वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण(अपेडा) कडून इंडसफूड 2026 मध्ये ‘भारती स्टार्टअप चॅलेंजचे आयोजन; विजेत्या स्टार्टअप्सना दुबईतील गल्फफूड आणि जर्मनीतील बायोफॅक मध्ये सहभागाची संधी
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण(अपेडा)ने इंडसफूड 2026 मध्ये सहभाग नोंदवला असून, या दरम्यान कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यात क्षेत्रात नवनवीन उपक्रम आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारती स्टार्टअप चॅलेंजचे आयोजन केले. हा उपक्रम निर्यातक्षम स्टार्टअप्सना मार्गदर्शन , बाजारपेठेपर्यंत प्रवेश तसेच धोरणात्मक सुलभीकरण उपलब्ध करून देऊन त्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या चॅलेंजमधून निवड झालेल्या स्टार्टअप्सना दुबई येथे होणाऱ्या गल्फफूड आणि जर्मनीतील ‘बायोफॅक’ या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाची संधी दिली जाणार आहे. यामुळे या स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठांतील संधींचा शोध घेता येईल तसेच भारताच्या कृषी-निर्यात क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल.
अपेडाच्या सहभागातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे शंभरहून अधिक प्रदर्शकांसह भारती स्टार्टअप झोन होते, ज्यामध्ये मूल्यवर्धन, कृषी-तंत्रज्ञान, प्रक्रिया, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, ट्रेसेबिलिटी आणि निर्यातीसाठी शाश्वत उपाययोजना या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत नाविन्यपूर्ण कृषी-स्टार्टअप्सचे प्रदर्शन करण्यात आले. भारती स्टार्टअप झोनने उद्योजकता आणि तंत्रज्ञान-प्रेरित उपाययोजनांमुळे भारताच्या कृषी मूल्यसाखळ्या कशा बळकट होत आहेत, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कसा आधार मिळत आहे, शेतकऱ्यांना कसे सक्षम केले जात आहे आणि भारताची जागतिक बाजारपेठेतील उपस्थिती कशी वाढत आहे, हे दाखवून दिले. एपेडा दालन हे निर्यातक्षम कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे, गुणवत्ता हमी प्रणाली, ट्रेसेबिलिटी उपक्रम, भौगोलिक संकेतांक टॅग असलेली उत्पादने तसेच शाश्वततेवर आधारित कार्यपद्धती यांचे ठळक दर्शन घडविणारे एक सक्षम व्यासपीठ ठरले. या दालनाच्या माध्यमातून निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना , स्टार्टअप्स तसेच जागतिक खरेदीदार एकत्र आले. त्यामुळे कृषी-निर्यात मूल्यसाखळीतील विविध घटकांमध्ये अर्थपूर्ण संवाद आणि व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मदत झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते झाले, यावेळी वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती तसेच कृषी-निर्यात क्षेत्रातील विविध भागधारक उपस्थित होते.
इंडसफूड 2026 मधील अपेडाच्या सहभागातून व्यवसाय सुलभीकरण , सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सक्षमीकरण, स्टार्टअप्सना सक्षम बनविणे तसेच शाश्वत कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भारत सरकारचा असलेला भर ठळकपणे अधोरेखित झाला. याचबरोबर, धोरण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यास मदत झाली असून, कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा विश्वासार्ह आणि भविष्याभिमुख जागतिक पुरवठादार म्हणून भारताची ओळख अधिक बळकट करण्यात आली आहे.
शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212680)
आगंतुक पटल : 15