पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल देशांतील लोकसभांचे सभापती तसेच अध्यक्ष यांच्या 28 व्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 15 JAN 2026 1:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026

 

लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशजी, आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्ष तुलिया अॅकसन, राष्ट्रकुल संसदीय संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर कलीला, राष्ट्रकुल सदस्य देशांचे सभापती आणि अध्यक्ष, इतर प्रतिनिधी आणि सभ्य स्त्रीपुरुषहो!

मित्रांनो,

संसदीय लोकशाहीमध्ये, तुम्हा सर्वांची भूमिका सभापतींची आहे. विशेष म्हणजे, या सभापतींना जास्त बोलायला मिळत नाही. सदनात इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल याची सुनिश्चिती करून घेणे हीच त्यांची जबाबदारी असते. सभापतींच्या संदर्भातील एक सामायिक बाब म्हणजे त्यांचा संयम. सदनातील कोलाहल करणाऱ्या तसेच अतिउत्साही सदस्यांना देखील ते हसतमुखाने हाताळतात.

मित्रांनो,

या विशेष प्रसंगी, मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो. तुम्ही सर्वजण आज आमच्यासोबत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो.

मित्रांनो,

तुम्ही आत्ता जेथे विराजमान झाला आहात ती जागा भारताच्या लोकशाही वाटचालीत अत्यंत महत्त्वाची आहे. वसाहतवादी राजवटीच्या शेवटच्या काही वर्षांत, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणे निश्चित झाले होते, तेव्हा याच सेंट्रल हॉलमध्ये भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेची बैठक झाली होती. स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांपर्यंत या इमारतीने भारताच्या संसद भवनाच्या रुपात काम केले, आणि याच सभागृहात भारताच्या भविष्याला आकार देणाऱ्या असंख्य चर्चा आणि निर्णय झाले. लोकशाहीला समर्पित असलेल्या या स्थळाला आता संविधान भवन असे नाव देण्यात आले आहे. अलीकडच्याच काळात भारताने देशाच्या संविधानाच्या अंमलबजावणीची 75 वर्षे साजरी केली. या संविधान भवनातील तुमची उपस्थिती भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत खास आहे.

मित्रांनो,

राष्ट्रकुल देशांचे सभापती आणि अध्यक्षांची परिषद भारतात चौथ्यांदा आयोजित होत आहे. सदर परिषद “संसदीय लोकशाहीचे परिणामकारक वितरण” या संकल्पनेवर आधारित आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अशा वैविध्यपूर्ण वातावरणात लोकशाही तग धरू शकेल की नाही अशा शंका व्यक्त होत होत्या हे तुम्हाला ठाऊकच असेल. मात्र भारताने या वैविध्याचे रुपांतर देशाच्या सामर्थ्यामध्ये केले. त्यावेळी व्यक्त होणारी आणखी एक शंका म्हणजे भारतात लोकशाही कशीबशी जिवंत राहिली तरी देश कधीच विकास करू शकणार नाही. मात्र, लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रक्रिया स्थैर्य, गती आणि प्रमाण मिळवून देतात हे भारताने सिध्द करून दाखवले आहे.

भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आज, भारतातील युपीआय ही जगभरातील सर्वात मोठी डिजिटल भरणा प्रणाली आहे. तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भारत आता पोलाद उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे व्यवस्थेचे जाळे आज भारतात आहे. देशात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल्वेचे जाळे आहे. भारत जगभरात सर्वाधिक प्रमाणात दूध उत्पादन करणारा देश आहे. भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणातील तांदूळ उत्पादक देश आहे.

मित्रांनो,

भारतात लोकशाही म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत सेवांचे वितरण. सार्वजनिक कल्याणाच्या भावनेसह कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही काम करतो. आणि समाज कल्याणाच्या याच भावनेमुळे, अलीकडच्या काही वर्षांत, भारतातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. भारतातील लोकशाही सेवावितरणात मदत करते.   

मित्रांनो,

भारतात लोकशाही सेवावितरणात मदत करते, कारण आपल्यासाठी, देशाची जनता सर्वोच्च स्थानी आहे. आपल्या नागरिकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना आपण प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मार्गात कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी आपण प्रक्रिया ते तंत्रज्ञान अशा प्रत्येक गोष्टीचे लोकशाहीकरण केले आहे. ही लोकशाही भावना आपल्या धमन्यांमध्ये, आपल्या मनांमध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये वाहते आहे.

मी तुम्हाला एक उदाहरण देतो: काही वर्षांपूर्वी, जेव्हा संपूर्ण जग कोविड-19 च्या महामारीशी झगडत होते, तेव्हा भारताला देखील प्रचंड आव्हानांना तोंड द्यावे लागले. तरीही, या सर्व अडचणींमध्ये, भारताने जगातील 150 पेक्षा जास्त देशांना औषधांचा आणि लसीचा पुरवठा केला. लोकांचे कल्याण, त्यांचे हित आणि त्यांचा लाभ हीच आमची परंपरा आहे.

मित्रांनो,

तुमच्यापैकी अनेक जण भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ओळखतात. खरोखरीच, आपल्या लोकशाहीचा आवाका असामान्य आहे. वर्ष 2024 मध्ये भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घ्या. या निवडणुका, मानवी इतिहासातील सर्वात मोठा लोकशाहीवादी उपक्रम ठरल्या. सुमारे नऊशे ऐंशी दशलक्ष नागरिकांनी या मतदानासाठी नोंदणी केली. ही आकडेवारी जगातील अनेक खंडांच्या लोकसंख्येपेक्षा देखील कितीतरी अधिक आहे. या निवडणुकीत ऐंशी हजाराहून जास्त उमेदवार आणि सातशेपेक्षा जास्त राजकीय पक्ष रिंगणात होते. या निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग विक्रमी ठरला.

आज, भारतीय महिला या प्रक्रियेत केवळ सहभागी होऊन थांबत नाहीत तर त्या अनेक ठिकाणी नेतृत्व देखील करत आहेत. आपल्या देशाच्या प्रथम नागरिक, आपल्या राष्ट्रपती देखील एक महिला आहेत. आपण सध्या ज्या शहरात आहोत त्या दिल्ली शहराच्या मुख्यमंत्री देखील एक महिला आहेत. भारतातील ग्रामीण तसेच स्थानिक सरकारी संस्थामध्ये सुमारे 1.5 दशलक्ष महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. त्या मुलभूत पातळीवरील नेत्यांपैकी निम्म्या भागाचे प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक पातळीवर हे प्रमाण असामान्य आहे. भारतीय लोकशाही विविधतेने देखील समृध्द आहे. भारतात शेकडो भाषा बोलल्या जातात. विविध भाषांतील नऊशेहून अधिक दूरचित्रवाणी वाहिन्या देशात कार्यरत आहेत. येथे हजारो वर्तमानपत्रे आणि नियतकालिके प्रसिध्द होतात. फार कमी समाज इतक्या मोठ्या प्रमाणातील विविधतेचे व्यवस्थापन करू शकतात. भारतात अशा विविधता साजऱ्या होतात कारण, आपल्या लोकशाहीचा पाया मजबूत आहे. आपली लोकशाही एखाद्या खोलवर मुळे असलेल्या मोठ्या वृक्षाप्रमाणे आहे. आपल्याकडे वादविवाद, संवाद आणि सामूहिक निर्णय घेण्याची दीर्घ परंपरा आहे. भारताला लोकशाहीची माता म्हटले जाते. आपले पवित्र ग्रंथ, वेद पाच हजार वर्षांहून अधिक प्राचीन आहेत. समस्यांवर चर्चा करण्यासाठी लोक एकत्र येत असल्याचे संदर्भ त्यामध्ये येतात. त्या काळी चर्चा आणि संमतीनंतर निर्णय घेतले जात असत. आपण भगवान बुद्धांची भूमी आहोत. बौद्ध संघांमध्ये खुल्या आणि संरचित चर्चा होत असत. सर्वसंमती अथवा मतदानाच्या माध्यमातून निर्णय घेतले जात.

तसेच, भारतातील तामिळनाडू राज्यात 10 व्या शतकातील एक शीलालेख आहे. त्यामध्ये लोकशाही मूल्यांसह काम करणाऱ्या ग्रामसभेचे वर्णन आहे. त्याकाळी जबाबदारी आणि निर्णय घेण्यासाठी स्पष्ट नियम बनवलेले होते. आपली लोकशाही मूल्ये काळाच्या कसोटीवर पारखलेली असून त्यांना विविधतेचे पाठबळ मिळाले आहे आणि ही मूल्ये पिढ्यानपिढ्या अधिकाधिक बळकट होत गेली आहेत.

मित्रांनो,

राष्ट्रकुलातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 50% लोकसंख्या भारतात निवास करते. सर्व सदस्य देशांच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न असतो. राष्ट्रकुलाच्या आरोग्य, हवामान बदल, आर्थिक विकास आणि नवोन्मेष यांच्या संदर्भातील शाश्वत विकास ध्येयांमध्ये आम्ही संपूर्ण जबाबदारीने आमच्या वचनबद्धतांची पूर्तता करत आहोत. भारत तुम्हा सर्वांकडून शिकण्याचा सतत प्रयत्न करत आहे आणि राष्ट्रकुलातील इतर भागीदारांना भारताच्या अनुभवांचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत.

मित्रांनो,

जग आज, अभूतपूर्व बदलाच्या संक्रमणातून जात असताना, जगाच्या दक्षिणेकडील देशांसाठी नवे मार्ग निर्माण करण्याचा देखील हा काळ आहे. जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या समस्या भारत प्रत्येक जागतिक व्यासपीठावर सशक्तपणे मांडत आहे. भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, भारताने या देशांच्या समस्या जागतिक कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. आपण जे नाविन्यपूर्ण शोध लावू, त्यांचा या संपूर्ण भागाला लाभ मिळावा यासाठी भारत सतत प्रयत्न करत आहे. जगाच्या दक्षिणेकडील आपल्या भागीदार देशांना भारतासारख्याच प्रणाली विकसित करता याव्या यासाठी आम्ही खुली तांत्रिक व्यासपीठे देखील उभारत आहोत.

मित्रांनो,

संसदीय लोकशाहीचे ज्ञान आणि समज विविध मार्गांनी आपण कशा प्रकारे प्रसारित करू शक्ती याचा शोध घेणे हे या परिषदेच्या महत्त्वाच्या ध्येयांपैकी एक ध्येय आहे. यामध्ये सभापती आणि अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे कार्य जनतेला देशाच्या लोकशाही प्रक्रियांशी अधिक दृढपणे जोडते. भारतीय संसद याआधीच अशा प्रयत्नांमध्ये सहभागी झाली आहे. अभ्यास दौरे, सानुकुलीत प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अंतर्वासिता यांच्या माध्यमातून नागरिकांना संसदेविषयी अधिक खोलवर माहिती जाणून घेण्याची संधी देण्यात आली आहे. आमच्या संसदेत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वास्तव वेळेत सभागृहात चालणाऱ्या चर्चा आणि सभागृहाचे कामकाज प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित करण्याची सुरुवात केली आहे. संसदेशी संबंधित स्त्रोतांना देखील कृत्रिम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक वापरकर्ता-स्नेही बनवण्यात येत आहे. यामुळे आपल्या युवा पिढीला संसदेविषयी अधिक जाणून घेण्याच्या अधिक उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.

मित्रांनो,

आतापर्यंत मला तुमच्या संस्थेशी संबंधित 20 हून अधिक सदस्य देशांना भेटी देण्याची संधी मिळाली आहे. विविध संसदांना संबोधित करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. जेथे जेथे मी गेलो तेथे मला खूप शिकायला मिळाले आहे. मला समजलेल्या सर्वोत्तम पद्धती मी तातडीने आमच्या लोकसभेचे सभापती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याशी सामायिक केल्या आहेत. नवे शिकण्याच्या आणि सामायिक करण्याच्या या प्रक्रियेला ही परिषद आणखी समृध्द करेल असा माझा विश्वास आहे. याच आशेसह मी तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2216488) अभ्यागत कक्ष : 39