अर्थ मंत्रालय
मुंबईतील रणनीती बैठकीत डीएफएसच्या सचिवांनी एलआयसीसाठी धोरणात्मक दृष्टिकोन मांडला
हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स आणि पर्यायी गुंतवणूक निधी यांसारख्या राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्यक्रमांशी संस्थात्मक भांडवलाची सांगड घालण्याच्या दृष्टीने या बैठकीत एलआयसीला एक प्रमुख भागीदार मानले गेले.
'सर्वांसाठी विमा' हे राष्ट्रीय उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी डिजिटल आणि मोबाइल-फर्स्ट दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन डीएफएसच्या सचिवांनी केले.
एलआयसीची एकत्रित व्यवस्थापित मालमत्ता (एयूएम) 57.23 लाख कोटी रुपये आहे, आणि पॉलिसीधारकांच्या निधीवर 8.9% परतावा मिळत आहे.
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 7:49PM by PIB Mumbai
डीएफएसच्या सचिवांनी आज मुंबईत आयोजित एलआयसीच्या रणनीती बैठकीत मुख्य भाषण केले. या कार्यक्रमात विपणन व्यवसाय धोरण, तंत्रज्ञान परिवर्तन, कर्मचाऱ्यांसाठी मनुष्यबळ धोरण आणि धोरणात्मक मालमत्ता वाटपाच्या समीक्षेवरील सखोल चर्चासत्रांसह उच्च-स्तरीय सत्रांचा समावेश होता.

सचिवांनी सांगितले की, एलआयसी ही केवळ एक विमा कंपनी नाही, तर देशांतर्गत प्रणालीगतदृष्ट्या महत्त्वाची विमा कंपनी (D-SII) आहे आणि आय आर डी एआयद्वारे मिळालेल्या या पदामुळे तिच्यावर मोठी जबाबदारी येते, कारण एलआयसीची स्थिरता ही भारताच्या आर्थिक स्थिरतेशी समानार्थी आहे. एलआयसीने एक ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणले आहे आणि तिचे एका पारंपरिक भौतिक संस्थेतून रूपांतर होऊन मूल्य-आधारित, डिजिटल-प्रथम वित्तीय शक्तीकेंद्र म्हणून ती उदयास आली आहे.
सचिवांनी एलआयसीच्या उत्पादन श्रेणीतील बदलांवरही प्रकाश टाकला, ज्यात उच्च-वाढीच्या बिगर -सहभागी उत्पादनांमध्ये धोरणात्मक बदल करण्यात आला आहे. लवचिक नाविन्यपूर्णतेच्या आधारे एलआयसी युलिप आणि हप्ता परतावा (रिटर्न ऑफ प्रीमियम) योजनांसोबतच युवा टर्म, डिजी टर्म आणि इंडेक्स प्लस सारख्या उत्पादनांद्वारे तरुण ग्राहकांना आकर्षित करत आहे.
वितरण शक्तीवर भर देताना सचिवांनी नमूद केले की एलआयसीची अभिकर्त्यांची प्रचंड फौज हीच तिची सर्वात मोठी मालमत्ता आहे. जीवन समर्थ उपक्रमांतर्गत, अभिक्रिया फौजेची संख्या 14.8 लाखांपेक्षा जास्त झाली आहे, ज्यामध्ये 18 ते 40 वयोगटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
'बीमा सखी' – म्हणजेच महिला करिअर अभिकर्ता उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 2.9 लाखांहून अधिक बीमा सखींनी 14 लाखांहून अधिक पॉलिसी मिळवून दिल्या असून, 50 टक्क्यांहून अधिक पंचायतींमध्ये त्या पोहोचल्या आहेत. या उपक्रमामुळे अधिक महिला विमा क्षेत्रात आल्या आहेत आणि पुढील वर्षापर्यंत सर्व पंचायतींमध्ये बीमा सखी पोहोचतील, अशी आशा सचिवांनी व्यक्त केली.
डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत, प्रोजेक्ट डाइव्ह ला एल आय सी चा प्रमुख उपक्रम म्हणून अधोरेखित करण्यात आले, ज्यामध्ये MarTech प्लॅटफॉर्म, सेल्स आणि कस्टमर सुपर ॲप्स, एक एकीकृत डेटा लेक आणि 2026 च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असलेले एंड-टू-एंड डिजिटल जीवनचक्र एकीकरण यांचा समावेश आहे.
सचिवांनी एलआयसीच्या 57.23 लाख कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवस्थापनाधीन मालमत्तेवर (एयूएम) आणि पॉलिसीधारकांच्या निधीवरील 8.9% परताव्यावर समाधान व्यक्त केले, ज्याला 2.13 इतक्या मजबूत सॉल्व्हन्सी गुणोत्तराचा आधार आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्स आणि पर्यायी गुंतवणूक निधींच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो. एकत्रित प्रयत्नांतून आणि सतत पाठपुराव्याद्वारे, विशेषतः कमी रकमेच्या पॉलिसीधारकांमध्ये, पॉलिसी टिकवून ठेवण्याचे प्रमाण सुधारण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
भाषणाचा समारोप करताना सचिवांनी सांगितले की, एलआयसी एक तंत्रज्ञान-सक्षम आणि भांडवल-कार्यक्षम अग्रणी कंपनी म्हणून उदयास आली आहे आणि भारतीय घरांमध्ये सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून तिने आपले कायम ठेवले आहे. 'सर्वांसाठी विमा' हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग आणि मोबाइल-फर्स्ट दृष्टिकोन सातत्याने अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले.
***
नेहा कुलकर्णी/ नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215715)
आगंतुक पटल : 13