज्जीवन, थेट बाजारप्रवेशातून लाखो प्रवाशांपर्यंत
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2026 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2026
भारतीय रेल्वेची एक स्थानक एक उत्पादन (ओएसओपी) योजना स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देणारे प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे. ही योजना देशभरातील तळागाळातील उद्योजकतेला चालना देत आहे. भारतीय रेल्वे स्थानकांना देशाच्या समृद्ध प्रादेशिक वैविध्याचे दर्शन घडविणाऱ्या केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
स्थानिक वारसा राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडून एक स्थानक एक उत्पादन योजना प्रवाशांचा अनुभव समृद्ध करताना समावेशक आर्थिक विकासाला पाठबळ देते.
19 जानेवारी 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत 2,002 रेल्वे स्थानकांवर एकूण 2,326 विक्री केंद्रे कार्यरत झाली आहेत. या केंद्रांमार्फत दररोज लाखो प्रवाशांपर्यंत थेट पोहोचता येत असल्यामुळे ही केंद्रे हजारो स्थानिक कुशल कारागीर, विणकर आणि लघुउत्पादकांसाठी उपजीविकेचे साधन ठरली आहेत. तसेच, 2022 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून या उपक्रमामुळे देशभरात 1.32 लाखांहून अधिक लाभार्थ्यांसाठी थेट आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत.
आकडेवारीपलीकडे पाहता, एक स्थानक एक उत्पादन योजनेमुळे एकेकाळी मागे पडत चाललेल्या पारंपरिक कला आणि प्रादेशिक वैशिष्ट्यांचे पुनरुज्जीवन होत आहे. ईशान्य भारतातील हस्तनिर्मित मातीची भांडी व बांबू कामापासून ते इतर प्रदेशांतील मसाले, हातमागावरील कापड आणि स्थानिक मिठाया ही सर्व उत्पादने प्रवाशांसमोर त्या त्या भागाची खासियत मांडतात.
व्यापार आणि संस्कृती यांची सांगड घालून, भारतीय रेल्वेने स्थानकांना स्थानिक उद्यमांचे केंद्र बनविले आहे. समुदायांना सशक्त करताना देशभरातील प्रवाशांचा प्रवास अनुभवात भर घालणारी एक स्थानक एक उत्पादन योजना “व्होकल फॉर लोकल”चे चांगले उदाहरण ठरते.

Tenkasi Jn. Railway Station, Tamil Nadu
* * *
सुषमा काणे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216516)
आगंतुक पटल : 16