पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या अध्‍यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची 88 वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2026 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (एससी-एबीडब्ल्यूएल) स्थायी समितीची 88 वी बैठक आज नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत, स्थायी समितीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972  च्या तरतुदींनुसार, संरक्षित क्षेत्रे, वन्यजीव अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि पर्यावरणाच्या दृष्‍टीने संवेदनशील असलेल्या  क्षेत्रांमध्ये आणि त्यांच्या जवळच्‍या भागामध्‍ये उपलब्ध असलेल्या  सार्वजनिक उपयुक्तता सेवा, संरक्षणविषयक गरजा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित 70 प्रस्तावांवर विचारविनिमय  केला. पर्यावरणीय संवेदनशीलता, वैधानिक आवश्यकता आणि स्थानिक समुदायांसाठी आवश्यक सेवा सुनिश्चित करण्याच्या गरजेचा योग्य विचार करून या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.

समितीने विचार केलेल्या महत्त्वाच्या सार्वजनिक उपयुक्तता प्रस्तावांमध्ये जल जीवन मिशन (जेजेएम) अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, रस्त्यांचे रुंदीकरण, 4 जी मोबाईल टॉवर्स आणि पारेषण वाहिन्या यांचा समावेश आहे.

स्थायी समितीने संरक्षण क्षेत्राशी संबंधित 17 प्रस्तावांवरही विचार केला, हे प्रस्ताव प्रामुख्याने लडाख केंद्रशासित प्रदेश आणि सिक्कीम राज्य, सीमावर्ती आणि उंच पर्वतीय भागांतील सामरिक पायाभूत सुविधांशी संबंधित आहेत. राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावांची शिफारस करण्यात आली, तसेच समितीच्या निर्देशांनुसार आणि लागू असलेल्या वैधानिक तरतुदींनुसार वन्यजीव संरक्षण उपाययोजना आणि पर्यावरणीय सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यात आले.

समितीने मागील बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर आणि दिलेल्या निर्देशांवर, विशेषतः धोरणात्मक उपाययोजना आणि प्रक्रिया सुलभ करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. यामध्‍ये  'परिवेश' पोर्टलमधील सुधारणेचा  समावेश आहे. यावेळी कृती अहवालाचा (एटीआर) आढावा घेतला. वन्यजीव संवर्धनाशी संबंधित धोरणे आणि कार्यक्रम तसेच ‘एससी- एनबीडब्ल्यूएल’ च्या निर्देशांचे पालन यावर प्रभावी देखरेखीसाठी भविष्यातील बैठकांमध्ये अधिक चर्चा केली जाईल, असा निर्णय समितीने घेतला.

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2216114) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil