नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या कार्यालयाकडून बनावट पत्राबाबत स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की त्यांच्या अधिकृत पत्रलेखन कागदाची बनावट प्रत आणि त्यांची खोटी स्वाक्षरी असलेले एक पत्र वाईट हेतूने प्रसारित केले जात आहे. कार्यालयाने नमूद केले आहे की हे पत्र आणि त्यातील मजकूर पूर्णपणे बनावट आणि खोटा आहे.
हा प्रकार बनावट कागदपत्रे तयार करणे, तोतयागिरी आणि अधिकृत सरकारी ओळखीचा गैरवापर करणे यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांच्या श्रेणीत मोडतो. यामागील उद्देश चुकीची माहिती पसरविणे आणि एका घटनात्मक प्राधिकरणाची बदनामी करणे असा आहे. या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित कायदे अंमलबजावणी यंत्रणेने या प्रकरणाचा प्राधान्याने तपास करून यामागे असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती केल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.
अशा फसव्या साहित्यावर विश्वास ठेवू नये किंवा ते प्रसारित करू नये, तसेच केवळ अधिकृत स्रोतांद्वारेच माहिती पडताळून पाहावी, असा सल्ला नागरिक आणि प्रसार माध्यमांना मंत्र्यांच्या कार्यालयाने दिला आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216471)
आगंतुक पटल : 7