विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पत्रकारांसाठी अनौपचारिक स्नेहभोजन केले आयोजित
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2026 5:55PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींसाठी एका अनौपचारिक स्नेहभोजन आयोजित केले होते.


या स्नेहभोजनामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासकीय सुधारणा आणि राष्ट्रीय विकासाशी संबंधित विविध समकालीन विषयांवर मनमोकळा संवाद साधण्याची तसेच विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. यावेळी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारांनी आपले दृष्टिकोन मांडले आणि धोरणात्मक उपक्रम तसेच सार्वजनिक हिताच्या उदयोन्मुख क्षेत्रांवर अनौपचारिक अभिप्राय मांडला.
या संवादादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी 'शांती कायद्या'शी संबंधित विविध पैलू, भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सची (SMRs) भूमिका तसेच देशभरातील विविध ठिकाणी येऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांची स्थिती अशा प्रमुख कायदेशीर आणि धोरणात्मक घडामोडींवर चर्चा केली. हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करताना भारताची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यात अणुऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत राहील, यावर त्यांनी भर दिला.


विज्ञान सुधारणांची व्याप्ती आणि प्रमाण वाढत आहे, तर प्रशासकीय सुधारणा अधिकाधिक तंत्रज्ञान-आधारित होत आहेत, असे सरकारच्या सुधारणा अजेंड्यावर प्रकाश टाकताना मंत्र्यांनी सांगितले. तंत्रज्ञान पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिक-केंद्रित प्रशासनात सरकार कशी सुधारणा करत आहे, याचे उदाहरण म्हणून मंत्र्यांनी केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (सीपीजीआरएएमएस) सारख्या डिजिटल व्यासपीठाचा उल्लेख केला. भारतीय प्रशासकीय आणि डिजिटल प्रशासकीय प्रारुपाचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची वाढती संख्या हे भारताच्या प्रशासकीय नवोन्मेषात वाढत्या आंतरराष्ट्रीय स्वारस्याचे निर्देशक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रमुख नागरिक-केंद्रित उपक्रमांबद्दलही माहिती दिली. मंत्र्यांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहिमेबाबतही सांगितले. या मोहिमेमुळे निवृत्तीवेतनधारकांसाठी प्रक्रिया लक्षणीयरीत्या सुलभ झाली असून जीवन सुलभता आणि कार्य सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या इतर डिजिटल सुधारणांबाबतही त्यांनी माहिती दिली. हे उपक्रम सर्वसमावेशक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.

या संपूर्ण संवादादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी सतत संवाद साधण्याच्या महत्त्वावर भर दिला तसेच पत्रकार हे जटिल धोरणात्मक उपक्रम आणि वैज्ञानिक यश लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचे भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले. माहितीपूर्ण सार्वजनिक संवाद आणि विधायक अभिप्राय वाढविण्यात माध्यमांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.
हे स्नेहभोजन खुल्या संवादाच्या आणि परस्पर कौतुकाच्या वातावरणात संपन्न झाले, ज्यामुळे माहितीपूर्ण चर्चा, पारदर्शकता आणि सहकार्याच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी सरकार आणि प्रसारमाध्यमे यांच्या सामायिक वचनबद्धतेची पुष्टी झाली.
***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213320)
आगंतुक पटल : 14