संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रजासत्ताक दिन शिबिर 2026 दिल्ली छावणीत दिमाखात सुरू
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 5:32PM by PIB Mumbai
राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2026 ची सुरुवात आज दिल्ली छावणीतील राष्ट्रीय छात्र सेना महासंचालक शिबिर मैदानावर भव्य आणि औपचारिक वातावरणात झाली. यावर्षी देशभरातून 2,406 छात्र सैनिक या शिबिरात सहभागी झाले आहेत. यामध्ये 127 छात्र सैनिक जम्मू–काश्मीर आणि लडाखमधून, तसेच 131 छात्र सैनिक ईशान्य भारतातून सहभागी झाले आहेत.
याशिवाय, युवा आदान–प्रदान कार्यक्रमाअंतर्गत 25 मित्र देशांतील छात्र सैनिक आणि अधिकारी देखील या शिबिरात सहभागी होत आहेत. हा सहभाग भारताच्या युवा सक्षमीकरणातील जागतिक सहकार्याचे महत्त्व अधिक दृढ करणारा आहे.
राष्ट्रीय छात्र सेना महासंचालक लेफ्टनंट जनरल विरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि सेनेच्या स्थापनेपासूनच्या 77 वर्षांच्या अखंड सेवापूर्तीबद्दल संपूर्ण संघटनेला शुभेच्छा दिल्या.
माध्यमांशी संवाद साधताना जनरल वत्स यांनी सांगितले की प्रजासत्ताक दिन शिबिर हे छात्र सैनिकांसाठी राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाचे सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे प्रभावी व्यासपीठ आहे.
त्यांनी पुढे अधोरेखित केले की राष्ट्रीय छात्र सेनेचा विस्तार आता देशातील 90% पेक्षा जास्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. 1948 साली राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना झाली, त्यावेळी फक्त 20,000 छात्र सैनिक संघटनेत होते. आज ही संख्या जवळपास 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये 40% मुली छात्र सैनिक असून, राष्ट्रीय छात्र सेना आता खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक युवा संघटना म्हणून उदयास आली आहे.
जनरल वत्स यांनी 2025 मधील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विविध उपक्रमांचा आढावा देताना सांगितले की 1,665 वार्षिक प्रशिक्षण शिबिरे, 6 विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, 33 एक भारत श्रेष्ठ भारत शिबिरे यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे देशातील विविध प्रदेश, भाषा, संस्कृती आणि सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या छात्र सैनिकांमध्ये परस्पर विश्वास, सांस्कृतिक समन्वय, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकतेची भावना अधिक बळकट करण्यात आली आहे.
दैनंदिन साहसी उपक्रमांसोबतच राष्ट्रीय छात्र सेनेने खालील महत्त्वपूर्ण मोहिमा देखील पार पाडल्या :
- माउंट एव्हरेस्टवर विशेष गिर्यारोहण मोहीम
- सुमारे 75,000 छात्र सैनिक ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी, ज्यामध्ये नागरी प्रशासनाला आरोग्यसेवा सहाय्य आणि स्वैच्छिक रक्तदान करण्यात आले
- सीमा भागात ग्रामसंपर्क कार्यक्रम
- ‘एक पेड मां के नाम’ मोहिमेत 8 लाख झाडांची लागवड
- 4 लाखांपेक्षा जास्त छात्र सैनिक विकसित भारत युवा नेतृत्व संवाद प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी
- 8 लाखांपेक्षा जास्त छात्र सैनिक योग दिनात सहभागी
- 50,000 पेक्षा जास्त छात्र सैनिक स्वच्छोत्सवात सहभागी
- 6 लाख छात्र सैनिक ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षपूर्ती उत्सवात सहभागी
- 4 दूरस्थ वैमानिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये छात्र सैनिकांसाठी ड्रोन उड्डाण प्रशिक्षण
- 3,000 छात्र सैनिक कौशल्य मंथन कार्यशाळांमध्ये प्रशिक्षित
- 340 छात्र सैनिकांनी 85 नवकल्पना आणि स्टार्टअप कल्पनांवर काम केले, आणि त्या कल्पना व नवोन्मेष स्पर्धेत सादर केल्या
चालू असलेल्या मोहिमांबद्दल माहिती देताना जनरल वत्स यांनी सांगितले की अंदमान–निकोबार येथील 21 निर्जन बेटांभोवती नौकानयन मोहीम सध्या सुरू आहे, ही मोहीम परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित आहे.
वीर बिरसा मुंडा आणि पेशवा बाजीराव यांच्या स्मृती आणि कार्याचा गौरव करण्यासाठी दोन सायकल मोहिमा देशभरात आयोजित करण्यात येत आहेत.
गृह मंत्रालयाने 315 जिल्ह्यांमधील 94,400 छात्र सैनिकांना युवा आपदा मित्र योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी नामांकित केले आहे, आणि हे प्रशिक्षण मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तसेच, 315 जिल्ह्यांमधील 94,400 छात्र सैनिकांना युवा आपदा मित्र योजनेंतर्गत राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समन्वयाने आपत्कालीन प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
या शिबिरास येत्या काळात अनेक मान्यवर भेट देणार आहेत. यामध्ये भारताचे उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, संरक्षण सचिव, संरक्षण दलप्रमुख, लष्कर, नौदल आणि वायुसेनेचे प्रमुख यांचा समावेश आहे.
शिबिराचा समारोप 28 जानेवारी 2026 रोजी प्रधानमंत्री मेळाव्याने होईल. या मेळाव्यात छात्र सैनिक आपले कौशल्य, प्रशिक्षण, सांस्कृतिक सादरीकरण आणि शिस्तबद्ध पथसंचलनाद्वारे राष्ट्रसेवेच्या मूल्यांचे दर्शन घडवतील.


***
माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211136)
आगंतुक पटल : 38