भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्वयंचलित हवामान केंद्रांच्या मोठ्या विस्ताराची केली घोषणा; भारतीय हवामान विभाग 2026 मध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुणे येथे प्रत्येकी 50 स्वयंचलित हवामान केंद्रे करणार स्थापित


भारतीय हवामान विभागाने तंत्रज्ञान, अचूकता आणि लवचिकतेवर लक्ष केंद्रित करत आपला 151 वा स्थापना दिवस केला साजरा

हवामान अंदाजाची अचूकता 40-50 टक्क्यांहून अधिक सुधारली; चक्रीवादळाच्या मार्गाच्या अंदाजात मोठी प्रगती : डॉ. जितेंद्र सिंह

भारतीय हवामान विभागाची पोहोच वाढवण्यासाठी 'उत्कृष्टता केंद्रे' आणि नवीन प्रादेशिक हवामान केंद्रे केली जाणार स्थापन


प्रविष्टि तिथि: 15 JAN 2026 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारताच्या शहरी हवामान निरीक्षण पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण विस्ताराची घोषणा केली. या अंतर्गत चार प्रमुख महानगरांमध्ये 200 स्वयंचलित हवामान केंद्रे (एडब्ल्यूएस) उभारली जाणार आहेत.

वरिष्ठ अधिकारी, हवामानशास्त्र तज्ञ आणि भागधारकांना संबोधित करताना मंत्री म्हणाले की, 2026 या वर्षात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुणे येथे प्रत्येकी 50 स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित केली जातील. दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये, विशेषतः स्थानिक पातळीवरील, रिअल-टाइम हवामान अंदाज आणि आपत्ती पूर्वतयारी मजबूत करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे.

ही घोषणा भारतीय हवामान विभागाच्या 151व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात करण्यात आली. दिडशेहून अधिक काळ राष्ट्रसेवेचा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करताना, मंत्र्यांनी आठवण करून दिली की गेल्या वर्षी याच तारखेला आयएमडी’ने पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत मंडपम येथे आपला 150 वा वर्धापनदिन साजरा केला होता.

भारताच्या हवामान अंदाजाच्या क्षमतेत झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, मागील दशकांच्या तुलनेत हवामान अंदाजाची अचूकता 40 ते 50 टक्क्यांहून अधिक सुधारली आहे. चक्रीवादळाच्या मार्गाच्या अंदाजाची अचूकता जवळपास 35 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे, तर मासिक आणि हंगामी अंदाजातील त्रुटी सुमारे 7.5 टक्क्यांवरून जवळपास 2.5 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. या सुधारणांचे श्रेय त्यांनी गेल्या दशकातील सातत्यपूर्ण गुंतवणूक, तांत्रिक स्वातंत्र्य आणि संस्थात्मक पाठिंब्याला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन मौसम' सुरू करणे हे प्रगत हवामानशास्त्र आणि हवामान सेवांच्या दिशेने सरकारचा स्पष्ट इरादा आणि प्राधान्य दर्शवते, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. जेव्हा पंतप्रधान अशा महत्त्वाच्या राष्ट्रीय मंचांवरून अशा उपक्रमांची घोषणा करतात, तेव्हा त्यातून वैज्ञानिक क्षमता निर्माण आणि सार्वजनिक कल्याणाप्रती सरकारच्या दीर्घकालीन वचनबद्धतेबद्दल एक मजबूत संदेश मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

हवामानशास्त्रसंबंधित  सेवा देण्यामध्ये  भारत या प्रदेशात आघाडीवर असून  बांगलादेश, नेपाळ, भूतान व श्रीलंका या शेजारी देशांना  भारताकडून नैसर्गिक आपत्तीसंबंधित हवामान माहिती व उपग्रह सेवा पुरवल्या जातात असे मंत्रिमहोदयांनी सांगितले. भारताच्या या प्रयत्नांमुळे प्रादेशिक सहकार्य वाढते, तसेच दक्षिण आशियात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील एक विश्वसनीय भागीदार या नात्याने भारताची जबाबदारी अधोरेखित होते , असे ते म्हणाले.  

भारतीय हवामानशास्त्र विभागामधील सुधारणा विदित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, की गेल्या दशकात हवामानवेधी रडार्स ची संख्या तिप्पट झाली असून भारताच्या भौगोलिक प्रदेशाचा सुमारे 87 टक्के भाग त्यांच्या आवाक्यात येत आहे. तसेच डॉपलर रडार्स , सौर उत्सर्जन निरीक्षण यंत्रणा, एरोसोल देखरेख यंत्रणा, सूक्ष्म रेडिओमीटर्स तसेच पर्जन्यमान मापन यंत्रणांची व्याप्ती वाढली असून त्या आता जिल्हा व तालुका पातळीवर कार्यरत आहेत. स्थानिक हवामानाचा अचूक व त्वरित अंदाज वर्तवण्याची क्षमता विकसित केल्यामुळे नागरिकांना पुढील तीन तासांपर्यंतच्या हवामानाचा अंदाज मिळू शकत आहे.     

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सेवांसाठी वाढती मागणी पाहता त्यांची  विश्वासार्हता व जनतेचा त्यांच्या अंदाजावरील विश्वास वाढला असल्याचे दिसून येत आहे. 

या 151व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा, तसेच वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ आणि आयएमडी परिवाराचे अनेक  सदस्य उपस्थित होते. मंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या नेतृत्वाने सर्व विभागांमध्ये सर्वसमावेशक ओळख निर्माण केल्याबद्दल तसेच  उत्कृष्टतेची आणि समर्पणाची संस्कृती जोपासल्याबद्दल नेतृत्वाची प्रशंसा केली.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांनी IMD परिसरातील अनेक महत्वाच्या सुविधांचे उदघाटन केले. यामध्ये प्रारूप वेधशाळा, 3डी प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र, तसेच एका स्वयंचलित कृषीविषयक हवामान केंद्राचा समावेश होता. गुणवत्तापूर्ण खात्रीशीर माहिती देणाऱ्या व कार्यक्षम अशा स्वदेशी व कमी खर्चात तयार होणाऱ्या मॉड्युलर हवामानशास्त्रविषयक तंत्रज्ञानावर भारताचा वाढत असलेला भर यामधून प्रतिबिंबित होतो. 

IMD परिसरात स्थापित केलेल्या अनेक अद्ययावत हवामानशास्त्रविषयक उपकरणे व स्वयंचलित देखरेख यंत्रणांचे मंत्रिमहोदयांनी निरीक्षण केले, भारताच्या हवामान सुलभ उत्पादन क्षमतेला अधिक बळ देणाऱ्या या यंत्रणांच्या तंत्रज्ञानविषयक सिद्धतेची व दैनंदिन बाबतीत उपयोगी पडण्याच्या क्षमतेची डॉ जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा आवाका वाढवण्यासाठी सरकार अधिक संख्येने गुणवत्ता केंद्रे तसेच प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे , असे मंत्रिमहोदयांनी आपल्या भाषणाच्या समारोपात सांगितले. भारतीय हवामानशास्त्र विभाग 152व्या वर्षात प्रवेश करत असताना त्याची विश्वासार्हता , अचूकता व जनतेचा त्यावरील भरवसा वाढत राहील, तसेच  भारताच्या आपत्ती सज्जतेची व हवामानविषयक सेवांची गुणवत्ता वाढत राहील अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. 

 


शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर /उमा रायकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2215084) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil