संरक्षण मंत्रालय
आयएनएस सुदर्शिनी निघणार 'लोकायन 26' या आंतरमहासागरीय नौकानयन मोहिमेवर
13 देशांमधील 18 बंदरांना भेट देणारी 10 महिन्यांची मोहीम
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
भारतीय नौदलाचे प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शिनी 20 जानेवारी 2026 रोजी 'लोकायन 26' या 10 महिन्यांच्या आंतरमहासागरीय मोहिमेसाठी प्रस्थान करणार आहे. भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि 'वसुधैव कुटुंबकम'ची संकल्पना महासागरांमध्ये प्रतिबिंबित करत हे जहाज 13 देशांमधील 18 परदेशी बंदरांना भेट देत 22,000 सागरी मैलांपेक्षा जास्त प्रवास करेल.
या मोहिमेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आयएनएस सुदर्शिनीचा फ्रान्समधील 'एस्केल आ सेट' आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील 'सेल 250' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय भव्य जहाज कार्यक्रमांमधील सहभाग असेल. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये आयएनएस सुदर्शिनी भारताचा गौरवशाली सागरी वारसा आणि सागरी परंपरा यांचे प्रतिनिधित्व करेल.
या सागरी प्रवासादरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे 200 हून अधिक प्रशिक्षणार्थी सखोल नौकानयन प्रशिक्षण घेतील आणि लांब पल्ल्याचे सागरी नौकानयन तसेच समुद्रातील पारंपरिक खलाशी कौशल्याचा मौल्यवान अनुभव मिळवतील. या मोहिमेमुळे प्रशिक्षणार्थींना एका भव्य जहाजावरील जीवनातील बारकावे अनुभवता येतील आणि इतर नौदलांच्या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे व्यावसायिक आदानप्रदान होईल आणि मैत्रीचे चिरस्थायी बंध निर्माण होतील.
आयएनएस सुदर्शिनी प्रशिक्षणविषयक संवाद आणि भेटी देणाऱ्या देशांच्या नौदलांसोबत सागरी भागीदारी उपक्रमांमध्येही सहभागी होईल, ज्यामुळे सागरी सहकार्य अधिक दृढ होईल आणि 'महासागर' या संकल्पनेला चालना मिळेल. ही सागरी यात्रा सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचे एक शक्तिशाली प्रतीक ठरण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे विविध राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे सेतू बांधण्याच्या भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेची पुष्टी होते.
भारतीय नौदलाचे दुसरे नौकानयन प्रशिक्षण जहाज असलेल्या आयएनएस सुदर्शिनीने आजपर्यंत 1,40,000 सागरी मैलांपेक्षा जास्त अंतर कापले आहे. 'लोकायन 26' मोहिमेद्वारे ते जागतिक स्तरावर भारताचे सागरी सामर्थ्य, व्यावसायिकता आणि सदिच्छा यांचे प्रतीक म्हणून आपली सेवा देण्यास सज्ज आहे.
UILP.jpeg)
NV3C.jpeg)
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216252)
आगंतुक पटल : 16