नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएसव्ही कौंडिण्य मस्कतमध्ये दाखल, भारत-ओमान दरम्यानच्या पाच हजार वर्षांच्या सागरी संबंधांना मिळाली नवसंजीवनी


केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मस्कतमधील पोर्ट सुलतान काबूस येथे आयएनएसव्ही कौंडिण्यच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले

सर्बानंद सोनोवाल यांची ओमानच्या परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर सागरी सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2026 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

पोरबंदर इथून निघालेल्या भारतीय नौदलाच्या 'आयएनएसव्ही कौंडिण्य', या  जहाजाने  आपला पहिला सागरी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून, आज ते ओमानची राजधानी मस्कत येथे दाखल झाले. भारत आणि ओमान दरम्यानच्या सामायिक सागरी वारशाचा हा महत्वाचा पैलू आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पोर्ट सुलतान काबूस येथे जहाजाचे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.

पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या शिवणीच्या जहाजाचा हा प्रवास, दोन्ही देशांमधील 5,000 वर्षांहून अधिक जुन्या, खोलवर रुजलेल्या सागरी, सांस्कृतिक आणि नागरी संबंधांवर प्रकाश टाकतो. भारत आणि ओमान यांच्यात शतकानुशतके निरंतर संवाद घडवून आणणाऱ्या,  कनेक्टिव्ह कॉरिडॉर म्हणून भूमिका बजवणाऱ्या महासागरांचे महत्वही यामधून अधोरेखित होते. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या मोहिमेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ प्रवासाचा नव्हे, तर खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक बंधांचा उत्सव आहे. मस्कतमध्ये या शिडाच्या जहाजाचे आगमन म्हणजे काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि इतिहासात रुजलेल्या, व्यापाराने समृद्ध झालेल्या आणि परस्परांप्रति आदराने बळकट झालेल्या भारत-ओमान दरम्यानच्या चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक आहे. आयएनएसव्ही कौंडिण्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे उदाहरण आहे. भारताच्या प्राचीन जहाजबांधणी प्रतिभेला पुनरुज्जीवित करण्याचा आणि जगासमोर अभिमानाने सादर करण्याचा त्यांचा संकल्प होता, असे ते म्हणाले.

महान भारतीय नाविक कौंडिण्य, यांच्या नावाचे हे जहाज भारताचे स्वदेशी सागरी ज्ञान, कारागिरी आणि शाश्वत जहाजबांधणी पद्धतींचे प्रदर्शन करते. अजिंठा लेणी मधील चित्रांमध्ये दाखवलेल्या पाचव्या शतकातील एका जहाजापासून प्रेरित होऊन, आयएनएसव्ही कौंडिण्य हे जहाज प्राचीन भारतीय जहाजबांधणी तंत्रांचा वापर करून बांधण्यात आले आहे, यात आधुनिक खिळे अथवा  धातूच्या बांधणी ऐवजी,फळ्यांसाठी शिवणाचा वापर करण्यात आला आहे.

आपल्या या दौऱ्यात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ओमानचे परिवहन, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री सईद बिन हमूद बिन सैद अल मवली यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. त्यांनी दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या बंदर आणि सागरी क्षेत्रात ओमानी कंपन्यांना सहभागी होण्यासाठी मोठी संधी असल्याचे सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी अधोरेखित केले. ते म्हणाले की, भारताचे महत्वाकांक्षी बंदर-आधारित पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) चौकटीअंतर्गत गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी मिळवून देत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वाढवण  बंदर प्रकल्प, ज्याची अंदाजे गुंतवणूक $9 अब्ज आणि नियोजित क्षमता 23 दशलक्ष वीस-फूट समतुल्य युनिट्स (टीईयू) आहे, तर तामिळनाडूमधील तुतीकोरिन बाह्य बंदर प्रकल्प, ज्याची किंमत $1.3 अब्ज, आणि क्षमता 4 दशलक्ष टीईयू आहे, याचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

सोनोवाल यांनी जहाजबांधणी परिसंस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारताच्या 8.4 अब्ज डॉलर्सच्या सागरी विकास पॅकेजची रूपरेषा देखील सांगितली.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2214758) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी