सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सकल देशांतर्गत उत्पादनाचा पहिला अग्रिम अंदाज, 2025-26


2024-25 या आर्थिक वर्षातील 6.5% विकास दराच्या तुलनेत 2025-26 या आर्थिक वर्षात 7.4% इतक्या वास्तविक जीडीपी विकास दराची नोंद

प्रविष्टि तिथि: 07 JAN 2026 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2026

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारितील 'राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  या प्रसिद्धी पत्रकाद्वारे, आर्थिक वर्ष 2025-26 साठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा   पहिला अग्रिम अंदाज' जाहीर करत आहे. यामध्ये स्थिरांक (2011-12) आणि चालू किमतींनुसार खर्चाच्या घटकांसह हा अंदाज देण्यात आला  आहे. विविध आर्थिक क्षेत्रांसाठीच्या मूलभूत किमतींनुसार सकल मूल्यवर्धनाचे (जीव्हीए) वार्षिक अंदाज आणि त्यातील वर्ष-दर-वर्ष होणारे टक्केवारीतील बदल, जीडीपी चे खर्चाचे घटक, तसेच आर्थिक वर्ष 2023-24, 2024-25 आणि 2025-26 साठी स्थिर आणि चालू किमतींनुसार सकल/निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाचे वार्षिक अंदाज 'परिशिष्ट ए' च्या 'विवरण 1 ते 4' मध्ये दिले आहेत.

प्रमुख वैशिष्ट्ये:

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वास्तविक जीडीपी चा विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज आहे, जो 2024-25 मधील 6.5% विकास दराच्या तुलनेत जास्त आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नाममात्र जीडीपी चा विकास दर 8.0% राहण्याचा अंदाज आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अंदाजित 7.3% वास्तविक जीव्हीए विकास दरामागे सेवा क्षेत्रातील प्रगती हा एक मुख्य घटक असल्याचे दिसून आले आहे.

तृतीयक क्षेत्रातील 'वित्तीय, स्थावर मालमत्ता  आणि व्यावसायिक सेवा' तसेच 'सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा' यांचा विकास दर 2025-26 मध्ये स्थिर किमतींवर लक्षणीय 9.9% राहण्याचा अंदाज आहे. 

· व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवा' क्षेत्रात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये स्थिर किमतींवर 7.5%  होण्याचा अंदाज आहे.

· द्वितीयक क्षेत्रातील 'उत्पादन'  आणि 'बांधकाम' यामध्ये आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये स्थिर किमतींवर 7.0% विकास दर साध्य होण्याचा अंदाज आहे.

· कृषी आणि संलग्न क्षेत्र (3.1%) आणि वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवा क्षेत्र (2.1%) मध्ये आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान स्थिर किमतींवर 'सकल मूल्यवर्धनात'  माफक वृद्धी दिसून आली आहे.

· वास्तविक खाजगी अंतिम उपभोग खर्च आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 7.0% दराने वाढण्याचा अंदाज आहे.

· सकल स्थिर भांडवल निर्मिती (GFCF) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये स्थिर किमतींवर 7.8% दराने वाढण्याचा अंदाज आहे, जो मागील आर्थिक वर्षात  7.1% होता.

I. वार्षिक अंदाज आणि वृद्धी दर

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वास्तविक जीडीपी किंवा स्थिर किमतींवरील जीडीपी ₹201.90 लाख कोटी पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या ₹187.97 लाख कोटी या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत हा 7.4% वृद्धी दर दर्शवतो. नाममात्र जीडीपी किंवा चालू किमतींवरील जीडीपी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ₹357.14 लाख कोटी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष 2024-25 मधील ₹330.68 लाख कोटी च्या तुलनेत 8.0%  दर दर्शवतो.

II. कार्यपद्धती आणि मुख्य माहिती स्रोत

जीडीपीचे आगाऊ अंदाज हे निर्देशकांवर आधारित असतात आणि ते 'बेंचमार्क-इंडिकेटर' पद्धतीचा वापर करून संकलित केले जातात. म्हणजेच, मागील आर्थिक वर्षाचे (2024-25) उपलब्ध अंदाज आणि संबंधित क्षेत्रांची कामगिरी दर्शवणाऱ्या निर्देशकांचा वापर करून हे भाकीत केले जाते. विविध मंत्रालये, विभाग आणि खाजगी संस्थांकडून मिळालेली माहिती या अंदाजांच्या संकलनासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

जीडीपी संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण कर महसुलात 'जीएसटी'  आणि 'बिगर-जीएसटी' अशा दोन्ही महसुलांचा समावेश होतो.  

अशी माहिती देण्यात येत आहे की, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सध्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचे आधारभूत वर्ष आर्थिक वर्ष 2011-12  वरून आर्थिक वर्ष 2022-23  मध्ये बदलण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे, अंदाजाची कार्यपद्धती बदलल्यामुळे, नवीन माहिती स्रोतांचा समावेश झाल्यामुळे आणि वार्षिक बेंचमार्क अद्ययावत केल्यामुळे या आगाऊ आणि त्रैमासिक अंदाजांमध्ये बदल होऊ शकतात. वापरकर्त्यांनी सुधारित अंदाजांचा अर्थ लावताना या घटकांचा विचार करावा.  आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे 'दुसरे आगाऊ अंदाज', मागील 3 आर्थिक वर्षांचे जीडीपी अंदाज आणि नवीन आधारभूत वर्ष 2022-23 नुसार त्रैमासिक जीडीपी अंदाज 27.02.2026 रोजी प्रसिद्ध केले जातील.

 

 

निलीमा चितळे /शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2212212) आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Bengali-TR , English , Urdu , हिन्दी